प्राचार्य गेले - सरस्वतीपुत्र हरवला

 एका महाविद्यालयाचं आवार. प्राचार्य गाडीतून
उतरतात, पांढरा शर्ट, लेंगा आणि काळं जाकीट, सुरकुतलेला पण उत्साही प्रसन्न
चेहरा, आणि त्यांचे पेटंट मिश्किल हास्य, इमारतीच्या पायर्‍या चढून
येताना, त्यांच्याच व्याख्यानाचा बोर्ड समोर लावला आहे, त्याकडे क्षणभर
कटाक्ष टाकून पुन्हा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने तरातरा चालत, हॉल मध्ये
येतात. हॉल काठोकाठ भरलेला. समोरच्या तांब्याभांड्यातून थोडे पाणी पिऊन
प्राचार्य सुरुवात करतात.

"आताच येताना खाली मी व्याख्यानाचा बोर्ड बघितला. त्यावर विषय
लिहिलेला नाही. तो लिहायचा राह्यलाय असं नव्हे. पण हल्ली कुणी वक्त्याला
विषय देत नाही, दिला तर आम्ही तो घेत नाही, आणि घेतलाच तर विषयाला धरून
कुणी बोलत नाही. तेव्हा कुठल्याही एका विषयावर न बोलता तुमच्या आणि माझ्या
तारा जुळेपर्यंत मी बोलणार आहे...."

आणि त्यानंतर सतत १ तास अखंड, शांत आणि कल्लोळी, शीतल आणि दाहक असा
विचारप्रवाह, सतत संवाद साधणारा, काहीतरी हितगुज करणारा, अंतर्बाह्य निर्मळ
असा ओघवता प्रवाह. आपलं कर्तव्य, आपलं समाजातलं एक जबाबदार अस्तित्व.
अभियंता या शब्दाबरोबर येणारी एक थोरलेपणाची जाणीव हे सगळं सगळं...

काही वेळापूर्वी मित्राचा फोन आला 'प्राचार्य गेले'.. एवढं एक वाक्य
बोलून फोन ठेवावा लागला. आणि त्यानंतर पहिल्यांदा मनात दाटला तो वर
उल्लेखलेला प्रसंग. आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातलं त्यांचं हे
व्याख्यान. मी पहिल्या वर्षाला असताना ऐकलेलं. अगदी जसंच्या तसं माझ्या
समोर अगदी काल घडल्यासारखं दिसतंय ऐकू येतंय..
नंतर अशी अनेक व्याख्यानं आठवत गेली. प्राचार्यांना मी अगदी माझ्या
शाळेपासूनच ऐकतोय.. सहा आठ महिन्यातून एकतरी व्याख्यान शाळेत व्हायचंच.
शाळेत अगदी सोप्या सोप्या विषयांवर बोलायचे, खुलवून सांगायचे. नंतर त्यांना
ऐकतच गेलो, समृद्ध होतच गेलो सतत. नुसती विषयांची जंत्री द्यायची झाली तरी
त्यांच्या व्यासंगाचा आवाका लक्षात येतो. विवेकानंद, शिवछत्रपती,
संतसाहित्य, समर्थ रामदासांचे विचार, मुक्तचिंतने, समाजाभिमुख विषय आणि
बरेच काही.
अर्थात आमच्या वाट्याला प्राचार्य नेहमीच जास्त आले. एकतर फलटणपासून जवळ
आणि सातार्‍यालाच त्यांचे शिक्षण झाल्यामुळे त्यांना वाटणारी आपुलकी. मनात
अनेक भाषणं दाटून आली आहेत आता. शाळेतली, कॉलेजातली, समर्थ सदन मधली,
गांधी मैदानावरच विराट जनसमुदायापुढे केलेलं भाषण, आमच्या नगरवाचनालयाच्या
छोटेखानी हॉलमध्ये होणारी छोटी भाषणं.

एक मोठा अविस्मरणीय प्रसंग आठवतो तो म्हणजे.. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या
हस्ते शाहुकलामंदीर मध्ये झालेला त्यांचा सत्कार. आणि त्या वेळेला अत्यंत
आदराने बाबासाहेबांनी काढलेले.. " हा साक्षात सरस्वतीपुत्र आहे" हे उद्गार

खूप समृद्ध केलं ह्या माणसानं, संतसाहित्याची गोडी लावली, महाराजांचा,
विवेकानंदांचा वारसा शिकवला. खूप लहान वयात आयुष्याचा अर्थ समजावण्याचा
प्रयत्न केला, विचार शिकवला.. जबाबदारीची जाणीव करून दिली... जागल्या बनून
राहिला मनाच्या कोपर्‍यात.. सतत, ह्या अंधार्‍या जगात..

खूप खोल खोल दाटून आलंय मनात, खूप लिहायचं होतं.. लिहिताही येत नाहीये..
थांबतो..

जाऊ द्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य समृद्ध करायला
पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेऊन गेला..