बंद मंदिरातील धर्म..

बंद मंदिरातील धर्म.. खरं हे हे शिर्षक चुकीचेच वाटत आहे मला तर येथे
उघडा मंदिरे अथवा उघडदार देवा आता उघड दार असे काही शिर्षक द्यावे असे वाटत
आहे त्याला कारण ही तसेच आहे हा जैन धर्म.. हो मी जैन धर्माविषयी बोलतो
आहे ज्या धर्माचा शेवटचा तिर्थंकर, प्रवर्तक २५०० वर्षापुर्वी होऊन गेला व
ज्याची जयंती आज भारतभरातील जैन बांधव उत्साहाने व आनंदाने साजरी करतात तो
धर्म म्हणजे जैन धर्म. गेली हजारो वर्ष हा धर्म मंदिरात अडकून आहे.
पराकोटीच्या अहिंसेचे समर्थन करणारा हा धर्म.

jain dharma

णमो अरिहंताणं।
णमो सिद्धाणं।
णमो आइरियाणं।
णमो उवज्झायाणं।
णमो लोए सव्वसाहूणं॥

अरिहंतांना नमस्कार, सिध्दीनां नमस्कार, आचार्यांना नमस्कार, उपाध्यांना
नमस्कार व सर्व साधुनां नमस्कार अशी पाचं परमेष्ठींना नमस्कार करावयास
सांगणारा जैन धर्म !

कधी काळी तिर्थंकारांनी जैन म्हणजे काय हे सांगितले, त्यांचे कर्तव्य
काय हे सांगितले व अतिंम ध्येय मोक्ष कसा मिळवावा ह्याचे मार्गदर्शन केले.
जैन म्हणजे ज्याने मनावर विजय मिळवला आहे असा अथवा सर्वसाधारण ज्यांने
मनावर विजय मिळवला तोच जैन ! ऋषभदेव पासून महावीरांपर्यंत सर्व २४ च्या
२४ तिर्थिंकरांनी ह्याचेच सुतोवाच केले. अहिंसा हा धर्माचा मुल धर्म,
मार्गदर्शन. नमोकार मंत्र म्हणजे जिवनात नम्र रहा ह्याची शिकवण व अतिंम
ध्येय म्हणजे मोक्ष, ज्या जिवन मरण चक्रापासून मुक्ती व त्या परमशक्तीमान
अश्या देवाच्या मध्ये एकरुप होऊन मुक्त होणे. एवढे साधेसोपे तत्वज्ञान
असलेला हा धर्म बाकीच्यांना गुढ, विचित्र व वेगळा का वाटतो तर ह्याचे
महत्वाचे कारण म्हणजे हा धर्म नेहमी मंदिरामध्येच बंधीस्त राहीला पुजारी व
मुनी मंडळींनी त्याला कधी सामान्य जनतेपर्यंत पोहचू दिला नाही अथवा तसा
प्रयत्न केला नाही. सुरवातीच्या काळी ह्या धर्माला प्रचंडमोठ्या प्रमाणात
राजश्रय मिळाला, रोज रोज होणारी युध्दे व अपरिमित मनुष्य व धन हानी
ह्यापासून मुक्ती देणारा हा धर्म त्यामुळे हा शेवटपर्यंत पुर्ण राजश्रय
मिळालेला धर्म ! शक्यतो ह्याचे कारण पण हेच असावे कि २४ च्या २४ तिर्थंकर
हे राजकुमार अथवा राजा होते.

कधीकाळी जैन धर्मात मुर्तीपुजनास स्थान नव्हते पण जसा जसा धर्म वाढत
गेला तस तसे ह्यात विभाग पडत गेले व दिगंबर जैन, श्वेतांबर जैन व तेरापंथी
सारखे उपशाखा निर्माण झाल्या. ज्या तिर्थंकरांनी मोक्ष प्राप्तीसाठी घनदाट
जंगलामध्ये अथक कष्ट घेऊन तप केले त्यांना ह्यांनी मंदिरात बसवले !

खुप सुंदर अश्या संगमरवर मंदिरात अतिशय देखणी जिन मुर्ती पाहण्याचे
भाग्य हे फक्त जैनांनाच होते, व आज देखील आहे सर्व जागी नाही पण काही जागी
नक्कीच सामान्य जनतेला प्रवेश नाही दोन उदाहरणे सांगतो एक खुप आधी जेव्हा
मी अयोध्येला गेलो होतो तेव्हा...

अयोध्या, जैनाच्या पाच तिर्थंकरांचे जन्मस्थान ! हो आमचे काही तिर्थंकर
रामाचे पुर्वज तर काहीचा राम पुर्वज असे मानले जाते त्यामुळे हिंदु धर्मात
जेवढे महत्व अयोध्येचे आहे तेवढेच महत्व जैन धर्मात देखील आहे. तर अश्या
ह्या जैन धर्माच्या पंढरीमध्ये मी पाच वेगवेगळ्या मंदिरात प्रवेश करण्याचा
प्रयत्न केला तर मला मी दिगंबर जैन आहे हे सांगून सुध्दा प्रवेश नाकारला
शेवटी मला त्याला नमोकार मंत्र पठन करुन दाखवावा लागला व काही तिर्थंकरांची
नावे सांगावी लागली नशीब माझे मी जैन हॉस्टेल मध्ये शिकलो होतो म्हणून
तेवढे आठवत होते नाही तर मी जैन आहे हे सर्टिफिकेट घेऊन मला फिरावे लागले
असते.

दुसरा अनुभव, माझे काही विदेशी मित्र भारतभ्रमणसाठी आले होते त्यावेळी
त्यांना घेऊन मी मथुरा बघावयास गेलो होतो तर जाताना रस्त्यात एक जिनालय आहे
थोडेसे आड वाटेला आहे पण सुरेख असे निसर्गाच्या सानिध्यात आहे त्यामुळे ते
संदुर ठिकाण त्या मित्रांना देखील दाखवावे म्हणून तेथे घेऊन गेलो सर्व
प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली व आम्ही आत गेलो तर मला सांगण्यात आले की
बाकीच्यांना प्रवेश नाही फक्त तुम्ही जाऊ शकता. ती ट्रिप जैन मंदिर न बघताच
पुर्ण झाली हे सांगणे गरजेचे नाही.

गुडगांव मध्ये दिगंबर जैनांचे मोठे स्वामी, मुनी बाहुबली स्वामी ह्यांचा
आश्रम आहे व त्यांचे जन्मगाव हे माझे आजोळ त्यामुळे तेथे मला जरा
प्रवेशाला अडचण नव्हती मी त्यांच्याकडे गेलो व वरील अनुभव सांगून म्हणालो
असे का ? त्यांनी धर्म, पवित्रता अशी काही ठेवणीतील कारणे दिली तेव्हा मी
त्यांना भारतीय राजघटनेने दिलेले अधिकार सांगितले तर ते म्हणाले की प्रवेश
आम्ही नाकारतो असे नाही पण आमचे पुजेचे व मंदिराचे नियम खुप कडक आहेत ते
पाळले जात नाही म्हणून आम्ही थांबवतो. मग त्यांना २००१ मध्येच त्याच आश्रम
मध्ये प्रवेश घेण्यासाठी मला स्वतःला पुरावे व वाद घालावा लागला होता व
त्यांना स्वतः त्यात मध्यस्थी करावी लागली होती ह्याची आठवण करुन दिली व
त्यांना विचारले की " टिशर्ट व जिन्स घातली म्हणजे धर्म कसा बाटतो ह्याचे
विष्लेशन करा कृपा करुन." हॅ हॅ हॅ ठरले होते संध्येचे व ध्यानाचे कारण
देऊन माझी बोळवणी करण्यात आली.