भाग्यवान मी

भाग्यवान मी

ते त्यांचं स्वप्न दाबून ठेऊ शकले
ते त्यांनी पाळलेला मोर होतं
उद्याची अप्रामाणिक कबुली देऊन
ते आजच्या सुखाचं चोर होतं

इच्छांच्या नदीवर त्यांनी
वास्तवाचे धरण बांधले
बांधावर आपटून नदीला
नैराश्याचे पाणी झोंबले

माझ्या स्वप्नाचा गरूड
उंच उडून भविष्य बघतो
मग वास्तवावर झडप घालून
तो निसटत्या क्षणाला धरतो

स्वप्नांना थांबवता येत नाही
मी त्यांच्याच रस्त्यावर चालतो
वास्तवाच्या खड्ड्यात पडलो की
मी माझ्यातल्या देवाशी बोलतो

त्यांनी स्वप्ने दाबून ठेवली
कारण त्यांना ती दाबता आली
मी भाग्यवान असा की
मला माझी जगता आली

-- मयुरेश कुलकर्णी