अत्तराची बाटली

अत्तराची बाटली बंदच राहूदे कधीतरी
----------------------------------------------------------

न बोलता काही, सगळं समजूदे कधीतरी
माझ्या मनातलं लोकांना कळूदे कधीतरी

नको असले त्रास देणारे विचार विचित्र
रोजच्या जिवनात मन अडकूदे कधीतरी

दोररोज पडणाऱ्या स्वप्नाला ओळख दाखवत
मी बोललो काही तर, ते ही बोलूदे कधीतरी

जीवन निघून जाईल वाटतं पण
कोणासाठी जगतो हे कळूदे कधीतरी

लोकं मला सरळ करायला बघतात
तेही माझ्यासारखे वाकडे होऊदे कधीतरी

पेटवून सारं, जाळून रात्र जाते रोजच
राख न झालेला ओलावा मिळूदे कधीतरी

वृक्ष म्हणतात, "घे मारून आम्हाला कागद तू
पण त्यावर आमचं बलिदान दिसूदे कधीतरी"

किती जोंबाळून ठेवायचं जखमेला त्या
रक्ताला त्याच्या मनासारखं वाहूदे कधीतरी

आठवणींचा वास घेऊन येतो सुगंध
अत्तराची  बाटली बंदच राहूदे कधीतरी

(अगदीच निरूपयोगी ठरल्या माझ्या कविता
तरी टिका करणाऱ्यांची पोटं भरूदे कधीतरी)

(माझ्या कवितांचं पुस्तक ठेवलं नाही उशीखाली
तरी ते वाचून, एक सूक्ष्म हास्य खुलूदे कधीतरी)

-- मयुरेश कुलकर्णी