फांदी

........................................
फांदी

........................................

मौन शब्दांचे सुरू आहे अघोरी!
त्यावरी ही ढिम्म अर्थांची मुजोरी!

केवढा गलका तिथेही चाललेला...
चांदण्या आहेत की आहेत पोरी!

दुःख सामोरे मला एकेक आले...
तू मला झालीस जेव्हा पाठमोरी!

मी तुझ्या केलेच आहे ना हवाली?
का मनाची तू तरी केलीस चोरी?

वाचली कविता तुझी एकेक जेव्हा...
सोडली माझी वही मी सर्व कोरी!

बोच काट्यांची तशी ही ओळखीची...
बाभळी जेथील या, तेथील बोरी!

आसवे का एवढी चमकून गेली?
भंगलेले स्वप्न होते का बिलोरी?

मी तुझ्या खेळास कंटाळून गेलो...
जन्म हा माझा, तुझी कितवी लगोरी?

कुंपणाबाहेर आली एक फांदी...
हा तिचा मोठा गुन्हा; ही बंडखोरी!

- प्रदीप कुलकर्णी

........................................
रचनाकाल ः  १५ एप्रिल २०१०
........................................