एकटी मामी आजी...

शहराचा मध्यवर्ती, गजबजलेला भाग. दिवसाचे चोवीस तास लोकांची वर्दळ. काही भागात जुन्या मोडकळीला आलेल्या पण जुन्या माणसांइतक्याच कणखर चाळी आणि मध्यभागी मारुतीचं देऊळ. याच वस्तीतील एका चाळीत आमची एक मामी आजी राहात असे. गल्लिच्या रस्त्यावर उजवीकडील कोपऱ्यात एक बांगड्यांचं दुकान होतं. त्या दुकानाला लागून आजीच्या चाळीकडे जाणारा बोळ होता. एकावेळी जेमतेम एकच माणूस जाऊ शकेल इतका रुंद आणि बाराही महिने सुर्यप्रकाश अजिबात पोहोचणार नाही अशी काळजी घेऊन बहुतेक तो बोळ बांधला असावा. बोळाच्या दोन्ही भिंतींवर कायम शेवाळं साठलेलं असायचं. चालताना फारच काळजी घेऊन चालावं लागे. जरा अंदाज चुकला की पाय भरलाच म्हणून समजा. एवढ्याशा बोळात अतिशय सिस्टमॅटिकली प्रातर्विधी उरकणाऱ्या लोकांना मी सलाम करतो.

बोळ ओलांडला की डाविकडची खोली आजीची. हल्ली ती एकटीच असायची. नवरा गेल्यापासून तिच्याकडे फारसं  कोणाचं येणं जाणं नव्हतं. आम्हीच महिन्यातून एखादी चक्कर टाकायचो. जेमतेम दोन खोल्या. बाहेरची एक आणि स्वयंपाकघराची दुसरी. काय विचार करून खोल्या बांधल्या होत्या कुणास ठाऊक. कुठुनही उजेड यायला जागाच नाही. स्वयंपाकघरातच मोरी. एका कोपऱ्यात देवघर. त्यातही भिंतिवरची दत्ताची आणि रामाची तसबीर प्रामुख्यानं लक्ष वेधून घ्यायची. सतत कसला तरी कुबट वास यायचा त्या खोलीत. त्यात पुन्हा घरी मूल बाळ नाही. अशा वातावरणात मामी आजी एकटी राहायची. आजोबा असताना आम्ही किती तरी वेळा त्यांना घर बदलायला सांगितलं होतं. पण शेवटपर्यंत त्याचा काही उपयोग झाला नाही.

त्यांच्या शेजारी एक गुजराथी कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबातल्या गुजराथी भाभीचं मात्र आजी कडे रेग्युलर येणं जाणं असायचं. त्यामुळे भाभी आम्हाला चांगलीच ओळखायची. बऱ्याचदा ती म्हणायची, ''अरे बाबू, तुझ्या मामीला घेऊन जा ना इथून. तेला काही पण समजत नाही. किती दिवस ती असा अकेली राह्येल. काही झाला तिला तर आम्हाला भी लवकर कळणार नाही. समझतो नथी तमे.'' शेजारी या नात्यानं आजीची भाभी खूप काळजी घ्यायची. नवरा गेल्यावर आलेला एकटेपणा, मूलबाळ नसणं या गोष्टी आता आजीला सहन होत नव्हत्या. तिची तब्येतही बिघडायची अधून मधून. तिची एकंदरीत अवस्था पाहून माझ्या आईवडिलांनी तिला काही दिवस आमच्या घरी आणायचं ठरवलं.

एका शनिवारी मी आणि बाबा तिला घरी घेउन यायला म्हणून गेलो. ती आवरून बसली होती खरी पण पाय काही घराच्या बाहेर पडेना. बाबांनी तिला विचारलं, ''काय झालं गं? निघुया ना?'' मामी आजी रडत होती. भाभी निरोप द्यायला आली आणि  बाबांना म्हणाली, ''अरे ते असाच रडते मदी मदी. चाळीस वरस झाला तेला इथे राहून. त्ये नारायण होता तवा सगला ठीक होता. पण आता लई एकटा झाला मामी. मामी, थोडा दिवस बाबूकडे जा. तुझा नशीब चांगला आहे म्हणून बाबू तुला बुलावते. तो तुझा सगा भाऊ लोक पण तुला विचारते नाही. गांडा पुढे पण विचारेल नाही. समदा हरामी आहे ते लोक. घराची चिंता काय करते तू. गांडी हाय काय तुझे जवळ चोरी व्हायला? आणि मी हाय ना. तु आरामात जा. एक काम कर. हे पचास रुपया ठेवून दे तुझे जवळ. काय ते शेव, गाठी, जलेबी घेऊन जा बाबूकडे. असा नुसताच काय जाते? जा. रडू नको बिलकुल.'' भाभीच्या डोळ्यातलं पाणी मी पाहिलं. शेवटी चाळीस वर्षाची सोबत. नाही म्हंटलं तरी जीव अडकतो माणसांमध्ये.

आजी घरी आली. दोन तीन दिवस खूपच मजेत होती. इतकी खूष होती की औषधही घ्यायला विसरली. चौथ्या दिवशी रात्री आम्ही असेच गप्पा मारीत बसलो होतो. आजी आजोबांच्या गमती जमती सांगत होती. इतक्यात बेल वाजली. आई दार उघडायला उठणारच आणि आजीला काय झालं कुणास ठाऊक. हॉलमध्ये असलेल्या पलंगाकडे सरकली. प्रचंड घाबरली होती. स्वतःशीच बडबडत होती. ''सांग त्याला. मी येणार नाही म्हणून. सारखा येतो मेला. एकदा सांगून कळत नाही का? मला नाही जायचं त्याच्याबरोबर. बंड्या, दार उघडू नकोस अजिबात.'' आम्हाला काहीच कळेना. बेल वाजतच होती. शेवटी मी दार उघडलं तर शेजारचा मित्र होता. त्याला बघून आजी एकदम ओरडली, ''ए, बाहेर हो. चल नीघ इथून. बंड्या याला आधी घालव. अजिबात मी जाणार नाही याच्याबरोबर.'' मित्र एकदम घाबरलाच. त्यानं खुणेनीच विचारलं, ''कोण रे?'' मीही त्याला बाहेर जाण्याची खूण केली आणि स्वतःही बाहेर गेलो.

थोड्या वेळानं घरी आलो तर आजी आमच्या स्वयंपाकघरात देव्हाऱ्याजवळ घाबरून बसली होती. स्वतःशी काहीतरी पुटपुटत होती. जवळ जाऊन मी ऐकलं तर म्हणत होती, ''नारायणा, तू माझा नि मी तुझी. बाकी मला कोणी नाही.'' सारखं हेच चालू होतं. आमच्यापैकी कोणाचाही धीर होईना जवळ जाऊन काही सांगायचा. शेवटी धीर करून आईच गेली. तिला जवळ घेऊन म्हणाली, ''अगं कोणी कसं नाही? आम्ही आहोत की. चल आत जाऊन झोपू आपण.'' आजी काही ऐकायला तयार नव्हती. तिचा आपला जप चालूच होता. तास दीड तास मोडला तरी आमच्या प्रयत्नांना काहीच यश आलं नाही. मग बाबा आईला म्हणाले, ''अगं जरा ऐक मी काय सांगतो ते. एक काम करूया. आज मामीला इथेच गादी घालून देऊ. तूही इथेच झोप आज तिच्याबरोबर. म्हणजे तिला त्रास होणार नाही. तुझही लक्ष राहील. मामीला भलताच काहीतरी भ्रम झालेला दिसतो. नक्की काही कळत नाही. आत्तापुरतं असंच करा. उद्या पाहू काय ते. आणि हो, तू रे, बाहेर कुठे काहीही बोलायचं नाही या प्रकाराबद्दल.'' शेवटचं वाक्य बाबा मला उद्देशून म्हणाले.

त्या रात्री आजीचा डोळा लागलाच नाही. तोंडानं अखंड जप चालू होता. सारखं तेच वाक्य. 'नारायणा, तू माझा......' माझ्याही डोक्यातून ते वाक्य काही केला जाईना. दुसऱ्या दिवशी दुपारी आजी कशीबशी झोपली. तेव्हासुद्धा अधून मधून दचकून जागी होत होती. सारखा तिला बेल वाजल्याचा भास होत होता. आई बाबा आणि मी पुढे काय करायचं याचा विचार करीत होतो. बाबांना एकदम आठवलं आणि त्यांनी आजीच्या सख्या भावांचे नंबर शोधायला म्हणून डायरी काढली. तिला एकूण तीन भाऊ होते. तिघेही सुस्थितीत असून चांगल्या ठिकाणी तिघांचे फ्लॅटस होते. बाबांनी मोठ्याला फोन लावला. पलिकडून आवाज आला, ''हं, बोलतोय. दिगू कुलकर्णी बोलतोय. बोला. कोण आपण?'' बाबा म्हणाले, ''मी विजय देशपांडे. ओळखलंत का? मामी सध्या आमच्याकडेच आहे. तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं.'' पलिकडून उत्तर आलं, ''विजय म्हणजे.... बंड्या का? सुधाकरचा मुलगा ना? हां हां. बोला बोला. आमची कशी काय आठवण आली?'' दिगूचं असं बोलणं स्वाभावीकच होतं. आमचा आणि त्यांचा फार काही संबंध नव्हता.

बाबांनी थोडक्यात सगळं दिगूच्या कानावर घातलं. त्यावर दिगू म्हणाला, ''हे बघ बंड्या, माझं वयही काही कमी नाही. सहासष्ठावं लागलंय मला आता. गुडघेही दुखतात. अरे मी जरी बहिणिला ठेवायला तयार झालो तरी या दिवसात सून-मुलगा तयार व्हायला हवेत ना. घरात दोन नातवंडही आहेत. यमूला इथे आणली आणि तिचे भास वगैरे प्रकार इथे चालू झाले तर मुलं घाबरायची. अरे बाबा हल्ली मुलांच्या कलानं घ्यावं लागतं. सध्या तरी मी काहीच करू शकत नाही. तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो. पूर्वी अगदी रेग्युलर जायचो मी यमुकडे. नारायणपंतांचा स्वभाव काय होता तुला माहितीच आहे. एकदा गेलो संध्याकाळी यमूला आणायला तर पंत म्हणाले, 'दोन दिवसात आली पाहिजे घरी. वाट्टेल ते भरवायचं नाही बहिणीला. खरं तर लग्न झाल्यावर मुलीला माहेर संपलं. तरी केवळ यमुची इच्छा म्हणून पाठवतोय. जरा आता बहिणीला एकटं सोडा यापुढे.' असं म्हंटल्यावर मी अंगच काढून घेतलं. पुढे एकदा यमूनंच मला बजावलं, 'दिगू, यांच्या मर्जीविरुद्ध मी काही करणार नाही. तुम्ही काही जास्त फंदात पडू नका.' तूच सांग मला, आता आम्हाला तरी का वाटावं बहिणिबद्दल? यापुढे आता धक्के पचवण्याची आणि टेंशन घेऊन जगण्याची मला इच्छा नाही.''         

या संभाषणाचा सरळ अर्थ म्हणजे 'जमणार नाही' इतकाच होता. दुसऱ्या भावाला फोन केल्यावर झालेल्या संभाषणातूनही 'जमणार नाही' हेच आम्हाला उमगलं. तिसऱ्याशी संपर्क होऊ शकला नाही. नंतर कळलं की तो परदेशात असतो. त्यामुळे त्याचा आपसुकच निकाल लागला. आता काय करावं याचा विचार करून करून आम्हाला काही सुचेना. शेवटी आमच्या फॅमिली डॉक्टरना म्हणजे डॉ. पंडितांना बोलावून घेतलं. डॉक्टर आले त्यावेळी आजी वेगळंच काहीतरी बोलत होती, ''अरे तुला काय वाटलं? काळ्या कपड्याला मी घाबरते का? मी नाही घाबरत. नारायणा तूच आहेस रे मला. घरी गेले ना की बघते एकेकाला.'' नंतर 'घरी जायचंय' हा एकच ध्यास आजीनं घेतला. शेवटी डॉक्टर म्हणाले, ''यांना सरळ घरी घेऊन जा. अधून मधून लक्ष ठेवा. हा सगळा एकटेपणाचा परिणाम आहे. फार वर्ष एकटं राहिल्यावर माणसाला हे असे भास होतात. त्यांना जास्त माणसात राहायची सवय नसते. माझा तुम्हाला स्पष्ट सल्ला आहे. यांना घरी जाऊ द्या. फार तर आठवड्यातून दोन तीन फेऱ्या मारत जा. नेहमीची औषध चालू ठेवा. उगीच जास्त हेवी डोस देऊन काही उपयोग नाही.''   

आता आजीला पुन्हा एकटं घरी ठेवायचं म्हणजे आम्हाला जरा विचित्र वाटत होतं. तिचा तर सारखा जप चालू होता. 'मला घरी जायचंय, माझ काय व्हायचं ते घरीच होऊ देत. नारायणा तू आहेस म्हणून रे बाबा.' दिवसभर हे ऐकून आम्हाला सुद्धा हळू हळू त्रास होऊ लागला. पण एकटं घरी पाठवण्याचा धीरच होईना. त्यात भरीस भर म्हणून एक दिवस आमच्या नकळत आजी घराबाहेर पडली. झालं, आमचा जीव अक्षरशः टांगणीला लागला. पोलीसात तक्रार करावी या विचारातच आम्ही होतो आणि नेमकी त्याच वेळी बेल वाजली. दार उघडून पाहतो तर माझा शेजारी मित्र आणि आणखी चार पाच लोक आजीला घेऊन उभे. आजी तर पुरती भिजली होती. आम्ही काही बोलणार इतक्यात मागून एक हवालदार साहेब येताना दिसले. मी मित्राला विचारलं, ''काय रे विनीत तुला कुठे भेटली आजी?'' त्यावर तो म्हणाला, ''अरे मला नाही भेटली. मी तळ्याच्या बाजूला बाईक लावली होती आणि एटीएममध्ये पैसे काढत होतो. बाहेर आलो तर माझ्या बाईकजवळ गर्दी दिसली. म्हंटलं झालं तरी काय? बघतो तर, आजी ओल्याचिंब अवस्थेत उभ्या. हवालदार आणि इतर लोक आजींना विचारत होते. कुठे राहता, काय करता वगैरे. मीच हवालदार साहेबाना म्हंटलं की मी ओळखतो आजींना. म्हणून त्यांना घेऊन घरी आलो.'' आम्ही विनीत आणि हवालदार साहेबांना आत बोलावले. बाकीच्या लोकांना पाणी वगैरे देऊन त्यांचे आभार मानले.

हवालदार साहेब चहा घेता घेता म्हणाले, ''काय साहेब? आजी कुठे चालल्या होत्या माहित आहे का? जीव द्यायला चालल्या होत्या तळ्यात. नशीब लोकांचं लक्ष गेलं. या तुमच्या आई का सासुबाई?'' ''अहो नाही साहेब. माझ्या नातेवाईक आहेत. आय मीन माझी मामी.'' बाबा म्हणाले. हवालदार पुढे सांगू लागले, ''अहो साहेब, नशीब त्या टपोरी लोकांचं लक्ष गेलं. म्हातारीनं उडी घेतली की राव तळ्यात. एकानं पटकन तळ्यात उडी मारून बाहेर काढली म्हणून वाचली म्हातारी च्यामायला. नाही तर आटपली असती. तुम्ही काळजी घ्यायला हवी साहेब. तुमचे शेजारी नेमके तिथे होते म्हणून पत्ता तरी सापडला. नाही तर पोलीस स्टेशनला न्यावी लागली असती. चला ठीक आहे. पण काळजी घ्या. वहिनी, चहासाठी आभारी आहे. येतो मी.'' नशीब हवालदार साहेब चांगले होते. आमच्याच एरीयात राहणारे होते. काहीतरी बाबांची ओळख निघाली म्हणून बरं झालं. नाहीतर पोलीस स्टेशनला जावं लागलं असतं.   

आम्ही आजीला झाल्या प्रकाराबद्दल विचारलं, ''काय मामी? काय झालं नक्की?'' त्यावर ती म्हणाली, ''अरे, सकाळी मला नारायण म्हणाला. मी तळ्यावर वाट पाहतोय. लवकर ये. म्हणून गेले बघ. लोकांना चांगलं बघवत नाही रे. लगेच मला तळ्यातून बाहेर काढली. मी म्हणाले त्यांना, अरे मी माझ्या नारायणाकडे जात्ये. मला जाऊ द्या. अजिबात ऐकलं नाही. लगेच तुमचा फौजदार पण आला. छे. चांगली निघाले होते. पुढच्या वेळी मात्र नक्की जाणार. मग फौजदार येवो नाही तर आणखी कोणी.'' त्या दिवशी पहिल्यांदा आम्हाला मामी आजीची चांगलीच भीती वाटली. आई म्हणाली, ''अहो कसं काय ठेवायचं हिला एकटीला? डॉक्टरांचं काय जातंय सांगायला? काही बरं वाईट झालं म्हणजे काय करायचं?'' बाबांनाही ते पटत होतं. पण आजी ऐकायलाच तयार नाही. तिचा एकच हट्ट चालू होता. 'घरी जायचंय, नारायणाकडे जायचंय.'

लहान मुलं आणि म्हातारी माणसं दोघांनाही समजावणं म्हणजे खरंच कठीण आहे.

एक दोन आठवडे असेच गेले. मामीचा हट्ट कमी होण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती. मध्ये दोन तीन वेळा डॉ पंडीतही चेकप साठी येऊन गेले. त्यांनी पुन्हा तेच सांगितलं. एक दिवस भाभी आमच्याकडे आजीला भेटायला आली. भाभीला पाहून आजी अगदीच भान विसरली. तिला वाटलं की भाभी आपल्याला न्यायलाच आली. भाभीला सुद्धा तिला पाहून भरून आलं. ती बाबांना म्हणाली, ''बाबू, हे बुढ्ढीचा काय बी खरा नाय. समदा रिश्तेदार लोकनी हिला एकटा केला. एक तूच भला माणस निघाला. पण मी तुला एक बोलते तेवढा माझा ऐक तू बेटा. मी पण तुझ्या आईच्या उमरचा हाय. आता हिला हिच्या घरला जाऊ दे. ते काय हाय ना, एक टायम बुढ्या माणसला डोक्यामदी एखादा गोष्ट बसला का मग ते ऐकेल नाय. आता या उमरमंदी काय तेला आपण तरास द्यायचा. तुला जमला तेवढा तू खूप केला. पण बाबू, तू माणसचा नशीब तर नाय ना बदलू शकेल. एटले मी हेला आता घेऊन जाते. तू काय जास्ती फिकर करू नको. मी पण हाय ना तिच्यासंगती. चल हेचा सामान भरून टाक.''

भाभी आजीला शेवटी बरोबर घेऊन गेली. आजी गेल्यावर आम्हाला चैन पडेना. आई बाबांना सारखी तिची काळजी. तरी मी, आई आणि बाबा आठवड्यातून दोन तीन वेळा आजीकडे फेरी मारायचो. तिची तब्येत जरा बरी दिसत होती. स्वतःच्या घरी आल्यामुळे असेल कदाचीत. भाभीकडूनही खुशाली कळत होती. सगळंकाही ठीक आहे अशी खात्री झाल्यावर आमच्या फेऱ्या हळू हळू कमी व्हायला लागल्या. गणपतीच्या दिवसात आम्हाला कुठेही बघायला अजिबात वेळ मिळाला नाही. मामी आजीला घेऊन या म्हणून भाभीला कळवलं पण आजी काही यायला तयार झाली नाही. भाभी मात्र दरवर्षीप्रमाणे येऊन गेली. ती म्हणाली, ''रेवानू दे आता. म्हातारा माणसच्या झंझटमध्ये तू जास्त कशाला पडते? ते हाये तभीतक ठीक हाये. आता तेचा तबियत पण ठीक हाये. काय झाला तर मी फोन करेल तुला. तू काय पण काळजी नको कर.''

गणपती झाल्यावर दसऱ्याच्या सुमारास आम्ही तिघेही सिमला कुलू मनाली ट्रीपला पंधरा दिवसांसाठी गेलो. परत आलो तर छान ट्रीप झाल्याच्या मूडमध्ये आणि इतर काही फंक्शन्स ऍटेंड करण्यामध्ये मामी आजीकडे जायला सवडच झाली नाही. दिवाळीच्या तीन चार दिवस आधी भाभीचा फोन आला. ती म्हणाली, ''अरे बाबू, तू हाय कुठे? कुठे असेल तर ताबडतोब ये. तुझा मामी नाय राह्यला. जल्दी कर.'' आम्ही तिघेही तसेच मामी आजीकडे निघालो. तिच्या घराच्या बाहेर थोडी गर्दी दिसली. जी काही होती ती आजूबाजूची माणसं. नात्यातले फक्त आम्हीच. घराचा दरवाजा बंद होता. भाभी आली आणि म्हणाली, ''बाबू, अरे काय झाला काय पण कळला नाही. सकाळीपासून काय पण आवाज नाय काय नाय म्हणून मी दरवाजाला धक्का मारला तर आतमध्ये मामी तसाच झोपलेला. त्ये पण एकदम उघडा. अंगावर एक पण कपडा नाय. मग बोडीला हात लावला तर एकदम बरफ. तवाच मला समजला. तू पण बघ जा.'' आम्ही आत गेलो तर आईला सगळं पाहून चक्कर यायला लागली. ती भाभीच्या घरी जाऊन बसली. काहीच कळेना. आजीच्या अंगावर कपडे का नाहीत. रात्री तशीच झोपली की काय? नक्की काय प्रकार.

बरं आदल्या दिवशी कोणी आल्यागेल्याचंही कुणाला काही कळलं नाही. थोडासा स्टोव्हचा आणि रॉकेलचा वास मात्र येत होता. आग वगैरे लागली असती तर शेजारच्यांना नक्किच कळली असती. मामी आजी मात्र पलंगावर निपचीत पडून होती. थोड्या वेळात बाबांना स्टोव्हवर भाताचं पातेलं दिसलं. त्यात भातही होता. रॉकेलची बाटली आडवी झाली असावी. त्यामुळेच वास पसरला होता. जास्त विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता. आजीच्या अंगावर एक साडी कशीबशी लपेटली. डॉक्टर पंडितांना बोलावलं. ते म्हणाले, ''कुठे काही जखम दिसत नाही. लागल्याची, भाजल्याची कुठलीच खूण नाही. जाऊन साधारण सहा सात तास झाले असावेत. बट नथिंग सस्पिशिअस. झोपेत आलेला एखादा हार्ट ऍटॅक असावा. एक काम करूया. पोलीसांना कळवून बॉडी पोस्टमॉर्टेमसाठी जाऊ दे.''

पोलीस आले. आजीची बॉडी घेऊन गेले. आम्ही जमेल तेवढं आजीच्या घरातलं सामान  आवरत होतो. जवळ जवळ सगळं आवरून झालं. भाभी आणि तिचा मुलगा घरी गेले. मी पण बाहेरच पडत होतो. तेवढ्यात बाबांची हाक ऐकू आली. ते म्हणाले, ''अरे हे बघ.'' ''काय ते?'' मी. ''अरे या भिंतीवरच्या रामाच्या आणि दत्ताच्या तसबिरींना तडे गेलेत.'' बाबा म्हणाले. मी म्हणालो, ''गेले असतील. मग काय झालं?'' त्यावर बाबा म्हणाले, ''काही कळत नाही. मामीला स्वयंपाक करताना चक्कर आली असेल आणि ती धडपडत उठून पलंगावर जायचा प्रयत्न करत असताना भिंतीवर आदळली असेल. म्हणूनच या तसबीरी तडकल्या असतील.'' असं झालंही असेल कदाचित. पण आम्हाला मामी आजीच्या कपड्यांचं गूढ काही उलगडलं नाही.

त्यानंतर आम्ही फार वेळ तिथे घुटमळलो नाही. उगाच तर्कवितर्क करून काही उपयोग नव्हता. चार पाच तासांनी पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आला. नॅचरल डेथ असल्याचं सर्टिफिकेट मिळालं. आम्ही आजीच्या भावांना फोन केला आणि कळवलं. दोघेही येतो म्हणाले. पण मला काही आलेले आठवत नाहीत. एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे मामी आजी गेल्याचं दुखः मुळातच फार कमी लोकांना झालं होतं. ज्यांना दुखः होतं तेही काही अगदी फार रडत वगैरे नव्हते. कदाचीत मामी आजी असून नसून कोणालाही फारसा काही फरक पडणार नव्हता.

फक्त एक घर मात्र कायमचं बंद झालं. यापुढे त्या गलिच्छ बोळात जाण्याची वेळ येणार नाही या जाणिवेनं खरं तर बरं वाटायला हवं होतं पण तसं काहीच झालं नाही.......

तो बोळ कसाही असो आमच्यापुरता तो आता इतिहासजमा झाला होता........