आडमार्गी जाउ नको

      आपल्याविषयीच्या चांगल्या बातम्या लोकांना सांगाव्या लागतात (जरी त्यामुळे लोकांच्या पोटात दुखणार असेल तरी )  वाईट बातम्या मात्र लोकच आपल्याला सांगतात.अर्थात त्यांचा त्यामागील हेतु अगदी शुद्ध म्हणजे आपल्याविषयी सहानुभूति दाखवणे हाच असतो.त्यादिवशीही पक्याने मला "अरे मी ऐकले ते खरे का?" अशी सुरवात केल्यावर आता आपल्याला हा काय ऐकवतोय या भीतीने पोटात गोळा उठला आणि त्याने ती बातमी ऐकवताच नुकत्याच सुरू झालेल्या   आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुंग लागणार अशी भीती मला वाटू लागली.सुमतीला ती बातमी ऐकवून तिचा आपण कडेलोट करणार आहोत याची कल्पना मला होती.त्या दिवशी बॅंकेतून घरी नेहमीप्रमाणे हसत जाणे मला शक्यच नव्हते उलट एकदम चिडक्या चेहऱ्याने घरात येऊन अंगावरचे कपडे जवळ जवळ ओढूनच काढत मी खुर्चीवर बसलो आणि पाण्याचा पेला घेऊन आलेल्या सुमतीला म्हणालो,
"झाले कोटकल्याण "
"का काय झाले ?" पंखा सुरू करून माझ्याजवळ येत सुमती म्हणाली.
"माझी बदली झालीय."
"असं कस काय झाल आणि कुठ झाली ?"तिन   विचारले .
तिच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हत म्हणून दुसऱ्या प्रश्नाचे तेवढे मी दिले,
"बोंदरवाडी "
हे नाव सुद्धा सुमती प्रथमच ऐकत होती त्यामुळे तिचा पुढला प्रश्न होता
"हे गाव कोठे आहे ?"
"मला तरी कुठे माहीत आहे पण जायचे म्हणजे समजून घ्यावेच येईल "
  आणि पुढ "चला मग निघण्याची तयारी करा आलिया भोगासी असावे सादर " मी भरतवाक्य म्हणावे तसे म्हटले. सुदैवाने तो काळ नवऱ्यांसाठी आजच्याइतका वाईट नव्हता नाहीतर आमचा संवाद काहीसा असा झाला असता
" काय बदली झालीय ?तू तर म्हणाला होतास की निदान पाच वर्षे तरी बदली नाही म्हणून"  
" हो म्हणालो होतो पण त्यावेळी कुठ माहीत होत आमदारसाहेबांच्या मुलीला याच ब्रॅन्चलाच यायच होत."
  "उद्यापरवा निघाव लागेल"
" मला वाटत तू एकट्यानच जावस "
"कमाल आहे म्हणजे तू माझ्याबरोबर येणार नाहीस का?"
" हे बघ रमाकांत वाईट वाटून घेऊ नकोस,पण मी लग्नाला तयार झाले कारण तू पुण्यात नोकरी करत होतास आणि त्यामुळे पुण मला निदान काही वर्षे तरी सोडायला लागणार नाही अस वाटत होत पण आता सगळच बदलल आहे,ते बोंदरवाडी गाव कसल आहे कुणास ठाऊक"
" मग याचा अर्थ आपण नेहमीसाठीच वेगळ रहायच की आणखी काही --- " आता मात्र माझा धीर सुटत चालला.
" तस नाही तू मधून मधून येत जा पुण्याला किंवा मीही ये ईन बोंदरवाडीला "
अशा वळणावर आमच्या संवादाची गाडी न जाता सुमतीने फारसा त्रागा न करता जाण्याची तयारी दाखवली फक्त  तिने एकच सूचना केली,       " मला वाटते तुम्ही एकदा बोंदरवाडीला कामावर रुजू व्हा जागा वगैरे पहा मग मला न्यायला या"अर्थात या तिच्या सूचनेत गैर काही नव्हते.
     मी मुक्काम पोस्ट बोंदरवाडीला पोचलो आणि कामावर तर रुजू झालो पण या कृतीचा उत्तरार्ध पार पाडणे अवघड आहे हे माझ्या लक्षात येऊ लागले कारण बोंदरवाडीत सुमतीला पटेल असे घर मिळणे किती अवघड आहे हे बरीच घरे पाहिल्यावर माझ्या लक्षात येऊ लागले. बोंदरवाडी छोटे गाव असले तरी बॅंकेतल्या सह्काऱ्यानी  मला बरीच घरे दाखवली पण काही झाल तरी ती बोंदरवाडीतलीच घर त्याना पुण्यामुंबईतल्या घरांची सर थोडीच येणार.काही नवश्रीमंत शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी घरे बांधली होती पण मुख्य प्रश्न होता पाण्याचा.नळाची सोय असली तरी नळाला पाण्याचा थेंबही पहायला मिळण म्हणजे अगदी कपिलाषष्ठीचा योग,त्यामुळे माझ्या एका सहाय्यकाने   केलेली सूचना मला पटली आणि मी एक वाडा पद्धतीचे पण जुनाट घर भाड्याने घ्यायचे ठरवले कारण त्या घराला मोठे अंगण होते आणि त्यामध्ये एक सुबक पद्धतीने बांधलेला आड होता,आणि त्या आडाची अशी ख्याती होती की आजूबाजूच्या पंचक्रोशीतले पाणी आटले तरी त्यातील पाणी आटत नसे. 
   घराचे काम एकदा पार पडल्यावर मी सुमतीला घेऊन गेलो.घर पाहून सुमतीन अगदी नापसंती व्यक्त केली नाही हे पाहून मला बरे वाटले.त्यादिवशी माझ्या बॅंकेतील मित्राने जेवायला बोलावले होते,जेवण करून घरी आलो आणि बऱ्याच दिवसानी सुखाने झोप आली असे मला वाटले पण पहाटे जाग आल्यावर सुमतीला जवळ घेण्याच्या माझ्या बेताला एकदम खीळ बसली  ती अंगणाच्या दारावर कुणीतरी ठोकल्यामुळे.या घराची रचना बाहेर अंगण ते बंदिस्त होण्यासाठी मुख्य दरवाजा आणि मग आतल्या घराचे दार अशी होती.अंगणातील दारावरील ठोकण्याकडे काही वेळ दुर्लक्ष्य केले तरी तरी ते ठोठावणे थांबण्याचे चिन्ह दिसेना त्यामुळे आपला बेत जरा बाजूस ठेऊन उठून त्या ठोकणाऱ्याची दखल घेण मला भाग होते नाहीतर जो कोणी असेल तो ठोकून ठोकून दारच मोडून टाकेल अशी शक्यता दिसत होती.
   उठून दार उघडून मी डोळे चोळतच अंगणात गेलो,बाहेरील दारावरील दणके चालूच होते, ते दार उघडले आणि पहातो तो दोन हातात दोन भल्या मोठ्या घागरी घेतलेले,डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेले,धोतराचा काचा मारलेले असे पैलवानी धाटणीचे गृहस्थ समोर अवतीर्ण झाले.आपण या गृहस्थांना केव्हां भेटलो याचा विचार करण्याचा प्रयत्न मी डोळे चोळत आणि डोके खाजवत करू लागलो,पण मला जास्त आठवण्याची तसदी न देता समोरील गृहस्थानी " अहो वाटेत काय उभे रहाताय मला पाणी न्यायला उशीर होतोय बाजूस सरा "असा हुकूम सोडल्यावर मला बाजूस सरणे भाग पडले. कारण आपण या घरात रहायला येण्यापूर्वीचीच या गृहस्थांची ही हक्काची वहिवाट असावी याचा साक्षात्कार मला झाला.
     आत परत गेल्यावर  सुमतीलाही जाग आली आणि  तिने उठून चहाची तयारी सुरू केली  पण प्रथमग्रासे मक्षिकापात: व्हावा तशी एक गोष्ट तिच्या लक्षात आली ती म्हणजे घरात पाण्याचा एक थेंबही नव्हता.सुदैवाने लग्नात आईकडून मिळालेली  घागर सुमतीने आणली होती ती माझ्यापुढे ठेवून तिने मला आडावरून पाणी आणायला सांगितले.
      तिची आज्ञा शिरोधार्य करून मी बाहेर आडावर गेलो.मिशाबहाद्दर पाणी घेऊन गेले होते.मोठ्या आनंदाने दोनतीनदा आडाकडे आणि दोनतीनदा हातातल्या घागरीकडे पाहिले  .नंतर आळीपाळीने एकदा रहाटाकडे आणि एकदा घागरीकडे पाहिले.  द्रोणाचार्यासारखे घागर आडात टाकून ती भरल्यावर बाण मारून ती बाहेर काढण्याचे कसब आपल्याकडे नाही म्हणजे ती घागर आडात सोडण्यासाठी दोर हवा याची जाणीव  झाली.शेवटी वेळ भागवण्यापुरती सुमतीची एक जुनी साडी वापरून पाणी शेंदून काढायचा विचार केला. 
     त्याच पद्धतीने एक घागर पाणी काढून घरात घेऊन गेल्यावर सुमतीने एक कृपाकटाक्ष माझ्याकडे टाकला.कोणतेही काम केल्यावर "तुम्ही किती चांगले आहात हो" या अर्थी असा कटाक्ष टाकून ती मला गार करते पण यावेळी पाणी शेंदून काढून घरी आणेपर्यंत माझ्या अंगावर झालेल्या अभिषेकामुळे मी आधीच गार झालो होतो अजून गॅसचा पत्ता नसल्यामुळे स्टोव्ह पेटवून चहाच आधण तिन ठेवल. आत स्टोव्हच संगीत चालू होत व बाहेर रहाटाच संगीत चालू होत.बरेच लोक जलभरणासाठी आडावर येत होते.मी दाराच्या चौकटीत उभा राहून मोठ्या दिमाखान त्यांच्याकडे पहात होतो.आपण एक पुण्यकृत्य करत आहोत अस मला वाटत होत.चहा झाला आणि मी वर्तमानपत्र चाळीत बसलो तोच एक सदगृहस्थ आत आले.या घरात आल्यापासून अनेक अनोळखी लोकांना  पहाण्याची पाळी इतक्या थोड्या वेळात आल्याने मी या गोष्टीस चांगलाच सरावलो होतो.त्यानी एकदम अधिकारदर्शक सुरात "जरा दोर द्या बर" अशी मागणी केली आणि दोर नाही असे मी सांगताच "काय विचित्र माणुस आहे घरात आड आहे आणि दोर नाही"असे पुटपुटत निघून गेले.
       पण त्यामुळे आता दोर आणला पाहिजे हे लक्षात आले आणि मी उठलो.पाकिट खिशात घालून बाजारात गेलो.आतापर्यंत दोराचा वापर करायची पाळी आली नव्हती.येऊन जाऊन नरवीर तानाजी नाटकात सूर्याजीच काम करत असताना मी दोरावरून चढताना बाकीच्या मावळ्यांना इतकी वीरश्री चढली की मी वर चढण्यापूर्वीच त्यानी दोर कापून टाकला आणि त्यानंतर चार दिवस मी दवाखान्यात पडून होतो हाच काय तो दोराचा माझ्या पोतडीत असलेला अनुभव.त्यामुळे दोर विकत घेण्याची ही माझी पहिलीच वेळ होती.बोंदरवाडी म्हणजे काही बिग बझार असणारे शहर नव्हते की तेथे एका छताखाली सगळ्या वस्तू मिळाव्या त्यामुळे एका दुकानात दोर मागितल्यावर त्याने "अहो दोर असा दुकानात कुठला भेटायला,त्यासाठी जावा **वाड्यात (जातिवाचक उल्लेखाचे बोंदरवाडीस वावडे नव्हते) " असे सांगितले.मग शोध घेत गेलो तेव्हा  **वाड्यात खरोखरच दोर वळण्याचेच काम चालू होते.आणि मला हवा तसा दोर तिथे उपलब्ध झाला आणि विजयी मुद्रेने तो घेऊन मी घरी आलो.
          घरी आल्यावर नेहमीप्रमाणेच माझ्या खरेदीवर आणि त्यातील अव्यावहारिकपणावर शिक्कामोर्तब झाले व पाणी काढण्यासाठी म्हणून मी दोर व घागर घेऊन पुन्हा आडावर गेलो.पण आता अडचण वेगळीच उपस्थित झाली. आता घागर दोरात अडकवण्यासाठी फास तयार करणे आवश्यक होते.बरीच धडपड करून त्या दोराचा फास बनवणे काही मला जमले नाही.गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्यांना बहुधा फास कोणीतरी तयार करून देत असावेत नाहीतर फास तयार करेपर्यंत त्यांचा आत्महत्या करण्याचा विचार बदलण्याची निश्चिती आहे असे मला वाटून गेले.इतक्यात एक तरूण वीर त्याचवेळी पाणी नेण्यासाठी  प्रविष्ट झाले आणि तेसुद्धा अगदी भला मोठा हंडा घेऊनच. ते या शास्त्रात पारंगत असल्याने एका दमात त्यानी फास तयार केला आणि त्याचा उपयोग करून मी एक घागर पाणी ओढून काढले,अर्थात त्यांच्या कामगिरीबद्दल दोराचा वापर याना करू देणे आवश्यकच होते. त्यांच्या त्या अवाढव्य हंड्याच्या वजनाने दोर तुटणार तर नाही ना अशी सारखी भीती मला वाटत होती,पण सुदैवाने तसे काही घडले नाही.आणि घागर घेऊन मोठ्या समाधानाने मी घरात गेलो.
      जेवण करून ऑफिसात गेलो संध्याकाळी घरी परत येतो तो सुमती हवालदिल होऊन बसलेली."का ग काय झाल?" अस मी विचारताच तिने काहीही न बोलता दोराचे दोन तुकडे माझ्या हातात ठेवत "जो तो मोठे मोठे हंडॅ घेऊन येतोय मग कसा दोर टिकणार ?" असे उद्गार काढले. "काही हरकत नाही तू काही काळजी करू नकोस ही बघ ही अशी घट्ट गाठ मारतो त्या दोन तुकड्यांची की झाला पुन्हा दोर तयार .हे बघ " म्हणून मी तुटका दोर अखंड करून तिच्या पुढे ठेवला.
     अर्थात माझ्या कर्तृत्वावर फारसा विश्वास नसणाऱ्या सुमतीचा या अखंड दोरावरही फारसा विश्वास बसला नाही कारण तिने दोन हातात तो दोर धरून तिच्या अल्प शक्तीनुसार त्याची दोन टोके  ओढून पाहिली आणि जोड जसाचा तसा राहिल्यामुळे फारशी खळखळ न करता माझी  ही कर्तबगारी मान्य केली आणि पुढचा समरप्रसंग टळला.
" लोकांना दोर देऊन उपयोग नाही .म्हणजे आपण आपल्याला पाणी हवे असेल तेव्हांच दोर रहाटाला बांधायचा.एरवी तो काढून ठेवायचा ."तसा हा पर्याय स्वागतार्ह होता फक्त त्यासाठी दोर रहाटाला लावण्या काढण्याचा खेळ मला दिवसातून काही वेळा करावा लागणार होता.पण त्यावरही तिने सुचवले,
" तुम्हाला दोर लावण्याचा आणि काढण्याचा वेळ वाचवायचा असेल तर एक गोष्ट करता येईल एक मोठे पीप आणून ते एकदाच भरून ठेवायचे आणि तसेच पिण्याच्या पाण्यासाठी एक हंडा "  अर्थात या गोष्टी माझ्या भल्यासाठी करायच्या असल्यामुळे त्या मोहिमेवर लगेचच मी निघणे अपेक्षित होते आणि माझा दृष्टीने आवश्यकही.त्यामुळे मी ताबडतोब त्या मोहिमेवर प्रस्थान ठेवले.अशा झटपट कृतीमुळे दुसरा दिवस शांततेत पार पडला पण दिवसाचा शेवट मात्र पुन्हा नवी अडचण उपस्थित करून झाला आणि ही अडचण काही साधी नव्हती.
      ऑफिसातून घरात शिरताना खमंग बटाटे पोहे आणि चहाची फरमाइश करण्याच्या माझ्या मनसुब्यावर सुमतीच्या दु:खी चेहऱ्याने पाणी फिरवले.काहीतरी अकल्पित आणि अवघड संकट उपस्थित झाले असावे याची मला कल्पना आली.पण हे तिला विचारल्याशिवाय कळणे शक्य नव्हते.
" मी परत पुण्यालाच जाते " असा तिचा पवित्रा पाहून मी आणखीच हादरलो
" काय झाले तरी काय ?" मी शक्य तो मृदु स्वर काढण्याचा प्रयत्न केला तरीही त्यातून माझाही त्रागा प्रकट झालाच.
" इथ आल्यापासून एक दिवस सरळ गेला असेल तर शप्पथ " तिच्या या वक्तव्यातून संकटाची कल्पना येणे शक्यच नव्हते पण ती कल्पना पाणी न्यायला आलेल्यापैकीच एका गृहस्थानी दिली,
" कायहो घागर पाण्यात पडलेली दिसतेय "म्हणजे आता दोर तुट्ण्यापेक्षाही अवघड प्रसंग उद्भवला होता तर.आणि त्याला माझेच कौशल्य कारणीभूत होते असे सुमतीच्या बोलण्यावरून दिसले,
" होना,तुम्ही जोडून दिलेल्या दोराचा निम्मा भाग घागरीसकट पाण्यात पडला "
" कायहो ती घागर काढून द्याल का ?" माझ्यावरील संकटाचा पंचनामा करणाऱ्या त्या गृहस्थानाच कामाला लावण्याचा मी प्रयत्न केला.
" छे छे असली काम मी नाही करत,हां पण एक सांगतो ब्राह्मणगल्लीत ते गजाभाऊ आहेत ना त्यांच्याकडे गळ आहे तो आणा म्हणजे तो आडात टाकून त्या गळाला घागर लागली की वर ओढून घेता येईल"असा सल्ला देऊन ते गृहस्थ निघूनही गेले. 
       आता गजाभाऊंचा धावा करणे भाग होते.बऱ्याच प्रयत्नाने गजाभाऊंचे घर तरी सापडले.दारावर ठोठावले आणि दार उघडले गेले आणि पहिल्या दिवशी अगदी सक्काळी सक्काळीच दर्शन दिलेल्या महाभागांचे मिशाळ आणि तुळतुळीत डोके दाराबाहेर अवतीर्ण झाले आणि " काय पाहिजे ?" अशी कसलेल्या आवाजात विचारणा झाली.
" गजाभाऊ आपणच ना ?" स्वरात शक्यतो मार्दव आणीत मी विचारले.
" हो मीच पण काय काम आहे ?" माझ्या मार्दवाच्या दसपट  तिरसटपणा स्वरात आणून केलेली विचारणा.पण गरजवंताला अक्कल नसते,त्यामुळे मी माझ्या गळाच्या मागणीचा गळ टाकून बघितला पण त्यांच्या उत्तराने निराशाच पदरी पडली,
" अहो गळ शेतावर गेलाय तो घरात कुठला सापडायला ? बर या " आणि दार खट्टकन बंद झाले सुदैवाने माझ्या चपळाईमुळे माझी बोटे दाराच्या फटीत सापडून माझा शाइस्तेखान व्हायचा वाचला.
     मी हात हलवत घरी !
" काय हो मिळाला का गळ ?" मी गळ जणु खिशात टाकून आणला असावा अशा समजुतीत सुमतीची विचारणा.पण तिच्यासारख्या पुणेरी मुलीला दोष देण्यात काय अर्थ होता आणि देऊन उपयोग तरी काय होता.
" अहो ते गृहस्थ आपली घागर काढून द्यायला तयार आहेत " मी नसताना तिनच माझी या संकटातून सुटका करण्याचा प्रयत्न केलेला दिसत होता.
’"त्या "’ गृहस्थांकडे मी मग उत्सुकतेने पाहिले. पांढरा शर्ट अर्ध्या खाकी चड्डीत खोचलेला म्हणजे संघपरिवारातला दिसतोय अर्थात मला त्याच्याविषयी आदर वाटू लागला.
" अहो अडचणीत सापडलेल्याला मदत करायला हवी ना ?" हे त्याचे शब्द ऐकून माझा त्यांच्याविषयीचा आदर दुणावला.
" ताईनी मला सांगितले आणि मी लगेचच आडात उतरणारच होतो"
" हो पण मीच त्याना थांबवले कारण तुम्ही गळ घेऊन येणार होता ,म्हटले गळ मिळाला तर आपले १०० रु.आणि नारळ वाचेल"
" म्हणजे काय ?"
" काही नाही अशी लोकसेवेची कामे आम्ही करतो पण हल्ली लोकांना सगळ्याच गोष्टी फुकट हव्या असतात. तुम्हीच सांगा ही प्रवृत्ती बरी आहे का?" त्यानीच माझी समस्यापूर्ती करत म्हटले.
" खरे आहे " मी त्याना दुजोरा दिला.
" पण १०० रु.म्हणजे जरा जास्तच होतात नाही का?" इति सुमती आणि मलाही तिच्या म्हणण्यात तथ्य आहे असे वाटले
" पहा बुवा,घागर अस्सल तांब्याची दिसतेय आजच्या बाजारभावाने तिची किंमत पाचशेच्याखाली नाही महाराजा," घागरीची किंमत जरा जास्तच फुगवत आपली मागणी काही अवाजवी नाही हे आमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करून ते गृहस्थ निघून गेलेसुद्धा बहुधा आम्ही त्याना परत बोलावूच याविषयी त्याना खात्री असावी.पण त्यांच्या या डावपेचामुळे मला खिजवल्यासारखे वाटून मीही हट्टाला पेटलो आणि सुमतीला म्हणालो,
"अग त्यात काय विशेष आहे मीसुद्धा आडात उतरून घागर काढू शकेन"      
" हं उगीच काहीतरी नका बोलू आणि असल्या फंदातही नका पडू." या बाबतीत मात्र अगदी वास्तव वादी भूमिका घेत सुमती उद्गारली.माझ्या कर्तृत्बाचा अभिमान असला तरी योग्य तो अंदाजही तिला आतापर्यंत आला होताच.
" अस म्हणतेस ? मग दाखवतोच तुला.अग लहानपणी अगदी खोल विहिरीत पोहलेलो आहे मी "
" अहो ती गोष्ट वेगळी आणि ही विहीर नाही हा आड आहे हे लक्षात घ्या"
पण मी अगदी हट्टालाच पेटलो
" हे बघ दोराला धरून खाली उतरायच मग एक उडी मारून घागर काढायची झाल "
" पण आत उतरल्यावर पुन्हा वर कस येणार ?" ही तिची शंका बरोबर होती कारण घागर जरी मोकळी असली तरी एक हात ती पकडण्यात गुंतल्यावर वर चढण्याचे काम तितके सोपे नाही पण मग मला काहीसे सुचून मी म्हणालो
’ अग नंतर मला घागरीसकट वर ओढून घ्या की तुम्ही किंवा एकदा घागर आणि नंतर मला "
"अस म्हणताय ? बर बघूया पण आता दोर तर आत पडलाय थांबा शेजारी कमलाबाईंकडे असेल " म्हणून ती गेली
 पण पाणी न्यायला आलेल्या एका थोर गृहस्र्थाला वहिनीचा पुळका आला आणि " वयनी ,काळजी कशाला करताय,हा घ्या दोर " म्हणत त्याने आपल्या हातातला दोर पुढे केला.इतक्या स्वस्तात बरीच मोठी करमणूक होण्याची अशी आलेली संधी  जाऊ न देण्याचा त्याचा हा डाव माझ्या लक्षात आला.
        आता मात्र माझ्या बढाई मारण्याचा मला पश्चाताप होऊ लागला. तितक्यात शेजारी रहाणाऱ्या कमलाबाईही लगबगीने आल्या .सुमती दोर मागायला गेल्यामुळे त्याना या गोष्टीचा पत्ता लागला होता नाहीतर खेड्यातील संवयीला अनुसरून शेजारच्या घरात काय चालले आहे याकडे त्यांचा एक कान असणार याविषयी मला शंका नव्हती..
" अहो मी याना सांगितल की तुम्ही आडात उतरता आहात म्हणून तर ह्या म्हणाल्या की मीपण येते म्हणून" इति सुअमती
" हो बाई,असली धाडसाची काम पहायला मला फार आवडत.नरवीर तानाजी हा सिनेमा तानाजी आणि त्याचे मावळे गड कसे चढून जातात फक्त हे बघण्यासाठी मी दहा वेळा पाहिला.गावात आलेल्या सर्कसचे तर झाडून सगळे खेळ मी अटेन करते.बरका रमाकान्त, तुम्ही आज आडात उतरला तर मी ह्यांना पण उद्याच आडात उतरवते की नाही ते तुम्ही बघाच."
" मग आजच त्याना उतरायला सांगा ना " अस त्याना सांगायच अगदी माझ्या ओठावर आलेल मी तसच गिळून टाकल. अखेर आता हा माझ्या इभ्रतीचा प्रश्न झाला होता.
         आता माझी चर्या गंभीर बनत चालली.डोळ्यातून पाणीही येतेय की काय अशी भीती वाटू लागली.आपला बेत रद्द करावा की काय असे मला वाटू लागले.आणि मी सुमतीला म्हटलेसुद्धा
"अग आजचा दिवस चांगला नाही तेव्हां घागर उद्या काढायची का?"
" हे काय हो माझी किती निराशा होईल" कमलाबाईंनी दु:ख व्यक्त केले.
" म्हणजे काय माझ आडात उतरण हा सर्कसचा खेळ वाटला की काय तुम्हाला?" मी जरा घुश्शातच विचारले.
" तुमच आपल काहीतरीच,पण अहो मग १०० रु.आणि एक नारळ द्यावा लागेल ना" इति सुमती म्हणजे इतका वेळ मला आवरणारी ही पण कमलाबाईंच्याच गोटात सामील झाली वाटत.
"माझ्यापेक्षा १००रु आणि नारळ तुला जास्त वाटतात का?"
" बर बर काही नको अगोदर फुशारकी मारलीतच कशाला ? त्या सरूताईंच्या यजमानानी बघा परवा एक मोठ्ठा साप मारला "
" आणि बरका आमच्या ह्यांनी " लगेच कमलाबाई सुरू झाल्या
आता मात्र अशा पराक्रमी नवऱ्यांच्या मालिकेत बसण्यासाठी मला आडात उतरणे भागच होते.
शेवटी तो दोर घेऊन मी  रहाटाच्या एका बाजूच्या खांबाला बांधला देवाचे नाव घेतले अन दोराला धरून पाय आडात सोडले.आडाची खोली बघून माझा जीव वरखाली होऊ लागला.कमलाबाई व सुमती मला धीर देत होत्य
" अहो त्या दगडाला धरा,एका हातान आणि दुसऱ्या हातान दोर पकडा.अहो अस कस करताय.त्या नरवीर तानाजीमध्ये कस तानाजी ---"
आता मी जर वर असतो तर तानाजीप्रमाणेच या दोन घोरपडींना खांडोळी करण्याची धमकी तरी निश्चितच दिली असती.
      मी आडात उतरतो ही बातली गावात वाऱ्यासारखी पसरली व आमच्या आडावर इतकी गर्दी जमली की या करमणुकीसाठी प्रत्येकी एक रु.जरी घेतला तर शंभर रुपये आणि नारळ विकत आणण्याइतके पैसे सहज जमा होतील असे वाटून गेले. सुमतीच्या चेहऱ्यावर वीरस्त्रीचे तेज ओसंडून वहात होते. सद्ध्या " झासीकी रानी"ही मालिका ती नित्यनियमाने पहात होती.तिचेच प्रतिबिंब जणु! फक्त वीरश्री दाखवण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आले होते एवढाच काय तो फरक.
     प्रत्यक्षात माझी परिस्थिति फारच दीनवाणी झाली होती.आडाच्या बाजूच्या भिंतीवर शेवाळ चढल्यामुळे त्यावर पाय ठरत नव्हता,तर वरून दोराने हात काचत होता.तोंडाने रामरक्षेचा जप चालू होता.बर आता हा प्रयत्न सोडून वर चढावे तर वर असलेल्या बऱ्याच लोकांची निराशा होणार होती.तेवढ्यात गावातील फोटोग्राफर कॅमेरा घेऊन धावत आला आणि त्याने माझा एक फोटो पण खेचला.
" हं रमाकांत शाब्बास, हळू,आस्ते,अहो तिकडे धरा,अहो तिथ काय धरता काय मरायचे आहे की काय,हं बरोबर "अशा अनेक सूचना,उद्गार उत्तेजनपर शब्द कानावर पडत होते आणि त्यातल्या कोणत्या उद्गाराचा काय अर्थ आहे हे मात्र माझ्या डोक्यात मुळीच शिरत नव्हते.अखेर एका दगडावरून माझा पाय सरकला आणि त्याच बरोबर पाण्याने गुळगुळीत झालेल्या दोरावरून हातही घसरत मी थेट आडाच्या तळालाच पोचलो आणि पाण्यावर आपटलो थोडाबहुत पाण्याचा मार लागला आणि गुडघ्याला दगडाने दुखापत झाली इतकेच.लगेच वरच्या मंडळींनी "शाब्बास रे पठ्ठे " .म्हणून माझे अभिनंदन केले.फक्त त्यानंतर हरहर महादेव म्हणायचेच काय ते बाकी राहिले होते.सुमती तर इतकी वाकून बघत होती की ती आता माझ्या अंगावरच पडते की काय अशी भीती मला वाटू लागली.
    गावातल्या मंडळींची ही रसिकता पाहून नोकरी सोडून जत्रेत मौतका कुव्वा खेळ करणाऱ्या मोटरसायकल बहाद्दरासारखे आडात चढण्याउतरण्याचेच प्रयोग करावे असा विचारही डोक्यात डोकावून गेला. 
    आता आडाच्या पाण्यातून घागर वर काढण्याचेच काय ते बाकी होते.सुदैवाने एका बुडीत घागर हाती आली पण मी वर यायला आणि पुन्हा तिने आडाचा तळ गाठायला एकच गाठ पडली पण अखेर दुसऱ्या बुडीत काम झाले. वरच्या लोकांनी माझी ही सर्कस चालू असतानाच दोर रहाटाला बांधून घागरीसह मला वर ओढून घेण्याची तयारी केली. आता त्या दोराचा खालचा भाग मी कमरेला गच्च बांधला आणि वरच्या लोकांना इशारा केला.
      वरच्या लोकांनी उत्साहाने वर ओढायला सुरवात केली.आणि मी हळूहळू वर सरकू लागलो.आडाच्या तोंडापाशी येतो न येतो तोच ओढणाऱ्या व्यक्तीचा कसा काय रहाटावरचा हात ढिला झाला आणि एकदम वेगाने घागर आणि मी यांचे अध:पतन सुरू झाले ते मी थेट तळ गाठेपर्यंत ! या वेळी मात्र त्या पाण्याच्या हबक्याने मी एकदम बेशुद्धच झालो. तासदोन तासाने मी शुद्धीवर आलो तेव्हां मी घरातल्या बिछान्यात होतो आणि माझ्या उशाशी बसून सुमती आणि कमलाबाई बोलत होत्या
" किती यांना आपण परोपरीन सांगितले की असले धाडस करू नका पण ते कुठले ऐकायला " मी कपाळावर हात मारून घेतला आणि मग  दुसऱ्यांदा बेशुद्ध झालो.