अरे संसार .... संसार.....!!

अरे संसार.. ‌... संसार,
जसा तवा चुल्हिवर..
आधी हाताले चटके,
मग मियते भाकर....!!

-बहिणाबाई चौधरी.

माझ्या जिल्ह्यातल्या ह्या अशिक्षित बाईने ... जिच्या कवितांवर लोकं आज काल पीएचडी करतात... लिहिलेली ही कविता खरी असेलही कदाचित. पण अश्या ह्या संसारा-आधीच बऱ्याच जणांना, आज-काल लग्न ठरवण्यासाठी "चटके" सहन करावे लागता आहेत. लग्न होऊन काय - काय चटके सहन करावे लागतील ते वेगळेच.

सोनाली आणि प्रविणची ओळख त्यांच्या एका अश्याच कॉमन मित्रामुळे झालेली. आधी फक्त ईमेलवर हाय- बाय झालं. नंतर एकमेकांची बरीच ओळख झाली आणि एके दिवशी प्रविणने सोनालीला लग्नासाठी मागणी घातली. सोनाली , प्रविणला "कंडिशनल हो" म्हटली. कायदेशीर कागद-पत्रांमध्ये * लावून लिहितात तसं..... अगदी व्यावहारिक ....!! तिच्या घरी, विचारल्यानंतर त्या "कंडिशनल हो" चं रुपांतर "नकारात" झालं. कुठल्या निकषांवर , नकार मिळाला अजूनही "प्रविण" शोधतो आहे. सोनाली तिच्या जागी अगदी बरोबर आहे. "कंडिशनल हो"नकार ही येऊ शकतो हे प्रविण विसरला.२५ वर्ष जिवापाड जपलेली प्रॉपर्टी तिचे आई-वडील सहजा-सहजी कशी सोपवतील?

मुलगी जन्माला आली म्हणून नाराज होणारा बाप..... आली तर आली पण काळी - सावळी जन्माला आली म्हणून चिंताग्रस्त झालेला बाप..... माझ्या एका डोळ्यात हा एक बाप. तशीच एक मुलगी जन्माला आली म्हणून हर्शीज चे १००० चॉकलेट्स .... हिअर शी इजा ....... अस लिहिलेले.... आनंदाने वाटणारा एक बाप.... माझ्या दुसऱ्या डोळ्यांत..... हे दोन डोळे... एक अवयव म्हणून वापरणारा माझा आत्मा .... दोन डोळ्यातलं चित्र बघून बेचैन होतो.

वर उल्लेखिलेले "सोनाली- प्रविण" किती तरी आपल्याला बघायला मिळतील, अनुभवायला मिळतील. लग्न.... लग्न म्हणजे मानवाचं अस्तित्व पुढे सतत चालू राहावं... म्हणून समाजाने घालून दिलेल्या बंधनांद्वारे एकत्र आलेली २ शरीर.... समाजमान्य... खूपच पुस्तकी व्याख्या झाली. लग्न म्हणजे .... मोतीचूर का लाडूच.... लग्न म्हणजे अनामिक ओढ.. ऽ अगदी गुदगुल्याच... गोड .. गोड मिष्किल हास्य ..... एक नवचैतन्य... एक नवी ऊर्जा... लग्न म्हणजे काहीसं हृद्यांच मिलन... काहीसं ... मनाच मिलन....!! आणि ह्या अश्या गोड मिलनासाठी, लग्न ब्युरो,नातेवाईक, समाजातील व्यक्ती, ओळखीच्या व्यक्ती, मित्र, त्यांचे मित्र..ऑनलाईन पोर्टल्स... अश्या बऱ्याच काट्य-काट्यातून बऱ्याच जणांना जावं लागतं.

कधी कधी मला प्रश्न पडतो, आदिमानवांची लग्न कशी होत असतील नाही. ...???? म्हणजे ठरत कशी असतील ?? होप की त्या वेळेस मानवांच्या कपाळावर जातीच्या पाट्या ठोकलेल्या नसतील. परवा- परवा पर्यंत जुने- जाणते आजोबा... सांगायचे माझ्या लहान-पणी. "जास्त लांबची मुलगी करू नका रे.... आणी जास्त लांब मुलगी देऊ ही नका. " कळप करून राहणारा माणूस , लग्न हा विषय त्याच्या ध्यानी मनी असेल? सुंदरता, वय, वजन, उंची, शिक्षण, कुटुंब, जात, उपजात.................... अशी मोजमापं तो लावत असेल? माझ्या लहान पणी माझ्या वडिलांचे काका, गावोगावी फिरायचे. आमच्या सो कॉल्ड समाजात त्यांना मानाच स्थान होतं... तेच ठरवायचे कुणाची मुलगी कुणाला द्यायची.....आधी शेतकरी हा शेतकऱ्यांशीच सोयर-संबंध जुळवायचा. पण आता ८ वी नापास मुली लाही "नोकरीवाला" मुलगा हवा आहे, मग तो व्यसनि असो वा दारुडा असो. काय सांगावं उद्या उठून शेतकऱ्याने गळफास लावून घेतला तर ?? आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे, "गरीब घराची मुलगी करावी... पण मुलगी मात्र श्रीमंताच्या घरी द्यावी". श्रीमंत- गरीब काय घेऊन बसलात लोकहो .... जगज्जेता "सिकंदर" ही मोकळ्या हातानं जग सोडून गेला... आणि अंबानी काही १००० रु. च्या नोटांच सूप नाही पीत... ५ रु. च्या कोऱ्या कोऱ्या नाण्यांची ताजी - ताजी भाजी नाही खात. आज काल नवीन पद्धत रुळली आहे, मुलींना सासू नको आहे.... लग्न न झालेली नवऱ्याची बहीण नको आहे... सासरा पण नको आहे....!!

हुंड्यासाठी लग्न मोडणारी लोकं मी पाहिली आहेत. ४ लाख रु.फार कमी होतात हो, तरी तुम्ही ३ चं द्यायचं म्हणता आहेत म्हणून आपलं नाही जुळणार बुवा. आणि एवढं सगळं करून ही लग्नात मानपान नीट सांभाळला न गेल्याच कारण करून लग्नात न जेवणारे नवरदेव मी पाहिलेले आहेत आणि त्या चा संसार ढकलगाडीप्रमाणे चालताना ही पाहतो आहे. लग्नाच्या १० वर्षानंतर दारू प्यायला सुरुवात करणारा नवरा सुदधा आहे.

वधू- परीक्षा ..... १० वी, १२ वी , युपीएससी आणि इतर काही असतील त्या परीक्षा परवडल्या पण ही परीक्षा नको .... अशी आज किती -तरी मुलींची स्थिती आहे. तुम्ही अभ्यास केला तर .... म्हणजे कष्ट केले तर तुम्ही पास होण्याची आशा असते... इथे काय कष्ट करणार? काहीच नाही तिच्या हातात? फक्त त्याच्या होकाराकडे ... चातक पक्षासारखी वाट बघणे. अनोळखी माणसांच्या गराड्यात जीवनाचा मांडलेला एक डाव. सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा... मुलाच्या.....त्याच्या घरच्यांच्या होकारा-नकारावर पूर्ण आयुष्य तोललेलं... आणि ही परीक्षा अगदी मोजून ५० वेळा दिल्यावरही , तुला एखादा चांगला मुलगा हो म्हणेल असा आधार बहिणीला देणारा मी. वधूपरीक्षांना एक यज्ञच म्हणावं लागेल.... कधी भावनांची आहुती... कधी सहन केलेल्या टोमण्यांची आहुती .... कधी नोकरी करताना बॉसच्या बोलणींची आहुती, बुडवलेल्या कॉलेजच्या लेक्चर्सची आहुती...!!

लग्न म्हणजे व्यवहार आलाच, गावाकडे "रोटी-बेटी" व्यवहार म्हणतात. २५ वर्षे किंवा क्ष वर्षे सांभाळलेला शरीराचा एक तुकडा एखादा बाप.. एखाद्या नवऱ्या मुलाला सुपूर्त करतो. त्याची निर्मिती, त्याचं ह्या जगातलं अस्तित्व जगातल्याच एका मनुष्याला देतो आणि त्यात येतात वेगवेगळे निकष. आपल्या जातीचा / जातीची आहे का? गोरी हवी, शिकलेली हवी, नोकरी करणारी हवी, चांगला स्वयंपाक करणारी हवी.... आणि तेच मुलींच्या बाबतीत..... शाहरुख नसला तरी अगदीच काळा-कूट नको... गरीब नकोच... मध्यमवर्गीय पण नकोच.... आणी अशे बरेच काही.... मला एकच जात ठाऊक आहे आणि ति म्हणजे मनुष्य जात, सगळ्या जीव-सृष्टीवर माणूस म्हणून प्रेम करणारी मनुष्य जात. नवऱ्या मुलाला किंवा नवरी मुलीला शो केस मध्ये ठेवल्या जाणाऱ्या शोभेच्या वस्तू समजणारे वरील निकष लावतात. प्रेम करताना ही मुलं मुली हृद्यच्या आवाजाकडे लक्ष न देता, मनाचा कौल घेतात.

पण कसंही झालं तरी, "त्या"ला "ती" मिळणारच. किती ही काटे रस्त्यात आले तरी.

धन्यवाद.

संदीप विनायक पाटील.