खपवले तर खपते...

खपवलेतर खपते......... नाहीतर अवलोकन समितीस सामोरे जावे लागते !

श्री अशोकरावजी चव्हाण यांनी सह्याद्री अतिथीगृहावर सांस्कृतिक धोरण, मसुदा समितीचे सर्व सदस्य आणि राज्यातील प्रमुख
दैनिकांचे आणि वाहिन्यांचे संपादक यांना आमंत्रित करून ते जाहीर केले.आणि मंत्री मंडळाची मंजुरी घेतली

या कार्यक्रमाला राज्यातील प्रमुख दैनिकाचे आणि
वाहिन्यांचे संपादक यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात सर्वश्री
लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर, महाराष्ट्र टाइम्सचे अशोक पानवलकर,
लोकमतचे दिनकर रायकर, नवाकाळच्या जयश्री खाडीलकर, प्रहारचे आल्हाद
गोडबोले, नवशक्तीचे महेश म्हात्रे, टाइम्स ऑफ़ इंडियाचे डेरेक डिसा,
प्रफ़ुल्ल मारपकवार, नवभारत टाइम्सचे शचिंद्र त्रिपाठी, नवभारतचे बृजमोहन
पांडे, हिंदुस्थान टाइम्सच्या सुजाता आनंदन, स्टार माझाचे राजीव खांडेकर,
ई.टी.व्ही. चे राजेंद्र साठे, सकाळच्या मृणालिनी नानीवडेकर, डी.एन.ए.च्या
शुभांगी खापरे यांचा प्रामुख्याने समावेश होता.


सांस्कृतिक धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष आ. ह. साळुंखे, उपाध्यक्ष दत्ता
भगत यांच्यासह उल्हास पवार, डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो, वि. वि. करमरकर,
डॉ. अरुण टिकेकर, अशोक नायगावकर, गिरीश गांधी, शफाअत खान , अजय अंबेकर

मसुदा आणि  अंतीम संमत धोरणातील कलम २०

प्रसारमाध्यम अवलोकन समिती - वृत्तपत्रे, तसेच इलेक्ट्रॉनिक व अन्य
प्रसारमाध्यमे यांचे आविष्कारस्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध
आहे. या माध्यमांची अभिरुचिसंपन्नता व विश्वसनीयता टिकून राहावी आणि
वृद्धिंगत व्हावी, त्यांनी व्यवस्थेतील अनिष्ट बाबी समाजाच्या निदर्शनाला
आणण्याबरोबरच समाजात घडणार्‍या विधायक घडामोडींचे दर्शन घडवावे, अशी
अपेक्षा असते. या दृष्टीने, त्यांच्याद्वारे प्रकाशित होणारा
मजकूर/जाहिराती यांचे नियमित अवलोकन होणे अत्यावश्यक बनले आहे. याकरिता
एका समितीचे गठन करण्याची गरज आहे. प्रत्येक प्रकारच्या माध्यमाच्या
प्रतिनिधींनी आपणहून स्वयंशासनाच्या उद्देशाने अशी समिती स्थापन करावी, हे
इष्‍ट ठरेल. काही कारणाने असे घडण्यात अडचणी येत असतील, तर शासन अशा
प्रकारची समिती स्थापन करील. या समितीत माध्यमांचे प्रतिनिधी,
लोकप्रतिनिधी, न्यायपालिकेचे प्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, वाचक व प्रेक्षक
यांचे प्रतिनिधी आणि शासनाचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्‍याबाबत दक्षता
घेण्‍यात येईल. एखाद्या प्रसारमाध्यमातून जाणता-अजाणता सामाजिक सौहार्द
बिघडेल अथवा शांतताभंग होईल अशा प्रकारचा अथवा इतर काही दृष्टींनी
समाजविघातक मजकूर/दृश्ये प्रकाशित/प्रसारित झाल्यास समिती स्वत:हून अथवा
कोणी ती बाब समितीच्या निदर्शनास आणल्यास त्याची दखल घेईल आणि भविष्यात या
प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित प्रकाशनाचे मालक/ संपादक
यांच्या नजरेस आणून देईल. या समितीच्या कार्याचे स्वरूप सल्लागार
समितीसारखे असेल. याशिवाय, पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी आणि उद्बोधनासाठी
चर्चासत्रे, व्याख्याने, प्रकाशने असे उपक्रम समितीतर्फे आयोजित करण्यात
येतील. पत्रकारांच्या संस्था/संघटना असे उपक्रम आयोजित करीत असतील, तर
शासन त्याकरिता आर्थिक मदत देईल. तसेच, राज्य व राष्ट्र यांच्या हिताच्या
विविध बाबी पत्रकारांच्या नजरेस आणून देण्याचे कार्य या समितीतर्फे
वेळोवेळी करण्यात येईल. तसेच, विविध प्रसारमाध्यमांतून दिल्या जाणार्‍या
बातम्या आणि सादर केले जाणारे वेगवेगळे उपक्रम यांची वस्तुनिष्ठता,
ग्राह्याग्राह्यता, गुणवत्ता, विधायकता, अभिरुची इत्यादी बाबींचे योग्य
आकलन व मूल्यमापन करण्याची क्षमता विकसित व्हावी, म्हणून माध्यमांचे वाचक,
श्रोते व प्रेक्षक यांच्यासाठी या समितीमार्फत उपक्रम राबविले जातील. असे
उपक्रम राबविणार्‍या अन्य व्यक्तींना/संस्थांना प्रोत्साहन/साहाय्य दिले
जाईल.