आज अचानक तुझी आठवण का यावी

आज अचानक तुझी आठवण का यावी
आज पापणी ओली माझी का व्हावी

फार काळ या गोष्टीला झाला नाही
युगे लोटली असतील पण का वाटावी

जुन्या वहीची तीच दुमडलेली पाने
अकस्मात वाऱ्याने येउन उघडावी

बरेच काही घडले ह्या मधल्या काळी
तुला कहाणी कुठून आता सांगावी

शब्द उतरण्या पानावरती घाबरले
भीती इतकी अर्थांची का वाटावी?

तुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा
फक्त तुला ही धडपड माझी समजावी

हिशोब केला तुला दिलेल्या ताऱ्यांचा
समजत नाही कुठे पौर्णिमा मांडावी

पुन्हा तोच पाऊस पडावा पूर्वीचा
पुन्हा तीच मी नाव कागदी सोडावी

पहाट होणे अशक्य आहे थांबवणे
तरी वाटते रात्र जरा ही लांबावी

मनात आहे काय काय दडले माझ्या
आज उडी डोहात मनाच्या मारावी