चिंतामणी

माझे आजोबा फार दूरदर्शी होते म्हणजे ते भविष्यात घडू शकणाऱ्या घटनांनी वर्तमानात दुःखी व्हायचे असं नाही तर त्यांना एखादा माणूस भविष्य काळात काय करू शकेल याचा वर्तमानात अंदाज यायचा म्हणून त्यांनी माझं पाळण्यातलं नांव चिंतामणी ठेवलं. एकदा त्यांनी मला जवळ बोलावून पाठीवरून हात फिरवत सांगितलं की 'तुला मोठा माणूस व्हायचं असेल तर स्वतःचा विचार सोडून वैश्विक विचार करायला शीक'. ते स्वतः नेहमी कसला तरी विचार करत बसलेले असायचे आणि त्यांचे कशात म्हणून लक्ष नसायचे. माझे आते-चुलत मामा त्यांना त्यांच्या पाठीमागे 'कंसमामा' असं म्हणायचे पण ते का याचा मला उलगडा व्ह्यायचा नाही. पुढे ते गेल्यावर मला कळलं की 'कंसातल्या वाक्यांची विराम चिन्ह कंस संपल्यावर असावीत की त्यापूर्वी' या विषयी ते विचार करत असत आणि भाषेचा कुणीही अभ्यासक शेवट पर्यंत त्यांचं समाधान होईल असं उत्तर देऊ शकला नाही.

मी सुमारे सात वर्षाचा असल्यामुळे मला एकदम वैश्विक विचार झेपणारा नव्हता तरी मी गरिबी हा प्रश्न मनोमन निवडला, मला पहिल्या पासून गरीबां विषयी कळवळा होता. मी शाळेतून येता-जाता गरीबांकडे बघत उभा राही आणि यांच्यासाठी काय करता येईल असा विचार करत असे. माझे वडील सरकारी नोकरीत उच्चपदावर असल्यामुळे आम्हाला संरक्षीत भागात सरकारी क्वार्टर होतं. गाव लहान असल्यामुळे माझ्या गरीबां विषयी आपुलकीची खबर तिथल्या गरीब लोकात लवकरच पसरली आणि ते मला त्यांच्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकवून वडिलांना नोकरी लावून द्यायला सांग म्हणून गळ घालू लागले. मी जमेल तसे त्यांच्या मुलांना माझ्या डब्यातले पदार्थ आणि मला पाहुण्यांनी दिलेले पैसे देत असे. पुढेपुढे काही गरीब लोक आमच्या डेपोच्या दारात माझी वाट बघत उभे राहू लागले आणि ही गोष्ट बहुदा माझ्या वडिलांच्या वरीष्ठां पर्यंत गेली.

त्या दिवशी कधी नव्हे ते माझ्या वडिलांनी मला संध्याकाळी प्रेमानं जवळ बोलावून घेतलं आणि आपण सगळे 'लॅन्सीकडे राहायला जाऊ या का म्हणाले'. लॅन्सी माझा झोपडपट्टीत राहणारा दोस्त होता पण ते एकदम असं का म्हणतायत हे मला कळेना. ते बाहेर गेल्यावर आई मला म्हणाली की त्यांचे साहेब त्यांना म्हणाले की हे संरक्षीत क्षेत्र आहे आणि डेपोच्या दारात अशी कुठलीही माणसं येऊन उभी राहायला लागली तर तुम्हाला क्वार्टर खाली करावं लागेल. मला रात्री झोप लागेना, माझे वडील आईला म्हणत होते की 'पोराला भिकेचे डोहाळे लागलेत, तू त्याला काही तरी सांग'. मी केवळ दुसरीत असल्यानं मला ते माझ्या गरीबांच्या प्रेमा विषयी बोलताहेत हे कळलं पण 'डोहाळे म्हणजे काय?' हा नवीन प्रश्न पडला आणि त्यावर विचार करता करता मला झोप लागली.

आमच्या वर्गात एक हेमा चितळे नांवाची मोठ्या डोळ्यांची गोरी आणि खूप धीट मुलगी होती. तिची आणि माझी छान मैत्री पण होती, मी तिला माझी शंका विचारायचं ठरवलं. मधल्या सुट्टीत मी तिला गाठलं आणि विचारलं 'हेमे डोहाळे लागणं म्हणजे काय गं? ' ती म्हणाली 'कुणाला लागलेत? ' मी म्हणालो 'मला'. एवढ्यात सुट्टी संपली.

आमच्या वर्ग शिक्षिका आल्यावर त्यांनी काही सुरू करण्यापूर्वी हेमानी हात वर केला. त्या म्हणाल्या 'काय आहे? ' तर हेमा म्हणाली 'बाई डोहाळे लागणं म्हणजे काय? ' बाई एकदम सुन्न झाल्या, अशी शांतता पसरली की माझ्या जीवनात काही तरी वाईट घडायचं ठरलेलं असे. त्या म्हणाल्या 'तुला हा शब्द कुणी सांगितला? ' ती म्हणाली 'चिंतू म्हणत होता की त्याला डोहाळे लागलेत'.

बाई तातडीनं वर्गा बाहेर गेल्या आणि मला काय होतंय हे कळायच्या आत शिपाई मला हेडमास्तरांकडे घेऊन गेला. हेडमास्तरांनी एव्हाना आमच्या घरी निरोप पाठवला होता कारण माझी आई थोड्याच वेळात तिथे आली. तिनी हेडमास्तरांना झाला प्रकार समजावून सांगितला असावा कारण माझी परत वर्गावर रवानगी करण्यात आली. मला शब्दाचा अर्थ काही समजला नाही पण दुसऱ्या दिवशी पासून हेमानं माझ्याशी बोलणं बंद केलं ती म्हणाली की वर्गातला प्रसंग तिनी घरच्यांना सांगितला तेव्हा घरच्यांनी तिला 'इथून पुढे चिंतूशी बोललीस तर खबरदार म्हणून सांगितलं'. माझ्या लहानपणी पासून असे कशाचा काही पत्ता न लागणारे प्रसंग घडत गेले.

पुढच्याच आठवड्यात आमच्या वर्गात यक्ष नांवाचा मुलगा आला. त्याचं आणि माझं छान जमलं कारण मोठे प्रश्न घेऊन त्यावर विचार करणं हा त्याचा पण छंद होता. त्यांनी मला एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली तो म्हणाला, 'अरे आपले प्रश्न कुणालाही सांगायचे नाहीत कारण लोकांना ते कळत नाहीत'. मला यक्ष एकदम जवळचा वाटायला लागला कारण बहुदा माझ्या सारख्याच त्याला अनेक अडचणी येत असाव्यात. 

यक्षाने कितीही दुसऱ्याला सांगू नकोस म्हणून बजावलं असलं तरी एक दिवस न राहवून मी त्याला सांगितलंच, मी लोकांची गरिबी कशी दूर करावी याचा विचार करतो आहे. तो म्हणाला हा प्रश्न वैश्विक नाही, ते ऐकून मला यक्ष फारच हुशार वाटू लागला. मी त्याला वैश्विक प्रश्न म्हणजे काय असं विचारायचा प्रयत्न केला पण आपले प्रश्न दुसऱ्यांना सांगायचे नाहीत हा त्याचा नियम असल्यानं त्यांनी मला सांगितलं नाही.

दोन चार दिवसांनी शाळा सुटल्यावर यक्षाने मला थांबायला सांगितलं. शाळे समोरच्या झाडाखाली तो मला म्हणाला की माझा प्रश्न सुटला आहे. मला काही कळेना मी न सोडवता माझा प्रश्न सुटेल कसा? तो म्हणाला 'अरे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी तो प्रश्न सोडवायला घेतला आहे'. मी फार नाराज झालो मला न सांगता माझा प्रश्न पंतप्रधान त्यांच्याकडे कसा घेऊ शकतात हे मला समजेना आणि त्यांनी तो प्रश्न घेतला तर मी कुठला प्रश्न घेणार हा नवा प्रश्न मला पडला.

मला आता यक्षला सोडवेना मी त्याला म्हणालो 'यक्ष तू माझा खरा मित्र आहेस आज तू मला तुझा वैश्विक प्रश्न सांग'. मी दुःखी झालेलो बघून त्याला ही राहवलं नाही तो म्हणाला 'तू कुणाला सांगणार नाहीस ना?' मी म्हणालो 'तुझी शप्पत नाही'. तो म्हणाला 'अरे सूर्याचा इंधन पुरवठा संपतोय'. माझ्या छातीत धस्स झालं, मला एकदम वैश्विक प्रश्न म्हणजे काय ते समजलं. मी जवळ जवळ रडायचाच बाकी राहिलो मी म्हणालो 'आपण हा प्रश्न कसा सोडवायचा?' तो म्हणाला 'आपण फक्त विचार करायचा, तू मात्र कुणाला सांगू नकोस'.

माझं काही केल्या कशात लक्ष लागेना, यक्षला वचन दिल्यामुळे मला कुणाला सांगताही येईना आणि उपाय ही सापडेना. वर्गात मी नुसता बसून राहायला लागलो. मला दोनच गोष्टी सगळीकडे दिसायला लागल्या एक पेटलेला सूर्य आणि दोन विझलेला सूर्य. एक दिवस गाण्याच्या तासाला मी खिडकीतून दिसणाऱ्या सूर्याकडे बघत होतो सगळा वर्ग आणि गाण्याच्या बाई गाणं थांबवून माझ्याकडे बघतायत हे मला माहीतच नव्हत. बराच वेळ गेला असावा कारण गाण्याच्या बाईंनी मला मधल्या सुट्टीत शिक्षकांच्या रूममध्ये बोलावलं, त्या तशा प्रेमळ होत्या पण मला परत भीती वाटायला लागली. त्या म्हणाल्या 'तुझा प्रश्न काय आहे? ' मी चाटच पडलो, मला प्रश्न आहे हे त्यांना कसं कळलं? मी म्हणालो माझा प्रश्न वैश्विक आहे आणि मी तो कुणाला सांगणार नाही. त्या म्हणाल्या 'अरे मी तुझा प्रश्न सोडवीन'. त्यांच्या आपुलकीपुढे माझं काही चालेना मी म्हणालो 'तुम्ही कुणाला सांगणार नाही ना? ' त्या म्हणाल्या 'प्रॉमिस'. मी म्हणालो ' अहो, सूर्यावरचा इंधन पुरवठा संपतोय'.

त्या मला परत वर्गात घेऊन आल्या, आता काय होणार म्हणून मी पुन्हा चिंतेत पडलो. मला टेबला जवळ उभं करून त्या सगळ्या वर्गाला म्हणाल्या 'आजपासून आपण याला संजय म्हणून हाक मारायची, याचं खरं नांव चिंतामणी नाहीये'. सगळ्या वर्गाच्या त्या इतक्या लाडक्या होत्या की सगळे एकदम 'होSSS' म्हणाले. मी परत त्यांच्या मागे वर्गा बाहेर आलो आणि त्यांना विचारलं 'बाई माझं नांव बदलून सूर्याचा इंधन पुरवठा कसा सुरळीत होईल? ' त्या म्हणाल्या 'अरे, होईल, चिंतामणी नको त्या प्रश्नावर विचार करत बसतो आणि संजय समोरचा आणि स्वतःला झेपेल तो प्रश्न सोडवतो, इंधन पुरवठा संपल्यावर आपण बघू!" मी त्या वेळी सुमारे दुसरीत होतो, मला ते पटलं, मी म्हणालो 'एकदम सही! '

यक्षला मी इतका वैश्विक प्रश्न सहजा सहजी सोडून दिल्यानी माझा राग आला आणि त्यांनी माझ्याशी बोलणं सोडलं. हेमांगी मात्र पुन्हा माझ्याशी बोलायला लागली, बहुदा माझ्या आईनि तिची आई बाजारात भेटल्यावर काही तरी सांगितलं असणार पण मी आता अशा प्रश्नांवर विचार करायचं सोडून दिलं होतं.

संजय