बोक्यांची काशीयात्रा...!

शंभर उंदीर खाऊन बोका चालला काशीला अशा अर्थाची हिँदी म्हण प्रसिद्ध आहेच.
आमचे
भिमाजी आप्पा साठीचे झाले तरी त्यांच्या हाती काठी न येता त्यांची तब्येत
अजूनही तरणीताठी आहे याचं सर्वांना केवढं नवल! परंतु साठी पार करताच
आप्पांनी चक्क अध्यात्मिक गप्पा मारायला सुरुवात केली. तसे पाहता तरूणपणीही
ते कुणाच्या अध्यातमध्यात नसायचेच. त्याला कारणही तसं गोडसर होतं. त्यांचं
कुटुंब जरा सैलसर होतं. म्हणजे जाडी-घेरानं नव्हे. संख्येनं मोठं होतं.
मोठं म्हणजे फारही मोठ्ठं नाही. इन मिन तीन बायका अन् प्रत्येकीची चार चार
पोरं. एवढाच काय तो त्यांचा गोतावळा. सवतीच्या पोरांना लळा लावण्यात
घडलेल्या चुकांची हजेरी देतांना त्या आप्पांपुढे चळाचळा कापत. इतका
आप्पांचा दरारा...
या तीन बायका करण्याचे कारणही मोठे मनोरंजक. एकीला
होईना म्हणून दुसरी केली. दुसरीलासुद्धा पुढची काही चिन्हं दिसेनात तेव्हा
तिसरी केली. ती देखील नियमितपणे बाजूला बसू लागल्याने म्हातारीने मनापासून
हाय खाल्ली अन् चैती पुनवेला तिघींना आप्पांच्या पदरात(की धोतरात) टाकून ती
गचकली...
योगायोग म्हणा किँवा कर्मधर्म संयोग म्हणा त्यानंतर तीनच
महिन्यांनी तिघी सवती चढाओढीने उलट्या घालू लागल्या!
म्हातारीच्या
श्राद्धालाच आप्पा तीन लेकरांचे बाप झाले. इतर लोक म्हणायचे 'दुखवटा
चांगलाच मानवलेला दिसतोय.' त्यावर आप्पा मनापासून हसण्यापलिकडे काहीच उत्तर
देत नसत. बहुदा ते त्यांच्या मनाचं गुपित अशाप्रकारे सार्वजनिक झाल्यामुळे
हसत असावेत.
त्यानंतर सलग चार श्राद्धे अशीच तिघींच्याही बाळंतपणात
गेली. पाचव्या वर्षी मात्र गावच्या आरोग्यसेविकेने तिघींच्याही नसा बंद
करण्याचे कडक पाऊल उचलल्यामुळे परलोकातली म्हातारी पोटभर जेवली. तेव्हाही
लोक म्हणालेच 'आरं भिमा,तुझ्यात खोट नव्हतीच बघ, म्हातारीतच आसल, तीच
तुम्हांला जवळ येऊ देत नसंल. तशी ती खोडीलच व्हती. बराबर का न्हाय?' यावर
आप्पा मूळापासून खो खो करीत.
डझनभर पोरं झाली पण घरचीच दहा एकर बागायती
असल्याने खायची-प्यायची कुठे कमी नव्हती. परंतु शेवटी सवती त्या सवतीच. एका
घरात तीन तलवारी राहतील कशा? तू तू मै मैँ व्हायचच. तिघीँच्या भांडणात
भिमाजीचा भलताच तोटा होऊ लागला. पूर्वी डोळ्याला डोळा न भिडवणाऱ्‍या बायका
आता त्यांच्या समोरच अद्वातद्वा भांडायच्या नवऱ्‍यावर उघड उघड हक्क
सांगायच्या. शेवटी वैतागून आप्पा शेतावर रहायला गेले. सवतीँच्या हाती
धुपाटणं आलं. शेतावर कुणी कधी यायचं याचा निर्णय आप्पा घेऊ लागले.
नवऱ्‍यानं भाकर घेऊन आपल्यालाच बोलवावं, आपल्या भाजीच्या चवीची तारीफ करावी
असं प्रत्येकीला वाटायचं. मग त्या पूर्वीसारखाच मन लावून स्वैपाक करू
लागल्या. पुन्हा त्यांची गाडी सूरावर आली रूळावरही आली. परंतु घडीघडी ठेसनं
बदलू लागल्याने गाडीचा वेगही कमीजास्त होऊ लागला.
आता पोरंही मोठी
झालीत या सबबी खाली आप्पा पुन्हा गावात आले. मात्र त्यांच्या मनात वेगळीच
योजना आकार घेत होती. शेतात त्यांनी अलिशान घर बांधलं. तिथे रहायला मिळणार
म्हणून तिघीही खुष होत्या. पण घडलं निराळंच. त्या बंगल्यात एक रुपमती
अप्सरा रहावयास आली. ती स्वतःला मेनकेचा कलियुगातील अवतार मानायची.
संगीत-नृत्य-जलसा-लावण्या यांच्या सुरांनी व ठेक्यांनी आप्पांचा मळा तृप्त
तृप्त होऊ लागला. बुवा तिथं बाई अन् बाई तिथं बाटली प्रमाणे आप्पांची
सरळमार्गी बुद्धी अशा अभक्ष्यपानाने बाटली गेली. ते जसे वहावत गेले तशी
त्यांची संपत्तीही गेली. धूर्त बायकांनी नवरा बाई बाटलीच्या नादाला
लागल्याचे वेळीच ओळखून त्याचा नाद सोडला. परंतु तत्पूर्वी नवऱ्‍याशी गोड
गोड बोलून घरादाराच्या चोख वाटण्या पदरात पाडून घेतल्या.अन् वेळ येताच
त्याला लाथाडलं. कारण तिकडे मेनकेनंसुद्धा डब्बा रिकामा झाल्याचे ओळखून
आप्पांची उरली सुरली पूँजी हडप करून पोबारा केला होता...
त्यांची ना घर
का ना घाट का अशी कुत्तरओढ होऊ लागली. जमिनीचा एवढासा तुकडा अन् तो जुनाट
बंगला एवढीच काय ती त्यांची मालमत्ता उरली. भिकाऱ्‍याची कोण चौकशी करणार?
किँवा शितं टाकल्यावरच भूतं जमतात, नाचतात याचा अनुभव त्यांना येत होता.
त्यांचे पिण्याखाण्यापुरते दोस्तही त्यांना टाळू लागले. त्यांचा गावातील
दरारा, पत नष्ट झाली. त्यांना कुणी भाव देईना. दात पडलेल्या वाघासारखी
अवस्था होऊन त्यांची मस्तीच जिरली, रुबाब संपला. अक्षरशः भीक मागायची पाळी
आल्यावर त्यांचे डोळे उघडले. आपल्याच तोऱ्‍यात गरजणारा ढग डोंगराला अडकून
धो धो कोसळावा, नष्ट व्हावा तशी आप्पांची अवस्था झाली. ते जमिनीवर आले...
अखेर
त्यांनी ऐन साठीत अध्यामाची काठी हाती घेतली. मदिरा, मदिराक्षीचा त्याग
केला. त्यांच्या बंगल्यात आता नर्तिकांचे नव्हे तर देवादिकांचे फोटो
दिसतात. लावण्याच्या ऐवजी भक्तिगीतांचे सूर निनादतात. त्यांचा बंगला म्हणजे
पूर्वीची कोठी न राहता भक्तिभावाची पेटी बनलीय. ज्या आसमंतात दारू
सिगारींचा भपका उडे तिथेच आता चंदनउटी अन् अगरबत्त्यांचा दरवळ असतो. जिथे
अपेयपानाची सुरई दिसे तिथे तिर्थाचे कमंडलू असते...
पूर्वी आप्पा ज्या
हातांनी टाळा पिटीत, शिट्ट्या फुंकीत आता त्याच हातांनी टाळ कुटतांना
दिसतात. जी बोटे चाळा करण्यात वाकबगार होती त्यांच्या नशिबी माळा जपण्याचं
भाग्य आलं होतं. पूर्वी ज्या अंगाने रांगडा असंग मांडला होता आता तेच अंग
विभूतीने विलेपित होऊन परमात्माशी सत्संग जोडीत होते...
आप्पांमध्ये
झालेला हा अमूलाग्र बदल म्हणजे चावडीवर दररोज चघळण्याजोगा विषय झालाय आता.
त्यांची त्यांच्यासमोरच टर उडवतांना अगदी लहान मुलेही म्हणतात, 'सौ चुहे
खाके बिल्ली चली हज को' यावर आप्पा पूर्वीसारखेच मनापासून हसून घेतात, कारण
त्यांच्याबाबतीत घडलेलं ते एक कटुसत्य असतं...