वेडा कवी

गोल काळ्या कांचांचा काळ्या काड्यांचा किंचित काळसर छटा असलेल्या बायफोकल काचांचा चष्मा. चष्म्याआडच्या डोळ्यांत जिव्हाळा आणि नजरेंत स्वप्नें. दांत पडल्यावर येतात तसे गोलगोल उच्चार. दांत होते कीं नाहीं आतां आठवत नाहीं. दाढीमिशीला कायम चाट दिलेली. काळ्याकडे झुकणारा गहूं वर्ण. धिप्पाड म्हणतां येणार नाहीं पण तशी जवळजवळ पावणेसहा - सहा फुटांची दणदणीत शरीरयष्टी सैलसर पांढर्‍या खादीच्या धुवट सदर्‍याआड. कधीं सदर्‍यावर खादीचेंच बदामी, राखाडी वा कोनफळी रंगाचें जाकीट. शरीरयष्टीला न शोभणारा किंचित बायकी पण खणखणीत आवाज. आरस्पानी स्वरांत स्नेह आणि प्रसन्नता यांचें अनोखें मिश्रण. जवळजवळ गुढघाभर लांब सद्र्‍याखालीं तस्साच धुवट पांढरा खादीचा ढगळ लेंगा. पायांत कधीं पॉलिश नसलेले काळे पठाणी बूट तर कधीं कोल्हापुरी वहाणा. आमचे माध्यमिक शाळेतले हे सर मीं सहावींत असतांना मराठी शिकवायला आले तेव्हांची त्यांची ही मूर्ती ते त्यानंतर थेट पांच वर्षांनीं आमच्या अकरावी एस एस सी ला मराठी शिकवायला आले तेव्हांही तश्शीच होती. बहुधा त्या पांच वर्षांनंतर त्यांचा चष्माहि तोच असावा. नांव द. वि. तेंडुलकर. प्रफुल्लदत्त या नांवानें कविता करीत. मनोगतावर एके ठिकाणीं प्रतिसाद देतांना त्यांची तीव्र आठवण आली. त्यांतून पाऊस पडल्यामुळें शाळेंतले जून महिन्यातले नवीन वर्गांतले सुरुवातीचे दिवस आठवून बर्‍याच आठवणी ताज्या झाल्या म्हणून हा लेखनप्रपंच.

आमच्या वर्गावरील त्यांचा हा पहिलाच तास. प्रथम आपला परिचय करून दिल्यावर त्यांनीं नंतर पहिल्या रांगेतल्या पहिल्या विद्यार्थ्यांपासून प्रत्येकाला स्वतःचा परिचय करून द्यायला सांगितलें. कांहीं मुलें बुजरी असतात, कांहीं चांचरत बोलतात, कांहीं एरवीं धीट असतात पण सभाधीटपणा नसल्यामुळें वर्गांत सर्वांना उद्देशून बोलतांना अडखळतात, बुजतात, तर कांहीं जरा आगाऊ असतात, वाह्यातपणा, बाष्कळपणा करतात आणि बोलणार्‍याची टर उडवतात. पण प्रत्येकाशीं सरांनीं छान संवाद साधला. बुजर्‍या मुलांना घरीं कोणकोण असतें, घरांतल्यांपैकीं जास्त कोण आवडतें असे विविध प्रश्न विचारून बोलतें केलें आणि वाह्यात शेरेबाजीकडे दुर्लक्ष करून परिचय साधला. प्राथमिक शाळेंत वेगळ्या तुकडीतला सुधीर गडकरी आतां पांचवीपासून माझ्याच वर्गांत आला होता. पहिला तास परिचयांत. नेमका गडकरी कांहींतरी बोलतांना सरांना आढळला. अरे तुझं आडनांव गडकरी नसून गडबडकरी असणार बघ म्हणाले आणि आणि आम्हां सर्वांचीं मनें जिंकून बाजी मारली. अगदी साध्या कोटीनें देखील आमचा टारगटांचा वर्ग दणाणून जात असे. तेव्हांपासून कांहीं दिवस त्याला ते गडबडकरी नांवानेंच हांक मारीत. नंतर एकदां गडकरी भर वर्गांत त्यांना म्हणाला कीं मला तें गडबडकरी नांव आवडत नाहीं, मी एक चांगला मुलगा आहे. तेव्हांपासून ते त्याला वाईट वाटूं नये म्हणून पुन्हां गडकरी म्हणूं लागले, वर सर्व मुलांना आर्जवानें सांगितलें कीं याला गडकरीच म्हणा रे. दुसरे दिवशीं आम्हांला वेडा माड नांवाचा धडा होता. खूप रंगवून आणि स्वतः रंगून जाऊन धड्यांत आणि मुलांच्यात एकरूप होऊन त्यांनीं हा धडा शिकवला.

आमची शाळा ही मुलांची शाळा. म्हणजे शाळेंत फक्त मुलगे. मुली नाहींत. अशा शाळेंत मुलांच्या अंगीं जो रांगडा हूडपणा असतो तो जवळजवळ सर्वच मुलांत पुरेपूर भिनलेला. मात्र आपल्या स्नेहपूर्ण स्वभावानें सरांनीं सर्वच मुलांचें प्रेम जिंकलें. ते वर्गांत येतांच सर्व मुलें गुड मॉर्निंग वगैरे बोलून आदरानें उठून उभीं राहात. हंसून उजव्या हाताचा पंजा पसरून त्या अभिवादनाचा सन्मानानें स्वीकार करून सर आम्हांला बसवीत. मुलांची एक गंमत असते. एखादे शिक्षक कांहीं मुलांना आवडतात तर कांहींना अजिबात आवडत नाहींत. आवडते शिक्षक आल्यावर मुलें त्वरित उठून उभीं राहातात. आणि नावडते शिक्षक आल्यावर नाइलाजानें अशा तर्‍हेनें सावकाश उभीं राहात कीं जणुं ही शिक्षाच. कांहीं मुलें कधीं कधीं वाचनांत किंवा दप्तर लावण्यांत इतकीं मग्न असतात कीं सगळीं मुलें उठून उभीं राहिल्यावर त्यांच्या ध्यानांत येतें कीं सर आले. मग पांचदहा सेकंदानीं उभीं राहात. मग मस्त शेरेबाजी आणि हंशा. कांहीं खडूस सर अशा वेळीं रागावत. शेरेबाजी करणार्‍या मुलांना प्रसंगीं शिक्षा करीत व चुकून उशिरां उभें राहिलेल्या मुलांवर मुद्दामच तसें केलें असें समजून दांत ठेवीत. तेंडुलकर सर मात्र मुलांच्या आनंदांत सहभागी होत. त्यांचें एकच सांगणें असे कीं विनोद जरूर करा पण ज्याला झेंपत नाहीं वा आवडत नाहीं त्याला दुखवूं नका. मुलांनीं प्रेमानें त्यांना वेडा कवी नांव ठेवलें होतें.  एका चोंबड्या मुलानें एकदां दुसर्‍याची चहाडी केली कीं सर हा तुम्हांला वेडा कवी म्हणाला. तेव्हां ते म्हणाले कीं अरे मित्रा, आई आपल्याला प्रेमानें बंड्या, बबड्या अशा नांवानें हांक मारते तेव्हां आपण चिडतों का? नाहीं. आपल्याला तें नांव आवडतें कारण ती आपल्याला प्रेमानें तें नांव ठेवलें. तो मला प्रेमानें वेडा कवी म्हणतो, तो त्याचा हक्कच आहे, आजवर तो माझ्याशीं कधींहि उद्धटपणें वागला नाहीं, आदरानेंच वागला आहे तर मी त्याच्यावर कां रागावूं? मुख्य म्हणजे हें प्रेमानें ठेवलेलें नांव मला आवडलें. आज तो जें जेवेल तें माझें बारसें जेवला असें समजूं. हेऽऽ करून चोंबड्याची टर उडवून अख्खा वर्ग डोक्यावर घेतला आम्हीं. मुलांच्या शाळेंत चोंबड्या, चहाडखोर मुलांना चांगलाच धडा शिकवतात तसा यालाहि यथावकाश शिकवला.

मस्ती करणार्‍या मुलांशीं त्यांनीं फटाक्याशीं तुलना केली होती. दिवाळीचा आनंद जसा फटाक्यांनीं द्विगुणित होतो तसा अध्यापनाचा आनंद हा व्रात्यपणामुळें द्विगुणित होतो असें त्यांचें मत होतें. त्यामुळें सर्वच मुलांत प्रिय. फक्त बडबड करणार्‍यांना केपा वा टिकल्या, थोडी जास्त मस्ती करणारांना लवंगी फटाका, मग लाल बार, मग डांबरी फटाका आणि सर्वांत व्रात्य मुलांना ऍटम बॉंब. अगदीं टगीं, व्रात्य मुलें देखील त्यांच्या तासाला गप्प बसत व प्रसंगीं हास्यविनोदहि करून अध्ययनाचा आनंद लुटत. सहावी आणि अकरावी अशीं दोन वर्षें त्यांनीं आम्हांला शिकवलें पण त्या दोन वर्षांत फक्त एकदांच कोमटी नांवाच्या एका ऍटम बॉंबला डाव्या हातांत पट्टी घेऊन फटकावलें होतें.  मुलें हीं फुलें आहेत मग त्यांना मारणें हें फार वाईट कृत्य आहे मग मीं तें कधींहि उजव्या हातानें करणार नाहीं म्हणून डाव्या हातानें मारलें. कारण काय तें आतां स्मरणांत नाहीं. पण त्या प्रसंगानंतर त्या तासाला (३५ मिनिटांचा तास) सर रडवेले झाले होते व उद्विग्न मनस्थितीमुळें शिकवूंच शकले नव्हते. सरांच्या दणकट शरीरांत एक सजग, संवेदनशील आणि कोमल कवीमन दडलें होतें. सहावींतला तो कणखर शरीरयष्टीचा मस्तीखोर कोमटी देखील रडला. मुलांच्या शाळेंत रडणें ही गोष्ट बायकी म्हणून टग्या, व्रात्य मुलांत तरी निषिद्धच होती तरी रडला. पण लागलें म्हणून नाहीं. कधीं नव्हे ते वेडा कवी सर रागावले म्हणून. तेवढा एक दिवस सोडला तर सरांचें वर्गांतलें अस्तित्त्व हा एक आनंददायी आणि प्रसन्न असा अनुभव असे. शेवटचा लाडू ही कविता देखील त्यांनीं अशी कांहीं समरसून शिकवली होती कीं आई वारलेला एक मुलगा वर्गांत रडला होता. कवितेचे शब्द, कवी आतां कांहीं आठवत नाहीं.

संक्रांत झाली कीं मुलें आपल्या आवडत्या सरांना आवर्जून तिळगूळ देत आणि लोकप्रिय सरांजवळ भरपूर तिळगूळ जमत असे. एकदां एक बुजरा मुलगा - चंदू मांजर्डेकर मधल्या सुटीत जिन्यावरून वर येतांना त्याला हे सर खाली उतरत असतांना भेटले. 'खिशांत काय रे तुझ्या बघूं' म्हणून दरडावून त्याचे खिसे तपासले. कधीं न रागावणारे आपले आवडते सर विनाकारण ओरडले म्हणून त्याला वाईट वाटलें आणि तो रडकुंडीला आला होता. कांहीं वेळानें त्याला खिशांत तीळगुळाची पुडी आढळली आणि त्याची कळी खुलली. फडके नांवाच्या एका चष्मिस्ट मुलाचे हंसरे डोळे सरांना (दोन चष्म्याआडून पाहूनहि) फार आवडत आणि तसे ते बोलूनहि दाखवत.

एखादे शिक्षक गैरहजर असले कीं त्यांच्या मोकळ्या तासाला - ऑफ्फ पिरिअडला दुसरे कुणीतरी शिक्षक येत. हेतु हा असे कीं मुलांच्या गोंधळामुळें बाजूच्या वर्गातल्या अध्यापनांत व्यत्यय येऊं नये. मुलांचीच शाळा ना ती. कांहीं सर वर्ग स्तब्ध ठेवण्यांत धन्यता मानीत. कांहीं सर वाचन करायला सांगून झोंपा काढत आणि आवाज केला तर फोडून काढत, तर कांहीं सर गोष्टी सांगत. कांहीं सर वर्गांतल्या मुलांकडून, नकला, गायन वा कथाकथन करून घेऊन वर्गांत माफक शांतता राखत. पारनाईक ऊर्फ ‘टप्पू’ सर दोन हातांत दोन खडू घेऊन खडू न उचलतां फळ्यावर चित्रें काढत. कधीं गणपती, कधीं सरस्वती, कधीं भौमितिक आकृती. दोन्हीं बाजू आवश्यक तिथें अगदीं एकसमान - परफेक्टली सिमेट्रिकल असत. अशा या मोकळ्या तासाला कधीं आम्हांला तेंडुलकर सर आले कीं मजा येई. ते फक्त विद्यार्थ्यांशीं संवाद साधून गप्पा मारीत. अनौपचारिक गप्पांतून उपदेशपर अभिनिवेष न आणतां मुलांवर संस्कार करीत. कुणालाहि कंटाळा येत नसे.  ही त्यांची हातोटी विलक्षणच म्हणावी लागेल.

परंतु गुण देण्यांत मात्र सर महाकृपण होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या प्रत्येक भाषेसाठीं आम्हांला प्रत्येक वर्षीं एकेक निबंधवही असे. यांत प्रत्येक निबंधाला दहापैकीं गुण दिले जात. एकहि चूक नसलेल्या साधारण निबंधाला सर साडेतीन गुण देत. नंतर ३.३/४, ४, ४.१/४ असे १/४ च्या श्रेणीनें गुण देत. तरीहि कितीहि चांगल्या निबंधाला सहसा ६ पेक्षां जास्त गुण देत नसत. एकदां एका निबंधाला मला त्यांनीं ६.१/४ गुण दिले होते. असे प्रसंग फार विरळा असत. तेव्हांचा माझा आनंद तो काय वर्णावा! शाळेंतल्या मुलांनीं माझें कांदळकरचें कांद्या असें लघुरूप केलें होतें. आतां कांद्याचें धिरडॅं करायला नको कां? मग इतर मुलांनीं माझ्या पाठीचें धिरडें करून माझें अभिनंदन केलें होतें. पद्धतच होती तशी आमच्या शाळेची. असो.

ते मोकळ्या तासाला आले कीं तो एक आनंदसोहळा असे हें वर आलेलेंच आहे. अकरावींत एकदां ते आम्हांला मोकळ्या तासाला आले. पण जरी ते आम्हांला मराठीला होते तरी त्यांचा विषय न घेतां त्यांनीं गप्पाच मारल्या. शालांत वर्ष असल्यामुळें अशाच गप्पा मारतांना ते एकेकाला तूं पुढें कोण होणार वगैरे विचारीत होते. त्यांना एका मुलानें बहुधा गुप्तेनें विचारलें कीं सर तुम्हांला आयुष्यांत जें कांहीं करायचें होतें तें सर्व साधलें कां? त्यांनीं सांगितलें कीं मीं जरी छोटा कवी असलों तरी कवितांचें सान्निध्य ही दैववशात मिळणारी सर्वांत मोठी ईश्वरी देणगी मला मिळाल्यामुळें सर्व भरून पावलें आहे. मला खरें तर गणित शिकवायचें होतें. पण तें शक्य झालें नाहीं. दुसरें म्हणजे जर शक्य झालें तर मला फाईव्ह स्टार हॉटेलमध्यें संगमरवरी बाथरूममध्यें गरम पाण्याचा टबबाथ घ्यायचा आहे. तेवढें एक राहून गेलें आहे पण कधींतरी योग जमून येईल अशी आशा आहे. यावरून तसेंच त्यांच्या राहणीमानावरून त्यांची आर्थिक परिस्थिति फारशी बरी नसावी असा निष्कर्ष काढावा लागतो. कवी आरती प्रभू ऊर्फ चि. त्र्यं खानोलकर यांचे देहावसान झालें तेव्हां त्यांची (खानोलकरांची) आर्थिक परिस्थिती फार वाईट होती. आमचे सर पण नक्कीच कांहीं सुखवस्तू नव्हते. किंबहुना त्यांची आर्थिक परिस्थिति माझ्या ऐकिवाप्रमाणें देखील यथातथाच होती तरी खानोलकरांच्या मृत्यूनंतर त्यांनीं त्यांच्या कुटूंबाला रु. ५,०००/- ची मदत केली होती. नंतर एकदां ते ऑफ्फ पिरिअडला आले असतां आम्हीं त्यांना विनंति केलीं कीं गणित शिकवा. तेव्हां त्यांनीं दहावीतल्या पुस्तकांतली एकदोन उदाहरणें फळ्यावर सोडवून दाखवलीं. आणि आमच्या ध्यानांत आलें कीं सरांचे फळ्यावरचें मराठी तसेंच इंग्रजी हस्ताक्षर अतिशय वळणदार आणि रेखीव आहे. अर्थात आम्हीं आगाऊपणें मिनिटभर बांकें वाजवून भरपूर दंगा केलाच. वेड्या कवीला लिहितां पण येतं असा वाह्यात शेरा कोणीतरी मारला होता आणि तो त्यांनी उमदेपणें झेलला होता. पण हा सोहळा कशासाठीं म्हणून त्यांनीं विचारलें. वा! काय मस्त अक्षर आहे! असें म्हणून पुन्हां धमाल उडवून आम्हीं पुन्हां पावती दिलीच. मराठी शिकवतांना त्यांना फळा कधीं खरडावा लागला नव्हताच. खडू, डस्टर आणि छडी हे ऐहिक कःपदार्थ त्यांना ठाऊक नसावेतच. सरांची टबबाथची इच्छा पूर्ण झाली कीं हें मात्र ठाऊक नाहीं.

अशा या कवींचा सहवास लाभणें हें भाग्य किती थोर हें तेव्हांच्या अजाणत्या वयांत (अजूनहि तशी मला फारशी अक्कल आली आहे असें वाटत नाहीं)  कळलें नाहीं. पण त्यांनीं खानोलकरांच्या कुटुंबियांना केलेल्या मदतीची बातमी वर्तमानपत्रांत वाचली आणि भरून आलें.  नंतर सरांच्या निधनाची बातमी वर्तमानपत्रांत वाचली तेव्हां अंतर्बाह्य हादरलों. आतां मनोगतावर एके ठिकाणीं प्रतिसाद देतांना एखादी जुनी, बरी झालेली जखम पुन्हां नव्यानें भळभळावी असें झालें आणि सरांच्या सहवासाच्या आठवणींचा चित्रपट डोळ्यासमोरून सरकला. मग राहवलें नाहीं आणि कळफलक बडवून विस्कळीतसें कां होईना, पांढर्‍यावर काळें केलें.