बरेच मयुरेश

बरेच मयुरेश

हा लोकांसमोर चिडतो
त्यांच्याशी वाद घालतो
तो नम्रपणे मनं जपतो
लोकांना धन्यवाद म्हणतो

हा प्रश्न विचारणारा
उत्तरं शोधण्यात रमलेला
तर तो हात हनुवटीला लाऊन
सत्य गाठण्यात गुंतलेला

हा छोटासा दिवा घेऊन
अंधारात भ्रमण करतो
तो शब्दांच्या सेना घेऊन
विचारांवर आक्रमण करतो

दिवसभर हे सगळे माझ्या
डोक्यात सैर-वैर धावतात
कुणास ठाऊक हे सगळे
इतक्या छोट्या डोक्यात कसे मावतात?

संध्याकाळी हा विचारतो
काहीतरी वेगळं केलंस का?
हसत हसत तो विचारतो
आज जीवन जगलास का?

रात्रीची कॉफी प्यायल्यावर
सगळे मयुरेश माझ्यात सामावतात
चादरीत आईच्या कुशीचा गंध शोधत
सगळे मयुरेश एकटेच झोपतात

-- मयुरेश