लिंबू मस्ती!

           वेळ दुपारची बाराची! ठिकाण ठाण्याचे गजबजलेले रेल्वेस्थानक! रांग या शब्दाचा राग येण्याइतपत तोबा गर्दी! अशा वेळेस जर कुपन्स नसतील तर स्वतःला शिव्या देत देत रांगेत उभे राहण्याला पर्याय नसतो! मीही अशाच अभागी गर्दीचा भाग होऊन रांगेत उभा राहिलो होतो. खिडकीपाशी येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आणि पर्यायाने तिकीट देणाऱ्याच्या मंद हालचालींना शिव्या घालत घालत कधी एकदा रांग पुढे सरकते आहे याची वाट बघत बघत पुढे सरकत होतो. रांगेत कोणी घुसत तर नाही ना यावरही अगदी बारीक लक्ष ठेवून होतो. अचानक सगळीकडे गोंधळ उडाला. स्थानाकाबाहेरचे सगळे फेरीवाले सैरावैरा आपापल्या गाड्या घेऊन पळायला लागले आणि लपायला आसरा शोधू लागले. मनात विचार आला 'नेहमीप्रमाणेच महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागवाले आले असणार! आणि त्यामुळे या बेकायदा आणि जास्त करून युपी बिहारवाल्या फेरीवाल्यांची पंचाईत झाली असणार! झालेही तसेच होते. पण हे सारे फेरीवाले या जवळजवळ रोजच्या प्रकाराला सरावलेले असतात. तेही गुपचूप लपून बसतात आणि अतिक्रमणवाले गेले कि लगेच उंदीर बिळातून बाहेर आल्याप्रमाणे बाहेर येतात! मग कसली कारवाई नि कसलं काय?   या सगळ्याची आम्हालाही सवय झाल्याने जवळजवळ प्रत्येकाने त्याकडे दुर्लक्ष केलं.
              अचानक 'खाळ' करून काच फुटल्याचा मोठा आवाज झाला. साऱ्यांच्या माना आपसूकच तिथे वळल्या! काहीतरी फुटलं असं मनात येताच पाहतो तो काय.... एका थोराडशा अधिकाऱ्याने एका लिंबू सरबत वाल्याची गाडी बरोबर आणलेल्या लोखंडी कांबेने तोडून टाकली आणि त्याची सारी काचेची ग्लासेही फोडून टाकली! टोपभर सरबत जमिनीवर ओतले आणि लिंबे चिरडून टाकली. सारा जनसमुदाय हे आवक होऊन पाहत होता. बापरे! हा काय भयानक प्रकार? सिनेमात दाखवतात तसा प्रकार इथे घडत होता फक्त फरक एवढाच होता कि सिनेमात हे सारे गुंड करत असतात आणि इथे हे सारे पालिकेचेच अधिकारी करत होते! हे सारे करून तो अधिकारी निघून गेला त्याच्या साथीदारांसोबत! त्याने मागे लपून बसलेल्या फेरीवाल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला नाही! वास्तविक त्या सर्व अधिकाऱ्यांना ही कल्पना होती कि त्यांच्या येण्याआधी कुणीतरी धावत येऊन त्यांच्या येण्याची खबर दिल्याने खूप सारे फेरीवाले पळून लपून बसले होते पण या लिंबू सरबत वाल्याला त्याच्या मोठ्या आणि अवजड गाडीमुळे पळता आले नाही त्यामुळे तो अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडला आणि त्याचे हे असे हाल झाले! जमिनीवर पडलेला लिंबांचा आणि काचांचा कचरा निमुटपणे आवरताना त्याला आणि त्याच्या साथीदाराला अश्रू आवारात नव्हते! त्यांचा ३-४ दिवसांचा धंदा बुडाला होता आणि जे त्यांच्यासारख्यांच्यासाठी फार मोठे नुकसान होते! लहानग्या साथीदाराला तर रडूच फुटले. ही अनागोंदी माजवून काहीतरी पराक्रम माजवल्याचा अविर्भाव आणत अधिकारी निघून गेले. हळूहळू एक एक करत पुन्हा साऱ्या गाड्या जशा होत्या तशा स्थानक परिसरात उभ्या राहिल्या आणि बेकायद्याचा कायदा सुरू झाला!
              पुढचे आश्चर्य काय तर त्या लिंबू सरबत वाल्यानेही आपली गाडी परत उभी केली! आता मलाच कळेना या साऱ्या प्रकाराला म्हणावं तरी काय? आधी मला त्या बिचाऱ्याची दया वाटली. वाटले, 'बापरे! केवढे हे बिचाऱ्याचे नुकसान! कसा काय सावरेल हा यातून? पण नंतर त्याने आपला धंदा पूर्ववत चालू केला. हे सारे ५ मिनटात घडले. मी अजूनही रांगेत होतो. बाहेरचे जग मात्र इकडचे तिकडे होऊन पुन्हा तिकडचे इकडे झाले होते! मी मात्र या सगळ्या प्रकाराने थक्क झालो होतो! याला म्हणायच तरी काय? 'मी मारल्यासारखं करतो तू लागल्यासारखं कर! ' असाच हा प्रकार होता! सामान्यांच्या साध्याभोळ्या कल्पनाविलासावर हे सरकारचंच अतिक्रमण होतं! असो! मी जास्त गोंधळात ना पडता लिंबू सरबत ना पिताही अनुभवाची तहान भागल्याच्या आनंदात रांगेत पुढे सरकलो!