हसू (न) का !!

आजकाल हसणे हा एक गंभीर प्रश्न झाला आहे अशी दाट (? ) शंका येतेय. कुठलीही वाहिनी लावा, इथे तुम्हाला हसवण्याचा (किंवा रडवण्याचा प्रयत्न करून हसवण्याचा) प्रयत्न केला जातोय. हसणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे, ह्या उपपत्तीवर या वाहिन्यांचा विश्वासच नाही.

फार पूर्वी रिमोट नावाचे यंत्र टीव्ही चालू-बंद किंवा आवाज कमी जास्त करणे यासाठीच वापरले जायचे, तेव्हा फक्त प्रेक्षक हसत असत. संवाद झाल्यावर मध्ये गॅप नसे, त्यामुळे पुढचा विनोद ऐकू येणार नाही या भीतीने हळूच हसावे लागायचे. तसंही बाबा काय म्हणतील या भीतीनेही आम्ही जोर-जोरात हसू शकत नव्हतो....

पण काळ बदलला... एका दूरदर्शन पासून "हम पाँच" म्हणत झी वाहिनी आली अन सगळंच बदललं. लोकांना खळखळून सोडाच, गाल्यातल्या गालातही हसणेसुद्धा दुष्कर होवू लागले अन मग जबरदस्तीचे हसणे सुरू झाले. आता त्या हसण्याचे वेगळे पैसे द्यावे लागत नाही, असे कळते. जसं बिना-बर्फाच्या रसाची किंमत जास्त असते तसंच बिनाऱ्हास्याच्या हास्यमालिकेला मालिकेला जास्त पैसे पडत असावे.

याहिपेक्षा पुढे जाऊन (नेहमीप्रमाणे परदेशी वाहीन्यांतून चोरलेल्या) हास्योस्पादक रिऍलिटी शोची सुरुवात झाली. शेवटी काय, अती तिथे मातीनुसार, इथेही पैसे देऊन हसणारे प्रेक्षक आणि परीक्षक आणावे लागले.

आजकाल विनोद काय झाला हे कळतच नाही. सिद्दू हसला की विनोद संपला हे कळतं. एकवेळ सिद्दुला माफ करता येईल, पण शेखर सुमनही त्याला सामील झाला. हाच तो शेखर जो स्वतः दुसऱ्यांना हसवायचा......

इंग्रजीतून हिंदीवाले ढापणार आणि त्याचे खच्चीकरण करून सादर करणार, हे माहिती होतेच. त्या ढापलेल्या आणि खच्चीकरण केलेल्यातून आपले (अमराठी निर्माते आणि) मराठी वाहिन्या ढापून अधिक खच्चीकरण करून, सादर केलेले रटाळ विनोद (? ) सादर करणार... अरे बाप रे!!! मग स्वप्नील जोशीलाही इंग्रजीत कॉमेंट देऊन खदखदून हसावे लागते (याला लोल म्हणतात म्हणे), हे दुर्दैव.

बरं, कोणी हसावे की नाही याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही, पण किमान तो विनोद ऐकू तर द्या. विनोद होताच तुम्ही (परीक्षकच) हसतील तर प्रेक्षकांना काय कळेल? आणि सोबत असणारे बँडवाले! ते कुठेही काहीही वाजवतात... तेही इतकं की शेवटचं वाक्य तुम्हाला ऐकूच येणार नाही आणि परीक्षक हसले म्हणून तुम्हाला हसावे लागेल.

काय करावं? हसूच येत नाही हो? असो. बातम्याच बघायच्या असत्या तर हरकत नव्हती पण जबरदस्तीने हे कार्यक्रमच बघावे लागतात  , दुसरा पर्याय नाही.