पेपराचं फेफरं

एखाद्या गोष्टीचं अतिरेकी वेड किंवा छंद उफाळला की 'आलं का फेफरं?' असा
प्रश्न ग्रामीण भागात विचारला जातो. आमच्या पेपराचं फेफरं असंच नाक
मुरडण्यासारखं. पेपर म्हणजे परिक्षेच्या उत्तरांचा अथवा प्रबंधाचा नसून
आमच्यालेखी 'समाजमान' आणि 'भान' या संबंधाचाच आहे.
कालच्या वर्तमानाचा
भूतकाळ आज वर्णन करणारे ते एक 'पत्र' जरी असले तरी त्याला पाने मात्र अधिकच
असतात. तसं पाहिलं तर पोस्टाचे पत्र आता कालबाह्य झाल्यातच जमा आहे. 'आपली
चालू वर्षाची सदस्य वर्गणी त्वरित जमा करा अन्यथा पुढील अंक पाठविला जाणार
नाही' अशा आशयाची 'पत्रे' फलाण्या बिस्ताण्या अंकाच्या संपादकाकडून वर्षभर
येत राहतात. इतकाच काय तो पोस्टकार्डाचा संबंध उरलाय. परंतु आम्हांस वेड
लावते ते वर्तमान पत्र! हेही पत्र अन् तेही पत्रच. मात्र जमीन आसमानाचा
फरक!
सकाळी सकाळी सकाळ पाहिल्याशिवाय आमचं पान (दोन्हीही अर्थांनी)
सौ.ने हलवू म्हणता हलत नाही. 'एकदा का पेपरांत डोके खुपसले की आमच्या
ह्यांना दोन तासांचं फेफरं आलंच म्हणून समजा' असं सौँचं मुद्देसूद निरिक्षण
आहे. तीन चार कप चहा तिलाच बनवावा लागतो, या त्राग्याचा तो परिणाम असावा.
आम्ही मात्र न डगमगता पहिल्या ओळीपासून शेवटच्या 'उत्साहवर्धक' गोळीपर्यंत
सर्व सर्व वाचून काढतो. त्यामुळे वारंवार येणारा तपशील तोंडपाठ झालाय.
म्हणूनच सदरहू गोळीची सेवनमात्रा जाहिरातवाल्याने कशी हप्त्या हप्त्याने
वाढती ठेवलीय, हे आम्ही सप्रमाण सिद्ध करू शकतो. नंतर वाटतं, जाऊ द्या
त्यालाच बिचाऱ्‍याला गुण येत नसेल म्हणून इतरांना जादा डोस घेण्याची शिफारस
करीत असावा!
एकदा शेजारधर्म म्हणून आम्ही चिंतोपंतांच्या झुरळांच्या
समस्येवर पटकन पेस्ट कंट्रोलरचा बिनचूक पत्ता व फोन नंबर सांगितला तर ते
दुसऱ्‍या हप्त्यात आणखी दोघांना घेऊन आले. एकाला स्वतःवर करणी झाल्याचा
संशय होता तर दुसऱ्‍याला त्याच्या घरातील गुप्तधनाचा काटेकोर पत्ता हवा
होता. आम्ही अंतर्ज्ञानी आहोत हे चिंतोपंतांनी त्यांच्या ऑफिसात पटवून दिलं
होतं. त्यानंतर कोणालाही फुकटचे सल्ले देणं आम्ही बंदच करून टाकलं. नाहीतर
काही दिवसांनी 'मांत्रिकाला अटक' या मथळ्याखाली आमचाच फोटो पेपरांत छापून
येऊन आम्हांस खरोखरीचे फेफरे आले असते!
वाचनालयात गेलो की कोणता पेपर
वाचू कोणता नको असे होऊ नये म्हणून मी सगळेच वाचून काढतो. शेवटी मग पुढील
निष्कर्ष निघतात...
सकाळच्या प्रहरी लोकसत्ता सुरू होत असली तरी लोकमत
किंवा जनमत एक झाल्याशिवाय नवाकाळ उगवत नाही. कोणाचा सामना कोणत्या केसरीशी
आहे याची सिंहगर्जना पुढारीच करू जाणे. संध्यानंद प्राप्तीसाठी मिडडे ची
निवड करायची नसते. इ.इ.
आम्हांस प्राणप्रिय असणाऱ्‍या पेपरांत काय काय
(काय?) नसते? ज्वलंत प्रश्नांवर संपादकीय विचारांचा टाहो असतो. रोचक अन्
खोचक बातम्या सविस्तर दिलेल्या असतात. टिचकी, उचकी, फिरकी अथवा गिरकी अशा ई
कारान्त चौकटीत शेलके शब्द असतात. अंतराळात, जगात, देशात, राज्यात,
जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, खेड्यात, घरात, झोपडीत, पालात, झुडपात अन्
पालापाचोळ्यातही काय काय (काय?) घडले याचे विस्तृत विवेचन असते. भूत व
वर्तमानाचे भय वाटत असेल तर राशीनुरुप भविष्यकाळाची भाकितेही असतात. ते
कितीसे प्रत्यक्षात येतात हा संशोधनाचा भाग असला तरी केवळ राशीभविष्यासाठी
रोज पेपर खरीदणारेही महाभाग आढळतात. इतर सदरांशी त्यांना देणे घेणे नसते.
अंगात सदरा चढवण्यापूर्वी हे सदर वाचूनच बाहेर पडण्याचा काहींचा शिरस्ता
असतो. ते वाचल्याबिगर त्यांना रस्ता घावत नाही, एकंदरीत असाच ठाम विश्वास.
कोणाकोणाला छोट्या जाहिरातीत मोठा रस असतो. काहीजण आपल्या आवडत्या
लेखकांना कात्रीत पकडून अक्षरशः फाडून काढतात. त्यांची कात्रणे मोठ्या
भक्ति'भावा'ने (रद्दीच्या) वहीत चिकटवतात. पुढेमागे ते साहित्य कोणत्या
भावाने जाईल हे सांगणे न लगे. काहींना पेपरातले शब्दकोडे भुलवते. शब्दांचा
भुलभुलय्या त्यांना प्रिय वाटतो. गृहिणींसाठी खास पान आरक्षित ठेवलेले
असते. त्याठिकाणी हस्तकला, पाककला, संगोपनकला असे जिव्हाळ्याचे अन्
बाललळ्याचे विषय रंगवलेले असतात. काही पेन्शनर आज कोठे कोठे (कोठे?) काय
काय (काय?) 'मोफत/विनामूल्य/ऐच्छिक देणगी' मूल्याचे मौलिक कार्यक्रम आहेत
हे आपल्या जाडभिंगीतून धुंडाळत बसतात. तरुणांना लक्ष्य करीत अनेक छोट्या
मोठ्या जाहिराती 'नेमक्या' जागी पेरलेल्या आढळतात. कुटुंबातल्या प्रत्येक
सदस्याला काहीतरी वाचनीय/शोचनीय मिळावे या सदहेतूने चौकटींची आखणी केलेली
असते.
अशाप्रकारे पेपरवालेसुद्धा आता व्यावसायिकतेच्या शिखरावर आहेत.
एकाने पेपरची किंमत नाममात्र ठेवली की दुसरेही तिच्या निमपटीत विकणार.
सर्वात स्वस्तात मस्त अन् वेळोवेळी फस्त केले जाणारे रास्त साहित्य कोणते
असेल तर हे वर्तमानपत्रच होय. तेव्हा पेपराचं फेफरं जरूर येऊ द्यावं...
जयन्यूज,
जय पेपराष्ट्र!