माणसे मालिकेतली आणि बाहेरची !

     अमेरिकेत येण्याचा जो महत्वाचा फायदा मला वाटतो तो म्हणजे दररोज निरनिराळ्या मालिकांना तोंड देण्याच्या संकटातून माझी सुटका होते हा! आता भारतात असताना माझ्यावर मालिका बघण्याची सक्ती असते का किंवा माझ्या हातात रिमोट असताना मला असे का वाटते असे विचारणाऱ्यांना  खरा रिमोट कुणाच्या ताब्यात असतो हे माहीत नसावे किंवा मग ते वेड पाहून पेडगावला जात असावेत. आणि खरोखरच रिमोट वापरण्याचा अधिकार त्याना असेल तर मात्र तेची पुरुष भाग्याचे! कारण एकदाच म्हणजे टी २० चालू असताना एक महत्वाची (कोणाच्या मते हे सांगायला नकोच) मालिका चालू असताना चुकून माझ्या हातात आलेला रिमोट वापरून सचिन कसा खेळतोय हे बघण्याची दुर्बुद्धी मला सुचली आणि त्यानंतर बाईसाहेबांनी टी. व्ही. वर बहिष्कारच घातला.  आपल्यासारख्या संवेदनशील माणसाना अशी बळजबरीची शांतताही मानवत नाही.

    माझ्या मते माणसांचे वर्गीकरण अनेक प्रकारे करता येते. त्यात एक प्रकारचे वर्गीकरण म्हणजे दूरदर्शनमालिका पाहणारी आणि न पाहणारी. पण पाहणाऱ्यातही दोन प्रकार असतात एक म्हणजे आवडीने पाहणारी आणि दुसरा प्रकार माझ्यासारखा मनात नसताना पाहावे लागणारी. पण यातही एक गोची असते ती म्हणजे दारूचा पहिला प्याला बळजबरीने जरी घशाखाली लोटला तरी नंतर त्याची चटक लागण्याचा धोका जसा असतो तोच या मालिकांच्या बाबतीत संभवतो म्हणजे पहिला भाग बघितल्यावर पुढचा भाग जरी त्यातली माणसे वेड्यासारखी वागत असली तरी पहायची उत्सुकता लागून राहते आणि मग ती मालिका बघण्याची चटक लागू शकते.

   आवडीने पाहणाऱ्यांच्या बाबतीत काही प्रश्नच नसतो. ही बिचारी वेळ मिळाला की जे काही समोर येईल ते पाहून लगेच विसरून जातात किंवा काही लक्षात राहिलेच तर कधीकधी मालिकेतील पात्रांच्या साड्या अलंकार यांची जमेल तेवढी नक्कल करतात. मालिका पाहताना डोक्याला फारसा ताण न दिल्यामुळे त्यांचा तो वेळ चांगला जातोच तसाच एकत्र जमले असता   मालिकातील पात्रांवर, प्रसंगांवर ताशेरे मारत गप्पा मारण्यातही त्यांचा वेळ अधिकच चांगला जातो. माझ्या प्रकारातली माणस या आवडीने पाहणाऱ्या माणसांचे सगेसोयरे असल्यामुळे त्यांच्याबरोबर पाहून उगीचच मनस्ताप करून घेतात. तरीपण मालिका पाहून जो बहुश्रुतपणा येतो त्याचा फायदा कधीकधी चविष्ट गप्पा मारण्यासाठी होतो हे मात्र खरे.

      मालिका न पाहणारी माणस आम्हाला नाही असल्या फालतू गोष्टीत घालवायला वेळ अशा ताठ्यात वावरत असतात आणि बऱ्याच ठिकाणी आपण मालिका बघत नाही म्हणजे आपली बौद्धिक पातळी किती उच्च दर्जाची आहे असा तोरा मिरवण्याची संधी सोडत नाहीत. आमच्या घरी टी. व्ही. च नाही किंवा असला तरी केबल वा डिश नाही आम्ही फक्त दूरदर्शनच्या बातम्याच बघतो असे अभिमानाने सांगणारी मंडळी माझे मित्र आहेत.

   तिसरा वर्ग जरा धोकादायक असतो आणि तो म्हणजे मालिका पाहून मालिकेला ( आणि त्या बघणाऱ्यांनाही ) शिव्या देणारी! खर तर मालिका बघणाऱ्या असंख्य मूर्खात ते स्वत:ही असतातच हे ते कसे विसरतात समजत नाही. अशा लोकांच्यावरून मला एक विनोद आठवतो. त्या विनोदात एक स्वत:स सभ्य समजणारी स्त्री एका हॉटेलमध्ये उतरते. मालकाला ती बजावून सांगते " मी एक सभ्य स्त्री आहे आणि मला उगीच कसलीतरी खोली चालणार नाही. "मालक बिचारा आपल्या मगदुराप्रमाणे चांगल्यात चांगली खोली तिला देतो. ती आपल्या खोलीत शिरल्यावर थोड्याच वेळात मालकाला तिचा फोन येतो. "अहो मालक कसली खोली दिलीय मला तुम्ही ही काही सभ्य स्त्रीला राहावे वाटणारी खोली आहे का? " मालकाला काही कळेना काय झाले ते, तो त्या स्त्रीला म्हणतो"ठीक आहे मी येतो पहायला तुमची काय अडचण आहे ते! " मालक त्या खोलीत प्रवेश करतो आणि खोलीत सर्वत्र नजर टाकतो आणि त्याला तेथे काहीच आक्षेपार्ह दिसत नाही त्यामुळे त्याने विचारले, " अहो येथे तर काहीच नाही मग तुमची काय अडचण आहे? " यावर ती स्त्री रागारागाने उत्तरली, " ती खुर्ची इकडे आणा आणि त्या खिडकीखाली ठेवा "मालक निमूटपणे तसे करतो. " आता त्या खुर्चीवर उभे राहा आणि त्या वरच्या खिडकीतून पाहा काय दिसते ते" त्या खिडकीतून मात्र पलीकडील घरात प्रणयक्रीडा करणारे जोडपे दिसत होते. मालकाने बिचाऱ्याने कपाळाला हात लावून घेतला. मालिका बघून शिव्या देणारी मंडळी या प्रकारात मोडतात.

    आता आणखी एका अतिरेकी प्रकाराची यात भर पडली आहे ती म्हणजे या मालिकांमुळे समाजाची नैतिक पातळी खालावत असते या त्यांच्या समजुतीमुळे  टी. व्ही. चीच सार्वजनिक कत्तल करणारांची आणि त्यापुढे जाऊन तसे इतरानीही करावे असा फतवा काढणाऱ्यांची. सध्या समाजाच्या नैतिक पातळीची चिंता करणाऱ्या मंडळींचे इतके उदंड पीक येत असताना समाजाची नैतिक पातळी मात्र का उंचावत नाही हे आश्चर्यच आहे.

        हे झाल मालिकेच्या बाहेरच्या माणसांविषयी! मालिकेतील माणसांचा प्रकार आणखी वेगळाच असतो.

             मालिकांचा पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे त्यात पात्रांची संख्या अगणित असते हम दो हमारे दो  चा युगात असताना या मालिकेतील कुटुंबात मात्र कमीतकमी चार मुलगे दोन बहिणी ( किंवा याउलट) आणि परत सर्व एकत्र राहणारे असतात. म्हणजे हल्ली एक मुलगा असला तरी तो बापाजवळ राहत नाही पण येथे मात्र असे सगळे जण एकत्र राहून एकमेकाची ( आणि दर्शकांचीही ) डोकी फोडत असतात. एवढ्यावर भागत नाही म्हणूनच की काय त्याना तोंडी लावायला एकादी आत्या किंवा मामा वा काका असतोच शिवाय हा मामा काका वा आत्या जे कोणी असतात ते इतके शिरजोर असतात की जणू काही तेच एवढ्या भल्या मोठ्या कुटुंबाचा योगक्षेम वाहत असावेत आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबातील सगळे सदस्य त्यांच्या अर्ध्या वचनात असतात.  

          मालिकेतील शेकडा नव्वद पात्रे बहुतेक कुठल्या ना कुठल्या कटकारस्थानात गुंतलेली असतात. त्याना पोटापाण्याचा उद्योग करण्यास केव्हां वेळ मिळतो काही कळत नाही. त्यापैकी काही त्या कुटुंबातल्या कर्त्या मंडळींना हाताशी धरून त्या कुटुंबाच्या मालमत्तेपैकी आपल्याला जास्तीतजास्त कशी हडप करता येईल ह्या एकाच चिंतेत  सदैव मग्न असतात. हाच एकमेव उद्योग त्याना असतो त्यामुळे इतर उद्योग करण्याची त्याना आवश्यकता नसते. मालिकेतल्या या  पात्रांचे टायमिंग जबरदस्त असते म्हणजे जेथे काही गुप्तता राखण्यालायक किंवा महत्वाची बातचीत चालू असते तेथे ही मंडळी बरोबर दाराआड किंवा पडद्याआड उपस्थित असतात आणि अशा वेळी मिळालेल्या माहितीचा योग्य वेळ येताच ती उपयोग करतात.     

          मालिकेतील बव्हंश पुरुषाच केवळ एक बायकोवर भागत नाही त्यामुळे बाहेरील एक किंवा अनेक स्त्रियांच्यावर त्यांचा डोळा असतो, या स्त्रियांनाही तो पुरुष विवाहित आहे ही गोष्ट माहीत नसते अशातला भाग नाही तरीही त्यांना अशा पुरुषाचा बराच लळा असतो. अशा पुरुषांचे भाग्यही इतके मोठे की त्यांच्या बायका मात्र  त्यांच्यावर एकनिष्ठतेने भक्ती करतात आणि आपल्या नवऱ्याचे असे काही लफडे आहे यावर विश्वास ठेवणे त्याना बराच काळ जड जाते.

    काही अपवादात्मक सत्प्रवृत्त पुरुष (म्हणजे हे मालिकेतल्या पुरुषांविषयी चाललय नाहीतर सत्प्रवृत्त पुरुष अपवादात्मक आहेत असे म्हटल्यामुळे उद्या आपल्या नवऱ्यांच्या सत्प्रवृत्तपणाची खात्री असणाऱ्या बायकांचा मोर्चा निघायचा कदाचित त्यात माझी बायकोही असायची) मात्र आपल्याच बायकोशी एकनिष्ठ असलेले निघालेच तर कुठलीतरी एकादी महामाया त्याना आपलेसे करण्याच्या उद्योगात मग्न असते. आश्चर्य म्हणजे जगात लग्न न झालेले अनेक पुरुष पडलेले असून (सद्ध्या तर पुरुषांचीच संख्या बायकांपेक्षा जास्त आहे आणि हे व्यस्त प्रमाण वाढतच चालले आहे ) तिला मात्र त्या पुरुषालाच येनकेन प्रकारेण गठवायच असत. आणि तेही त्याच्या लग्नाच्या बायकोवर मात करून.   

        मालिकेतील पात्रांच्या व्यक्तिरेखा निर्माता आणि त्याच्या हुकुमाबाहेर न जाणारा दिग्दर्शक यांच्या तालावर नाचत असतात त्यामुळे त्यानी ज्यावेळी बोलायला हवे असे सगळ्या दर्शकांना वाटत असते तेव्हां ते तोंड उघडण्याची मुळीच तयारी दाखवत नाहीत आणि नको तेव्हां मात्र भडाभड बोलत सुटतात.

    थोडक्यात मालिकेच्या सुरवातीसच "या मालिकेतील पात्रांचा व प्रसंगांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही तसा आढळल्यास तो योगायोग समझावा" असा जो वैधानिक इशारा दिलेला असतो त्यानुसार मालिकेतील पात्रे वास्तवातील व्याक्तींसारख्या वागणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेऊन मालिकानिर्माता आणि दिग्दर्शक दोघेही त्या इषाऱ्याचे अगदी मनोभावे पालन करतात.  .