नाष्टा-ए-पाणीपुरी

पुऱ्‍यांतून पाणी पिणं काय किंवा पाण्याच्या पुऱ्‍या खाणं काय, दोन्ही एकाच
आंबट पाण्याच्या दोन बाजू. तिसऱ्‍या बाजूकडून म्हणजे रस्त्यावरून माझ्या
नजरेत तो पाणीपुरीचा ठेला भरला. तिथे उपस्थित जनसमुदायाला पाणीपुरी
गिळतांना पाहून माझ्याही पोटात कोरड पडली. वळवळणाऱ्‍या जिभेभोवती चळाचळा
पाणी सुटले. तरीही त्या पुऱ्‍यांमधल्या आंबट गोड पाण्याची पंचस्वादीय चव
जिभेला खूपच हवीहवीशी वाटली अन् त्यामुळेच की काय पाच गिर्रेबाज गोल
पुऱ्‍यांची डोकी टचाटचा फुटली! अन् फुटक्या डोक्यानिशी बशीत दाटीवाटीनं
आसनस्थ होण्याची शिक्षा त्यांना मिळाली. आणखी काय काय पहावं लागणार गं
बाई.. असा निराशावादी विचार मंथनास घेऊन महिलामंडळाच्या बैठकीसारखं त्या
कोँडाळं करून बसल्या.
तर दुसरीकडे तव्यावरचे चटके सोसत फुगलेला एक एक
छोला फोडलेल्या पुरीत सूर मारून रसातळाला जात होता. आपण पुरते गाळात जाणार
आहोत हे त्यांच्या मनीध्यानीही येत नसावे अशा थाटात ते स्थानापन्न झाले
होते. अचानक त्यांच्यावर आंबट, घट्ट चिँचपाण्याचा अभिषेक झाला अन् बिचारे
बावरून गेले. आगीतून उठून चिखलात सापडलो अशी त्यांची अवस्था झाली. विचार
करायला वेळ कुठला? मस्तकाभिषेक पूर्ण होईतोवर ते छोले पातळ तिखट रश्शात
न्हाऊन निघाले. चिकट लिंपण धुवून निघाल्याने ते थयथय नाचू लागले. परंतु हा
त्यांचा आनंदोत्सव फार काळ काही टिकला नाही कारण रश्श्यापाण्याचा इतका
भडीमार होत होता की छोले गटांगळ्या तर खात होतेच शिवाय त्यांना सामावून
घेणारी पुरीदेखील पुरेपूर ऊतू जात होती. 'आपलं डोकं फुटलं म्हणून काय झालं,
नशीब तर नाही ना फुटलं! पहा आपलं उदर किती टंच भरलंय,' या भ्रमात त्या
साऱ्‍या पुऱ्‍या एकमेकींना धक्के देत मोठ्या आनंदाने बशीत हिँदकळत होत्या,
झिम्मा खेळत होत्या.आपलं पूर्ण भरलेलं उदर हीच एका मानवप्राण्याच्या
जिव्हालौल्य नामक यज्ञातली आहुती आहे हे त्यांच्या गावी नसावं, इतक्या त्या
एकमेकीँना कोपरखळ्या देण्यात मश्गुल होत्या.त्यांचं संभाषण मी ऐकतोय हेही
त्यांना माहीत नव्हतं!
'काय छान फुगता येतं गं तुला!' एकीनं शेजारणीला
द्विअर्थी कोपरखळी मारली. ऐकणारीसुद्धा काही कच्च्या तेलातली पुरी नसावी
कारण तिनं दिलेल्या प्रत्युत्तरानं बशीत हास्यकल्लोळ उडाला. ती म्हणाली
होती, 'अग्गोबाई, तू तर पोटुशा बाईएवढी फुगलीयेस की! हा शिष्टाचार म्हणावा
की भ्रष्टाचार?' रागावून पहिलीनं दुसरीला जोराची ढुसणी दिली. त्यासरशी ती
स्वतःच मधोमध तडकली आणि सगळ्या बशीत तिचं पोट मोकळं झालं...
तिथे आणखी
काहूर माजण्याच्या आतच मोठ्या चवीनं मी एकेकीला माझ्या मुखात सामावून
घेण्यास प्राधान्य दिलं! आणि त्या पंचमस्वादी पाण्याच्या पुऱ्‍या विनाविलंब
गट्टम केल्या...