चित्र

उदार झाली अर्थव्यवस्था, कुबेर शासक झाले
कशास सामान्यांची गणती, किती कफल्लक झाले?

पहा, पहा नवश्रीमंताची कितीक नगरे वसली
कुरूप पाले उठली सारी, किती विधायक झाले

महान झाला आहे भारत अशी वदंता आहे
सरस्वतीपूजक सारे, श्री, तुझे उपासक झाले

नव्या पहाटेच्या गप्पाही शिळ्या कधीच्या झाल्या
तशाच सार्‍या जाती-पाती, किती सुधारक झाले

कशी, कधी गणराज्याची मंडई बनवली आम्ही?
कसे, कधी ह्या नागरिकांचे मुकाट ग्राहक झाले?

कसा विषमतेच्या चित्राला, मिलिंद, उज्ज्वल मानू?
तसे बरे नव्हते आधीही, अता विदारक झाले