गुरूकृपा - आनंद लहरी

[आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे. आज गुरूपौर्णिमेनिमीत्त त्यातील हा एक वेचा देत आहे.]

मूर्खासी सदगुरुभजन । हे सर्वथा नघडे जाण । जन्ममरणाचें अधिष्ठान । संचितस्थान पापाचें ॥
मुके शब्दाची चातुर्यता । ह्नैसा होईल पुराणवक्ता । किंवा पांगुळ जाईल तीर्था । हें सर्वथा न घडेची ॥
मर्कटासी सिंहासन । किंवा कागासी अमृतपान । वांझेसी वरमायपण । सर्वथा जाण न घडेची ॥
जे जीव तदंश होती । तेची पावती सदगुरुभक्ती । निजसुखातें भोगिती । इतरा भ्रांती जन मूढां ॥
श्रोतीं न मानावा खेद । म्यां आपुल्या मनासी केला बोध । भावें भजावा आनंदकंद । मोक्षाचें पद पावावया ॥
सुख धरोनी प्रपंचाचें । संचित होतसे पापाचें । भरतें दाटे भवसिंधूचें । जन्ममरणाचें भय थोर ॥
प्रपंचीं जरी सुख जोडे । तरी कां सेविती गिरीकडे । राज्य टाकुनी गेले थोडे । ते काय वेडे ह्नणावे? ॥
भर्तुहरीनें राज्य टाकिलें । तेणें श्रीगोरखातें पुसिलें । राज्य टाकुनी मुंडित जालें । कितेक गेले भूपती ॥
मग श्रीगोरक्षनाथ बोलती । नव्याणव कोटी भूपती । इतरांची नाहीं गणती । योगाप्रती निघाले ॥
भवसिंधूच्या डोहीं । विषयाचा गळ घातला पाहीं । काळ लक्षी दिशा दाही । जीव सर्वही भक्षावया ॥
नलगे योगयाग साधन । नलगे व्रत तीर्थ अनुष्ठान । नलगे वैराग्य तप दान । एक सदगुरुभजन करावें ॥
अनेक कर्में केलीं पाहे । तपें राज्य प्राप्त होये । राज्यांतीं नर्क होय । ऐसें बोलताहे वेदशास्त्र ॥
स्वर्गी काय सांगों सुख । पुण्य सरलियां लोटिती देख । मागुती पाहावया मृत्युलोक । स्वर्गनर्क भोगावया ॥
नर्क ह्नणजे गर्भवास । गर्भी पचावें नवमास । नाना दुःखें होती जिवास । त्याहूनी विशेष दुःख काय ॥
जेणें मृत्यूचें मूळ तुटे । जन्म मरणाचें खत फाटे । पापपुण्याची वाढी खुंटे । धरणें उठे काळाचें ॥
ऐसा होवावया एक उपावो । भावें भजावा सदगुरुरावो । जन्ममरणा पुसी ठावो । स्वरुपीं जीव मेळवीं ॥
येथून नाहीं जीव नेला । आणि स्वरुपीं मेळविला । देही असतां मुक्त केला । उगव दाविला जीवासी ॥
जीव आपुला उगव पाहे । इंद्रियांसहित तल्लीन होय । तेथें काळ करील काय । जन्ममरण अपाय खुंटले ॥
जैसे भूपतिचिया बाळें । अनिवार अन्याय केले । तें मातेपुढें जाऊनी बैसलें । मग काय चाले कोणाचें ॥
तैसा जीव स्वरुपीची असे । नाना कर्मे केलीं बहुवसें । तो स्वरुपीं जालिया समरसें । तेथें काळासी रीघ कैचा ॥
स्वरुप अखंडदंडायमान । सर्वां ठाई परिपूर्ण । तेथें जिवासी कैचें जीवपण । समरसोनी एक जालें ॥
जैसें सागरीहुनी लवण । जळापासूनी निर्माण । सगुणत्वें जालें कठीण । ह्नणोनी भिन्न नघडे त्यासी ॥
तेंची जळामाजीं घालितां । जळची होय तत्त्वतां । तें परतोन येईल हाता । हें सर्वथा न घडेची ॥

- हरिभक्त