सच्चा माणूस!

जून २००७ च्या सुमारची घटना. संजय संगवईचं निधन झालं होतं. त्याच्या आठवणी मी 'मनोगत'वर जागवल्या होत्या. लेखनावर एक प्रतिक्रिया आलेली दिसली. पत्रकारितेतील माझ्या अनुभवांविषयीचा उल्लेख त्यात होता. मी या व्यवसायात आहे हे फारसं कुणाला ठाऊक असण्याचं कारण नव्हतं. जालावरच मी नवा. सदस्याचं नाव पाहिलं, 'भोचक'. मी उडालो. हा कोणाचा भोचकपणा, स्वाभाविक प्रश्न आला. काही कळणं शक्य नव्हतं. व्यनि करणं शक्य होतं. माझ्या स्वभावानुसार ते काही झालं नाही. मीही नंतर फारसा रस दाखवला नाही.

त्याची आणि माझी अखेरपर्यंत भेट न होण्याचं कारण तिथं असावं का? हे मनाचे खेळ. ते व्यक्त केले तर विवेकी मंडळींच्या लेखी मी मूर्ख ठरेन. पण न केले तर हा कोंडमारा त्या, एरवी नसलेल्या पण कायमच असलेल्या, मन नामक गोष्टीला कायमच सोसावा लागेल.

***

जालावरचा वावर वाढला तसा हा भोचक एके दिवशी अचानक सामोरा आला. जालावरच.

"वेबदुनियाच्या मराठी आवृत्तीचे काम पाहतो," एके दिवशी व्यनितून एकमेकांना फोन नंबर दिल्यानंतर माझं आणि त्याचं बोलणं झालं. त्यानंच फोन केला. बोलू लागला. भरभरून बोलत होता. पहिलाच संवाद असला तरी. हा अभिनय. अभिनय कुलकर्णी. वेबदुनिया म्हणजे पत्रकारितेचं जालीय रूपडं. एक गोष्ट कळली - भोचकपणाचा "अधिकार" असलेला गृहस्थ दिसतो. 'सकाळ'च्या नाशिक आवृत्तीत होता. अर्थातच, मी तिथून बाहेर पडल्यानंतरच्या काळात. पण त्याच्याबरोबरीचे काही जण माझ्याही काळात होते. ओळखी इकडून-तिकडून निघतातच. जग गोल आहे आणि तसं छोटंही आहेच. मग संवाद वाढत गेला. मग त्याचं लेखन समोर आलं. त्यातूनही परिचय होत गेला. भेटायचं, भेटायचं ठरत गेलं, राहूनही गेलं.

***

नर्मदा आंदोलन या विषयावर मी लिहिलेलं वाचून एकदा म्हणाला, "तुम्ही इकडं येता तेव्हा आधी सांगा, एक-दोन दिवस जास्त ठेवा. माझ्याकडं या. आपण इथूनच जाऊ. मला तुमच्यासोबत यायचं आहे." माझा या विषयातील अभ्यास केवळ महाराष्ट्राचा. मी मध्य प्रदेशात गेलो नाही, त्याविषयी लिहिलेलंही नाही. मी त्याला तसं म्हणालो तेव्हा लगेच म्हणाला, "यासाठी तर याच. कारण तुम्ही लिहिता ते महाराष्ट्रापुरतं, पण आम्हाला हा भेदही कळत नाही की मध्य प्रदेशात वेगळं काही असेल. यासाठीच या." इंदूरला काही मी गेलो नाही.

***

मी फारसा व्यनि किंवा खरडीवाला माणूस नाही. त्यामुळं फोन. क्वचित त्याच्याशी जीमेलवर बोलणं व्हायचं. माझ्या एका 'नोंदीं'नतरचा एक संवाद -

अभिनय: लेखन आवडलं म्हणावं की कुंठीत झालेल्या विकासाचं दुःख मानावं, असं काहीसं झालंय. लेखनात शिरल्यानंतर वेगळीच भावना मनाचा ताबा घेते. त्यात आपण ज्या ऐहिक पातळीवर जगतो, त्याचीच लाज वाटायला लागते. ज्या गोष्टींचा आपण बाऊ करतो, त्या इतरांसाठी किती दूरच्या असतात, याची जाणव होते. आणि मग अपराधित्वाची भावना पछाडते.
ता.क.: बालपण मोखाड्यासारख्या (जि. ठाणे) ग्रामीण भागात गेल्याने यातल्या अनेक समस्यांची कल्पना होती. पण आजही तिथे हीच परिस्थिती आहे, हे पुन्हा पाहिल्यावर फार अस्वस्थ वाटते.

मी: ही टोचणीही अनुचितच, अन्याय्य अशा स्वरूपात काही विचार सुरू आहेत.

अभिनय: ...९९ टक्के आदिवासी भागात असलेल्या अतिशय मागास भागात दहावीपर्यंतचे शिक्षण होऊनही आता कुणास ठाऊक मीही इतका का कोरडा झालोय असं वाटतं. हे वाचलं की मग पुन्हा अस्वस्थ होतो. माझे एक सुह्र्द वय वर्षे ७२. सध्या इगतपुरीजवळ एक प्रोजेक्ट करताहेत. आदिवासी मुलांसाठी शाळा नि बरेच प्रकल्प त्यात एकत्र आहेत. त्यांना जमेल तशी पैशांची वगेरे मदत करतो. पण तेही दिल्यासारखे म्हणून. मनाला पटत नाही. मध्यंतरी कोकणात रहाणार्‍या धनंजय कुलकर्णींविषयी वाचलं तेव्हाही असाच अस्वस्थ झालो.

मी: पण ही माणसाची मर्यादा असते.

अभिनय: मध्यंतरी बरेच दिवस कपडे घेतले नव्हते. म्हणून एकदम काही कपडे घेतले. बरेच पैसे त्यासाठी मोजले. पार ब्रॅंडेड वगैरे नव्हते पण घेतल्यानंतर लाज वाटली स्वतःचीच. मागे कधी तरी सुंदरलाल बहुगुणा नाशिकला व्याख्यानासाठी आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते. कपड्यांची कितीशी गरज लागते. दोन. फार त्यापलीकडे फार गरज नसते. तरीही हव्यास किती करतो आपण हे सगळं आठवलं नि. अस्वस्थ व्हायला झालं

मी: आपला प्रॉब्लेम सांगू का, आपण गरजांची व्याख्याही नीट करीत नाही. बहुगुणा आले, बोलले की त्या हिशेबात गरजेची व्याख्या होते, मेधाताई आल्या, बोलल्या की त्या हिशेबात, सातपुड्यात जाऊन काही पाहिलं की त्या हिशेबात, पुण्यात दैनंदिन आयुष्यात परतलो की, त्या हिशेबात. या सगळ्यात स्ट्रायकिंग द बॅलन्स हा महत्त्वाचा. तिथं जो सोस थांबवता येत असेल तोच फक्त आवश्यक असतो. मी अनेकदा म्हणतो, की पहाडावरून उतरून पाणी आणणं हाही त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग आहे. तो सुकर करणं हे महत्त्वाचं. कारण त्याच हिशेबात डोंबिवली ते व्हीटी प्रवास करणं हाही जीवनशैलीचा भाग आहे. तो सुकर करणं तितकंच महत्त्वाचं.

अभिनय: तुम्ही म्हणताय ते खरंय. कपड्यांचा खर्च झाल्यावर मी मनाशी ठरवलं. आता किमान दोन वर्षे तरी कपडे घ्यायचे नाही. तशी गरजच नाही. उगाच सोस करायचा नाही. नुकताच कम्प्युटर घेतला. आधी होता तो दहा वर्षापूवीचा, सेलेरॉन होता; फारच मागास होता. म्हणून नवाच घेतला. पण तो खर्च केल्यानंतर या सगळ्याची गरज होती का असा प्रश्न पडला. शेवटी याचा काही निदान घरच्यांसाठी उपयोग करता येईल, अशी समजूत घातली. 'हा काही सोस नाही. गरज आहे. त्यामुळे तो आवश्यकच होता,' अशी समजूत घातली. तरीही आत खटकत राहिलंच.

मी: बरोबर. आत का खटकलं? नीड आयडेंटिफिकेशन पक्कं नसल्यानं तसं होतं का याचा आपण विचार केला पाहिजे.

अभिनय: अगदी खरंय. मला मोबाईलचा अजिबात सोस नाही. कितीतरी वर्षे मी तोच मोबाईल वापरतो. एक हरवला तेव्हा नवा घेतला तोही स्वस्त. उपयुक्तता पाहिली. पण मध्यंतरी सहज एमपी थ्री आणि इतर सुविधा असलेला मोबाईल पाहिला नि विचार आला, घ्यावा काय? पण म्हटलं गरज नाही तर का घ्यायचा? पण आजच्या काळात ज्यात कॅमेरा आहे असा घेतल्यास व्यावसायिक फायदाही होईल, असाही विचार आला. शेवटी तो विचारच मी सध्या बाजूला टाकला. आधी पैसे नव्हते, तेव्हा असे काही विचारही येत नव्हते. आता थोडे पैसे हातात आले की खर्चाचे विचार येतात काय? इतर काहींसारखे आपण काही शॉपोहोलिक नाही, हे खरे. पण तरीही अवाजवी खर्च करतो काय, असं वाटायला लागतं. गरजा नक्की पक्क्या करूनच त्यासाठी खर्च करायला हवा. मग गिल्टी फील रहात नाही. मुख्य म्हणजे विवेक हवा...

संवेदनशीलता, विनय, अभ्यासू वृत्ती वगैरे शब्द वापरण्याची वेळ क्वचित येऊ नये आणि अशा प्रसंगात तर येऊच नये.

***

अगदी अलिकडचा एक संवाद.

मी: ओ पत्रकार. लिहा की नक्षलींच्या प्रश्नावर. काय राव, एवढं पब्लिक म्हणतंय, तर बसलात गप्प.

अभिनय: अहो, अभ्यास नाही ना तेवढा. सगळे पैलू तपासायला हवेत. त्या विषयाचं नीट वाचन करायचंय. मुख्य त्या भागात फिरायला आवडेल. बघूया कधी जमतंय.

मी: करा. करा... लवकर करा.

अभिनय: आम्ही मानवतावादी भूमिकेतून काही बाजू मांडायला जावं, नि लोकांनी धरून हाणावं, असं होईल. नक्षलवादी चळवळीला म्हणजे त्यातल्या हिंसाचाराला पाठिंबा नसला, तरी त्यातल्या प्रश्नांच्या धगीशी सहमत आहे ना. मग लोक अगदी पिच्छा पुरवतील. त्यासाठी संदर्भ गोळा करून नीट लिहावं लागेल. म्हणजे उत्तरं देता येतील.

मी: मी वाचणार आहे.

अभिनय: माझं वास्तव्य आदिवासी भागातच होतं, दहावीपर्यंत, पण त्या प्रश्नाकडे पहाण्याइतकी प्रगल्भ नजर तेव्हा नव्हती. त्यामुळे आता पुन्हा ते सगळं नीट पहावंसं वाटतंय. अभ्यासावं वाटतंय.

मी: आता अॅक्च्युअली तोच बेल्ट तर माओवाद्यांच्या टार्गेट वर आहे.

अभिनय: रायगडात सेझवरून जे झालं, ना तसंच काही दिवसांनी जव्हार, मोखाड्याकडे होईल, असं मला दिसतंय. कारण जमिनीचे भाव वाढायला लागलेत. आमच्या भागातील ग्रामीण भागात कम्युनिस्टांचा निर्विवाद प्रभाव आहेच. त्यामुळे माओवादही त्या आधाराने वाढला तर नवल नाही.

अभिनय नव्हता हा. सच्चेपणा होता, त्याच्यातल्या विद्यार्थ्याचा. त्याच्यातील माणसाचा.

***

दोनेक महिन्यापूर्वी फोनवर बोलणं झालं. नर्मदा आंदोलनाचा एक सत्याग्रह इंदूरमध्ये त्याच्या वृत्तांकनाच्या निमित्ताने काही कार्यकर्त्यांशी झालेली भेट, त्यातून त्या प्रश्नाचं नव्यानं झालेलं थोडं आकलन याविषयी भरभरून बोलला. नेमके प्रश्न विचारत होता. आंदोलनाच्या भूमिकेविषयी, माझ्या आकलनाविषयी. आपण काय करू शकतो याविषयी. पुढे काही दिवसात पुन्हा माझ्या 'नोंदी' प्रसिद्ध झाल्या. त्याच काळात तो रावेरखेडीला जाऊन आला होता. ते सांगत होता एके दिवशी फोनवर. तिथं दिसलेली नर्मदा, पाण्याचा तो फुगवटा, इंदूरला मिळणारं नर्मदेचं पाणी, रावेरखेडीच्या परिसरातील शेतीची समृद्धी वगैरे... मी सहज त्याला म्हटलं, नर्मदेच्या त्याच भागात भारतखंडातील पहिली शेती झाली असं अँथ्रोपोलॉजी सांगते. लगेच त्याचा अँटेना जागा झाला असावा. मग त्याविषयीच्या सामग्रीची चौकशी सुरू झाली. बोलणं सुरू राहिलं. मी लिहिणार आहे, इतका शब्द त्यानं त्या दिवशी दिला. मला तेवढंच हवं होतं.

***

आज पहाटे ४.११. मोबाईलवर नोकिया ट्यून गुंजू लागली. क्षणातच बंद झाली. पाहिलं, मुंबईहून अतुल जोशी. यावेळी? याच्याकडून मिसकॉल तर शक्यच नाही. चुकून बटण दाबलं गेलं असेल, झोपेत वगैरे, माझा मनाशीच विचार. पुन्हा झोपेच्या आधीन. अज्ञानातला आनंद हा असा असतो हे नंतर कळणार होतं.

सकाळी ६.१०. नोकिया ट्यून. पाहिलं, ललित चव्हाण. फोन घेतला, "काय रे?" आवाज ललितच्या बायकोचा. "मी ललित चव्हाणांची बायको बोलतेय मनीषा." एक क्षण श्र्वास अडकलाच. हिचा फोन कसा काय? असंख्य शक्यता!

"इंदूरचे अभिनय कुलकर्णी आहेत ना, त्यांची बायको भाग्यश्री इथं आहे. अभिनयला अॅक्सिडेंट झाला आहे. ती बोलतीये..."

शांत सुरात भाग्यश्री, "मोडकसर, भाग्यश्री बोलतेय. आम्ही इंदूरहून येत होतो. इथं अॅक्सिडेंट झाला. त्याची डेथ झाली आहे..."

"व्हॉट?..." एकशेएक टक्के मी हादरलो आहे. सूर कोलमडलेला.

सावरतो. पुढच्या गोष्टी होतात. मग मी मित्राशी बोलतो. तपशील कळतो.

अभिनय कुलकर्णी या माणसाला मी कधीही भेटलो नाही. आज किंवा उद्या मुंबईत भेटायचं हे आमचं ठरलं होतं. ती भेट राहून गेली.

आठवणींच्या कल्लोळातून मी बाहेर येतो तेव्हा पहाटेची आठवण शेवटची असते. पहाटे ४.११ ते सकाळी ६.१० या काळातील अज्ञानातील आनंदाची कल्पना मला येते आणि मी पुन्हा थिजून जातो.