पुण्यातील रिक्षाचालकांचे रेवेन्यू मॉडेल

पुण्यात रिक्शाने प्रवास करण्याची नामुष्की आलेल्या प्रत्येकाला हा प्रश्न कधी ना कधी पडला असेल की,
पुण्यातील रिक्षावाल्यांचे रेवेन्यू मॉडेल (मराठी? ) काय आहे?
सर्वसाधारणपणे कोणताही व्यवसाय करणारा माणूस आपली वस्तू किंवा सेवा विकून त्याच्या मोबदल्यावर आपली गुजराण करत असतो. अधिक पैसे मिळवण्यासाठी अधिकाधिक लोकांना सेवा विकून आपल्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचा साधारणतः प्रत्येकाचा कल असतो. आता खालील प्रसंग पाहा
स्थळ: शिवाजीनगर स्टेशन वेळ: डेक्कन क्वीन चे आगमन
एका प्रवाशाला मॉडेल कॉलनीत कोठेतरी जायचे आहे. अंतर खूपच कमी असल्याने कोणी यायला तयार नाही. दुसऱ्या प्रवाशाला बावधनला जायचे आहे.... आता अंतर जास्ती असल्याने कुणी तयार नाही.
स्थळ काळ प्रवासाचे अंतिम स्थान काहीही बदलून पाहा. बहुतेक वेळा रिक्षावाल्याला यायचेच नसते. कुणाला सतत दहा वेळा पहिल्या फटक्यात रिक्षा मिळालेली असेल तर मी मिशी काढून देईन.
रिक्षा स्टैंडवर विचारायला गेलो, तर 'हा कोणत्या ग्रहावरचा प्राणी आला' असा प्रश्न तेथे फार महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणाऱ्यांना पडतो. मग तू-जा, तू-जा होते... कोणीतरी एक नाईलाजानेच तयार होतो.
कोणत्याही वेळी रस्त्यावरून प्रवाशी घेऊन धावणाऱ्या रिक्षांपेक्षा रिकाम्या (म्हणजे अर्थात रिक्षावाल्यासकट) धावणाऱ्या किंवा स्टैंडवर उभ्या असलेल्या रिक्षांची संख्या अधिक असते.
हे सर्व पाहून मला प्रश्न पडतो, की यांचा चरितार्थ कसा काय चालतो?
किती प्रवासी नाकारले, त्या वर त्यांना काही ठराविक रक्कम कोणी देत असतो का? पेट्रोल वाचवल्या बद्दल सरकार त्यांना काही अनुदान देते का? लोकांना स्वतःच्या गाड्या घ्यायला प्रोत्साहित केल्याबद्दल गाड्या बनवणाऱ्या कंपन्या त्यांना काही बक्षिसी देत असेल का? पैशांच्या फार मागे न लागता थोडक्यात भागवावे, असे कोणी त्यांना शिकवते का?
कुणाला अधिक माहिती असल्यास कळवावे... उत्सुकता आहे.