डाळिंब सोलण्याची कला

डाळिंब व्यवस्थित सोलणे हे मनीचं गूज खोलण्याइतकंच कठीण काम असतं. मधुमिठास
बोलणे काय किंवा इच्छित निसरगाठी खोलणे काय दोन्ही गोष्टी एकाच पाटातून
वाहणाऱ्‍या! त्या वाहत्या, खळाळत्या प्रेमजलात (किंवा जालात म्हणा हवं तर)
संबंधित प्रेमीजन कसे-किती-कोठवर वहावत जातील याचा अंदाज भल्याभल्यांनाही
येत नसतो. पाटाने वहिवाट मोडल्यावरच भानावर येणं होतं!
तद्वत डाळिंब सोलण्याअगोदर आत काय दडलंय? टिप्पूर दाणे आहेत की नुसताच
भुललासी वरलिया रंगा असा प्रकार आहे, याचा अदमास ना चाकूला असतो ना काकूला.
डाळिंब विक्रेती काकू कितीही म्हटली की ते झाडावरच टचकन् फुटलंय, यावर
पटकन विश्वास ठेऊ नये बंधूंनो. कारण तसं फट्ट फुटायला आधी ते तट्टपणे भरात
यावं लागतं. आजकालच्या हायब्रीड मातीत अन् खतातही ती कला नाहीये मित्रांनो.
गावरान मेवा आता पहिल्यांदा परदेशी परागंदा होत असतो. त्याउलट विलायती
मालाला विचारणारा ग्राहक आपल्याशिवाय दुसरा कोणीच नसतो!
तसे पाहता 'ज्याच्या हाती कला तो माणूस भला' असे म्हणतात, (म्हणजे सद्यातरी
मीच म्हणतोय) ते काही खोटं नाही. कलाकार मंडळी कोणावर कसा 'वार' करतील हे
सांगता येणार नाही. त्यात शब्दांचा 'मार' तर असतोच शिवाय अभिनयाचा 'विखार'
देखील असतो. किंबहुना ज्याला वार करता येत नाही तो कलाकार नव्हेच असं
म्हटल्यास वावगं ठरू नये. आता हेच पहा ना, मला मला म्हणणारे कितीतरी नेते,
अभिनेते, चित्रकार, लेखक इ. कलाकार मंडळी पदोपदी उगवतात, तिथेच कोमेजतातही.
परंतु दुनिया त्यांनाच डोक्यावर घेते जे वर्म ओळखून मर्मावर बोट ठेवतात.
अगदी तसंच हे डाळिंब प्रकरण आहे दोस्तांनो. इथे चर्महरण करून मर्म जाणायचं
असतं. डाळिंब सोलतांना आतला गाभा जसाच्या तसा उभा दिसायला हवा. केवळ नजरेनं
माल तोलून डाळिंब सोलत बसाल तर आतल्या सौष्ठवाला मुकाल. अशा नाजूक कामी
घिसडघाई करून काहीही हशील होणार नाही. त्याला साजूक तुपासारखी कलाकारी
लागते भाऊ, तेव्हाच खरी त्यातल्या अंतरंगाची अदाकारी भुरळ घालू लागते.
नाहीतर कचाकचा डाळिंब फोडणारे कैक पशू या जगात वावरतातच की! त्यात आपली
गणना होऊ नये म्हणूनच डाळिंब सोलण्याची कला प्रत्येकाच्या ठायी असणे
अनिवार्य ठरते...
प्रथमतः डाळिंब उभे धरावे. (आडव्यात शिरण्याचे कारण नाही. लिंबासारखे
कशालाही आडवे कापून डाळिंबाचा रसाळपणा घालवण्यात मजा नसते.) उभे म्हणजे देठ
खाली, फुलोरा वर अशा पद्धतीने धरल्यामुळे डाळिंबाची साल सोलणे सुटसुटीत
होते. प्रथम फुलोरा मुळातून गोलाकार कापून काढावा. खरे तर डाळिंब हा अनेक
फळांचा घड असतो. त्यातील प्रत्येक दाणा हा स्वतंत्र फळ असते. म्हणूनच
फुलोऱ्‍यालाही मूळ असते. ते व्यवस्थित कापले की आतमध्ये आऱ्‍यांप्रमाणे पाच
ते सात पापुद्रे परिघाकडे गेल्याचे दिसतात. बरोब्बर याच पडद्याच्या दिशेने
साल उभी देठापर्यँत चिरावी. त्यासाठी चाकूचे टोक पेनासारखे धरून खूप खोलवर
टोक जाणार नाही याची काळजी घेत केवळ त्वचा कापली जाईल अशी चीर द्यावी.
प्रत्येक पापुद्रा असाच रेखित जावा. एकूण पाच ते सात चिरा झाल्या की हाताचे
दोन्ही अंगठे कापलेल्या फुलोऱ्‍याच्या मुळात रोवून दाणे फुटू न देता एक एक
भाग मोठ्या कौशल्याने उलगडावा. मग पहा ती डाळिंबाची अनोखी अदा. फुललेल्या
कमळासारखे ते दिलखेचक लालगुलाबी रूप तुम्ही पहातच रहाल. ते सतेज कोवळाले
पाणीदार दाणे खाण्याचे भानसुद्धा राहणार नाही दोस्तांनो, भानसुद्धा राहणार
नाही.
तेव्हा एकदातरी डाळिंब सोलून बघाच...