कुटुंब की करियर - काल भेटलेल्या आजोबांच्या निमित्ताने...

काल रात्री आलेल्या एका अनुभवाने मला खूप विचारात टाकल्याने मी सध्या लिहीत असलेला विषय पुढे नेण्याऐवजी आज नवीन चर्चेचा प्रस्ताव आपल्या सगळ्यांपुढे मांडत आहे....

गेल्या आठवड्यात मी "मला रोज भेटणाय्रा आजीबाई" ह्या नावाने मला आलेला एक अनुभव लिहिला होता.... काल मला पुन्हा एकदा साधारण त्याच विषयाला समांतर असा एक अजून अनुभव आला...

मुळातच निशाचर स्वभावाचे आम्ही... म्हणजे मी आणि माझा नवरा स्वप्नील.... कालही रात्री ११ वाजता घराबाहेर पडलो.... आमचा एक मित्र शशांक सौदी अरेबिया हून काही दिवसांसाठी परत आल्याचं निमित्त होतं... आम्ही पुण्यात पूर्वी ज्या ज्या ठिकाणी फिरत असू त्या सर्व जागी त्याला पुन्हा परत जाण्याआधी एकदातरी भेट द्यायचे असल्याने आम्ही काल डेक्कन बस स्टॉप जवळ बाटा च्या शोरूम समोर मोने काकांच्या अंडा भुर्जी च्या गाडीजवळ भेटायचे ठरवले होते.

दोन्ही बाइक स्टँडला लावून आम्ही त्यांवर बसलो होतो.... डबल भुर्जीची ऑर्डर दिली होती आणि गप्पा मारत होतो....   तेवढ्यात एक आजोबा, सत्तरी ओलांडलेले असावेत, साधा पांढरा शर्ट आणि काळी पँट घातलेली, खांद्यावर शबनम पिशवी आणि हातात २ पुस्तके.... घेऊन आमच्या जवळ आले...

आजोबा : पुस्तक घेणार बाळ...?

 आम्ही : एक क्षण स्तब्ध....

रात्री साधारण ११. ३० च्या सुमारास सत्तरी ओलांडलेले आजोबा अंडा भुर्जीच्या गाडीजवळ आम्हाला पुस्तक घेणार बाळ? असं विचारतील, असं आम्हाला कल्पनेतही वाटलं नव्हतं.

स्वप्नील : बघू....   (फिरकी नावाच्या मासिकाचा जून २०१० चा अंक)  किती रुपये आजोबा?

आजोबा : वीस रुपये

आम्ही ते पुस्तक विकत घेतले आणि काही वेळ एकमेकांशी काहीच बोललो नाही... खरं सांगायचं तर काही सुचत नव्हतं.... आणि बोलायला लागल्यावर आम्ही फक्त आजोबांबद्दल बोलत होतो...

रात्री इतक्या उशीरा ते पुस्तकं का विकत असतील??? विरंगुळा, रिकाम्या वेळाचा सदुपयोग, आवड म्हणून नक्कीच नाही... कदाचित परिस्थिती हे एकच कारण असावं... मुलं पाहत नसतील कदाचित.... गेल्या आठवड्यात मला भेटलेल्या आजींना जसा सकाळी चहा मिळाला नव्हता साधारण तशीच काही परिस्थिती असावी... आणि आजोबांच्या वाट्याला ही वेळ आली असावी... जगायला निदान डोक्यावर छप्पर आणि पोटाला भाकर लागतेच ना... आणि पैशाशिवाय हे मिळतही नाही... आणि पैसा हवा तर कष्ट करण्यावाचून पर्याय नाही... आणि औषधांचा खर्च तर तरुणांच्या मागूनही सुटला नाही तर आजोबांचे वय पाहता हा खर्च मागे असणारच आहे.

ह्याच सोबत अजून एक गोष्ट सांगते... मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेली... काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात आलेली... कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना माहीतही असेल...

पुण्यात नारायण का शनिवार पेठेत राहणारे एक काकाकाकू.... मुलगा अमेरिकेला गेलेला.... आणि तिथेच स्थायिक होणार होता... त्याने आई बाबांना आग्रह करायला सुरुवात केली.... की तुम्हीही अमेरिकेला चलायचं आणि आमच्यासोबत राहायचं... मी तुम्हाला न्यायला येतो आहे... सांगितल्याप्रमाणे तो आला... आणि पासपोर्ट वगैरेची तयारी केली... आणि आई वडिलांना म्हणाला... की आता आपण इथले घर वगैरे विकून टाकू... आपण आता तिथेच राहायचे... आई वडील घर विकायला तयार नसतानाही त्याने आग्रह करून फर्निचर सहीत सर्व विकायला लावले.... आणि एके दिवशी सर्व नातेवाईकांचा निरोप घेऊन काका काकू मुलासोबत अमेरिकेला येण्यास निघाल्या.... विमानतळावर त्यांना एका जागी बसवून तो "विमान वेळेवर आहे का ते विचारून येतो" असे म्हणाला आणि आत गेला तो परत बाहेर आलाच नाही....

काका काकूंनी खूप वेळ वाट पाहिली... आणि शेवटी चौकशी केल्यावर कळले की विमान तर केव्हाच गेले.... आता काय करायचे??? पुण्याला परत येण्याइतके पैसेही सोबत नसल्यामुळे त्यांनी काकूंच्या बहिणीच्या घरी फोन केला.... आणि परिस्थिती सांगितली.... बहिणीच्या मुलाने त्यांना पुण्याहून मुंबई विमानतळावर येऊन आपल्या घरी आणले... महिनाभर त्यांच्या घरी राहिल्यावर अखेरीस काहीच पर्याय नाही, राहायला घर नाही हे लक्षात आल्यावर काका काकू तेव्हापासून "निवारा" येथे राहत आहेत.... त्यांचा सर्व खर्च त्यांचा हा भाचा करतो...

अश्या घटना पाहिल्यावर, ऐकल्यावर सुन्न व्हायला होतं... समाजाची वृत्ती आणि विचारसरणी इतकी किडली आहे??? करियर म्हणून प्रत्येकाने परदेशात नक्की जावे.... आई वडीलही आपल्याला अडवत नाहीत... पण म्हणून आपली जबाबदारी इतकी विसरून जातो का माणूस??? आणि आज नाही पण उद्या हीच वेळ आपल्यावरही येऊ शकते हा विचार ही अशी मुलं कसा काय करत नाहीत??? आताचा काळ जितका ऍडव्हान्स आहे त्याहून कितीतरी पटींनी मोठे बदल आपल्या मुलांच्या वेळेस होणार आहेत... आजच्या पिढीतली मुले आई वडिलांचा विचार करत नाहीत तर पुढच्या पिढ्यांची परिस्थिती काय? आज ह्याच आई वडिलांमुळे आपण आहोत... त्यांनी पोटाला चिमटे घेऊन आपल्याला मोठं केलं.... शिक्षण दिलं... म्हणून आज आपली परदेशात जाण्याची लायकी आहे... हे आपण विसरून जातो???

मला ह्या प्रवृत्तीची चीड आहे....  तुमचे काय मत आहे?