अमावस्या - पौर्णिमा आणि अपघात व भुते

काल आम्ही बीड ला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो.... कार्यक्रम संपवून, हॉटेल मध्ये गेलो... जेवलो आणि बॅगा उचलून बाहेर आलो... प्रत्येक जण आपआपल्या गाड्यांमध्ये बसणार तेवढ्यात खूप मोठा भयानक आवाज आला... काच फुटल्याचा, माणसाच्या ओरडण्याचा.... मागे वळून पाहिलं तर एका इंडिका गाडीला समोरून एका मोठ्या ट्रक ने धडक दिली होती... गाडीचे इंजिन व पुढचा सगळा भाग ड्रायव्हर बसलेला त्या जागेपर्यंत चेपला गेला.... आणि देव तारी त्याला कोण मारी... ह्या म्हणीला अनुसरून ड्रायव्हर ला किरकोळ जखमा झाल्या होत्या.... लोकांनी त्याला गाडीतून बाहेर काढले.... आणि पोलिसांना बोलावले... आयोजकांपैकी काहीजण आम्हाला म्हणत होते की तुम्ही सर्व कलाकारांनी निघा नाहीतर पोलिसांच्या कामगिरीमध्ये आणि ट्रॅफिक जॅम झाले तर तुम्हाला खूप वेळ थांबावे लागेल... त्यांचे म्हणणे योग्य होते.... आणि आम्हाला सर्वांना पुण्यात पोहोचायचे असल्याने आम्हाला निघायचेच होते.... ६ तासांचा प्रवास होता आणि आज आम्हा काही जणांना नोकरीच्या ठिकाणी पोहोचायचे होते... आम्ही लगेच निघालो...

हायवे ला लागलो तर समोर रस्त्यात एका ठिकाणी रक्त सांडले होते.... झाड पाला आणि काचांचेही तुकडे होते.... खुणांवरून असे वाटत होते की नुकताच अपघात झाला असावा... आमच्या ड्रायव्हर ने गाडी हळू करून जरा बाजूने घेतली... परंतु आम्ही तिथे थांबलो नाही... (बीड ते जामखेड भागात आदिवासी लोक अचानक मध्ये येऊन गाड्या थांबवतात आणि चाकू दाखवून लुटतात असे आम्ही ऐकून होतो   )

पुढे आलो तर एक गाडी अचानक रस्त्यावरून उजवीकडे उतारावर माळरानात उतरताना दिसली आणि काही क्षणात करकचून ब्रेक दाबल्याने खूप धुरळा उडाला... आम्ही क्षणभर थांबलो.... न जाणो कुणाला आपल्या मदतीची गरज असेल... पण गाडीतून कोणीतरी उतरले....  सगळे सुखरूप आहेत असे पाहून आम्ही काही न बोलता पुढे निघालो.... कदाचित ड्रायव्हर चा क्षणभर डोळा लागला असेल आणि असे झाले असेल...

आम्हाला कळतच नव्हते की हे काय चालले आहे? इतके अपघात/अपघातासारखे प्रकार का घडत आहेत आज? की हे रोजच होतात आणि आपण पहिल्यांदाच पाहत आहोत म्हणून असे वाटत आहे?

ह्या विचारतच पहाटे ६ च्या सुमारास आम्ही पुण्याच्या जवळ पोहोचलो. आणि समोर....   अजून एक अपघात.... मोठ्या ट्रक मध्ये लोखंडी सळया ठेवलेल्या असतात ना.... यू शेप मध्ये ... आणि त्या यू ची दोन्ही टोके ट्रक बाहेर लोंबकळत असतात अश्या एका ट्रक ला एका दुसय्रा ट्रक ने ठोकले होते... आणि त्या सळयांमुळे दुसय्रा ट्रक ची काच फुटली होती.... आणि थोडे नुकसान झाले होते... ड्रायव्हर ला वगैरे लागले होते की नाही मला माहीत नाही... कारण पोलिस पोहोचलेले होते.... आता फक्त पोलिस आणि हे दोन ट्रक तिथे होते...

आता मात्र आम्ही अचंबित झालो होतो... की हे का होते आहे???? आणि आमच्या ड्रायव्हर पवन ने विषय छेडला....

काल बुद्धपौर्णिमा होती.... पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दिवशी ग्रह, निसर्ग ह्यात अनेक बसल होतात आणि अपघात घडतात असे म्हटले जाते... हो हे मी सुद्धा ऐकले होते.... अमावस्येच्या दिवशी आईबाबा आणि अहो आई बाबा(सासूसासरे  ) देखील प्रवास करायला नाही सांगतात... पण पौर्णिमेबद्दल इतका विचार कधी केला नव्हता.... ह्याच्याच अनुषंगाने मग आम्ही प्रत्येकाने भुताच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली... आणि प्रत्येकालाच आपल्या ओळखीच्यांचे... नातेवाईकांचे... आणि एकाला स्वतः आलेले भुताचे अनुभव आठवले आणि ते आम्ही एकमेकांशी शेअर केले...

तुम्हाला काय वाटतं... ही अंधश्रद्धा आहे... असे अनेकांचे म्हणणे असेल... पण मी काही प्रमाणात ह्या गोष्टींवर विश्वास ठेवते....माझ्या घरच्या वातावरणाचा परिणाम असेल कदाचित... पण जसा देव आहे असं मानते तसं भूतही असेल असं मानते... कारण दोघेही मला अजून दिसले नाहीत... 

तुम्हाला कोणाला असे अनुभव आले आहेत का?