चढाई 'पेद्रो दि गावा'ची..

मार्च २०१० ला जेव्हा मी
रिओ ऑफिस मध्ये पाय ठेवला तेव्हा दरवाज्यातून समोरच्या खिडकीबाहेर दिसणारे
दृश्य पाहून मी दोन मिनिटे स्तब्ध झालो.. एक प्रचंड मोठी दगडी भिंत, एक
सुळका आणि घनदाट जंगल..   
 
  
 

  

थोडी चौकशी केल्यावर त्या सुळक्याचे नाव
'पेद्रो दि गावा' अस समजले. तेव्हाच ठरवले ह्या सुळक्यावर चढाई करायची..
जेव्हा केव्हा कॅमेरा बरोबर असेल तेव्हा ह्या सुळक्याचे फोटो काढण्याचे जणू
मला व्यसनच लागले..   
 
  
 

  

हळू हळू स्थानिक लोकांशी ओळखी होऊ लागल्या आणि
माझ्या नशिबाने माझी ओळख मिशेल सागास नावाच्या आवली माणसाशी झाली.. मला ही
त्याच्यागत भटकंतीची आवड असल्याचे समजल्यावर त्याने न विचारताच उत्साहाने
रिओ आणि आजूबाजूच्या ट्रेक योग्य जागांची माहिती पुरवली आणि लगेच ३
आठवड्यात 'तिजूका पिक' ला जायचा बेत आखला.. १०२२ मीटर उंचीवर आम्ही जेव्हा
पोचलो तेव्हा पेद्रो दि गावा दुसऱ्या बाजूने पाहण्याच्या योग आला. कॅमेरा
थोडा झूम करून पाहिल्यावर मला त्या सुळक्या मध्ये एका चेहऱ्याचा भास झाला

   

पुढे संपूर्ण ट्रेकमध्ये त्या
चेहऱ्याने माझा पिच्छा केला.. घरी आल्यावर लगेचच जालावर मी अधिक माहिती
गोळा करायला सुरुवात केली
पेद्रो दि
गावा
आणि चेहऱ्या मागची दंतकथा
समजली.. त्यानंतर माझा पेद्रो दि गावा सर करायचा निश्चय अधिक दृढ झाला..
आणि मिशेलला तसे बोलून दाखवले.. मिशेल म्हणाला माझे ही तिथे जायचे बरेच
वर्षे राहून गेले आहे.. पेद्रो दि गावा चा ट्रेक अत्यंत कठीण आहे आणि
माहितगार माणूस बरोबर नसेल तर जीवाचा धोका संभवतो.. त्यामुळे मी आणि
मिशेलने माहितगार माणूस शोधण्याचा सपाटा लावला.. आमच्याच प्रोजेक्ट मध्ये
मार्सेलो आणि एडवार्डो आशी दोन माणसे सापडली, पण काही ना काही कारणाने
पेद्रो दि गावा सर करायचा बेत राहून गेला.. पुढे २-३ महिने प्रोजेक्टच्या
व्यापात बाकी सर्व बेत मागे पडले.. पण परत जाण्या आधी काही ही झाले तरी
पेद्रो दि गावा सर करायचाच असा निर्वाणीचा इशारा मी मिशेल आणि मार्सेलो
यांना दिला.. प्रोजेक्ट गो लाइव्ह च्या दुसऱ्या शनिवारी जाण्याचे नक्की
झाले. कोणी विसरू नये म्हणून चक्क मीटिंग रिमाइंडर सुद्धा टाकला. शुक्रवारी
दुपारी काय काय बरोबर घ्यायचे त्याची खरेदी झाली.. कुठे आणि किती वाजता
भेटायचे ठरवले आणि ऑफिसमधून घरी आलो.. संध्याकाळी ७:३० च्या आसपास आमचे
नशीब बदलले.. ऐन वेळी हवामान अचानक बदलले आणि अवेळी धो धो पाऊस पडू लागला..
रात्री १० वाजता मिशेलचा फोन आला. अपेक्षेप्रमाणे शनिवारचा बेत रद्द
झाला.. सर्व तयारीवर पावसाने पाणी फिरवले.. 'तिजूका पिक'च्या वेळेस
रेनफॉरेस्ट म्हणजे काय ह्याचा अनुभव पाठीशी असल्यामुळे इतका पाऊस रात्रभर
पडल्यानंतर तिथे पायवाटेची काय वाट लागली असेल ह्याची मला कल्पना होती..
म्हणून मी गुपचुप मूग गिळून गप्प बसलो.. शनिवार आणि रविवार दोन दिवस रिपरिप
पाऊस पडत राहिला.. सोमवारी कोरडे ठणठणीत आणि रखरखीत उन्ह.. पुन्हा
शुक्रवारी ट्रेकचा बेत ठरला.. सगळी तयारी झाली.. पुन्हा संध्याकाळी हवामान
बदलले आणि मागच्या आठवड्यासारखेच पावसाने साऱ्या बेतावर पाणी फिरवले..
प्रचंड चिडचिड झाली.. मिशेल आणि मार्सेलोला म्हटले आम्ही भारतात पाऊस पडू
लागला की मुद्दाम ट्रेकला जातो आणि तुम्ही लोक घाबरटासारखे ठरलेले ट्रेक
रद्द काय करता, उलट पावसात जास्त मजा येते. माझ्या या युक्तिवादाला
मार्सेलो फक्त छद्मी हसला आणि त्या आठवड्यात पण पेद्रो दि गावा चा बेत रद्द
केला.. पुन्हा सोमवारी कोरडे ठणठणीत आणि रखरखीत उन्ह.. पुन्हा शुक्रवारी
ट्रेकचा बेत ठरला.. सगळी तयारी झाली.. ह्या वेळेस पाऊस पडू नये म्हणून
देवाची प्रार्थना ही केली.. शुक्रवारी मागच्या दोन आठवड्या प्रमाणे पाऊस
पडला नाही!! मी आनंदात पहाटे ४ ला उठलो.. ७ वाजता ठरल्या ठिकाणी पोचायचे
म्हणजे ६ ला घर सोडायला हवे ह्या बेताने आवराआवरी सुरू केली.. ५:३० ला थोडे
झुंजूमुंजू झाले पण नेहमी माझ्या गच्चीतून दिसणारे 'तिजूका पिक' आज
ढगांच्यामागे लपले होते.. ६ वाजता मिशेलचा फोन आला ह्या वातावरणात आपल्याला
काहीही दिसणार नाही.. थोडे थांबू आणि ९ वाजता पुन्हा परिस्थितीचा आढावा
घेऊ.. साधारणता ७:३० ला धो धो पाऊस सुरू झाला.. पुढे काय होणार याची कल्पना
होतीच. मी शांतपणे पांघरूण ओढून पडी मारली.. सकाळी ९ ला येणारा मिशेलचा
कॉल रात्री ८ ला आला, उद्या हवामान स्वच्छ असणार आहे असा अंदाज त्याने
टीव्हीवर पाहिला आहे, जर पहाटे ढग नसतील तर आपण पेद्रो दि गावाला जायचे का?
मी म्हटले आता रात्री जायचे असेल तरी मी तयार आहे.. मिशेल ने सगळ्यांना
फोनाफोनी केली.. पुन्हा सकाळी ७ ला भेटायचे ठरले.. पहाटे ५:३० ला गच्चीतून
'तिजूका पिक' दिसल्यावर माझ्या आनंदाला पारावा उरला नाही.. भरभर आवरून मी
मिशेलची वाट बघत आमच्या अपार्टमेंटच्या प्रतीक्षा कक्षात जाऊन थांबलो.. ७
वाजता मिशेलचा फोन आला.. मी माझी पाठीला लावायची पिशवी उचलली आणि फोन
कानाला लावतच लगबगीने प्रतीक्षा कक्षाच्या बाहेर आलो.. पालीकडून मिशेल
अतिशय थंड स्वरात बोलला, मार्सेलो काही वैयक्तिक कारणाने येऊ शकत नाही आहे
आणि वाट माहिती नासल्यामुळे आज ही आपल्याला जाता येणार नाही.. मी मला
येणाऱ्या इंग्रजी भाषेतल्या सर्व शिव्या मार्सेलोला एका दमात दिल्या.. माझा
त्रागा बघून मिशेलला काय वाटले कुणास ठाऊक, त्याने व्यावसायिक वाटाड्या
घेऊन जायचे का? असा प्रश्न मला बिचकतच केला. व्यावसायिक वाटाड्या म्हणजे
इथे प्रचंड खर्चीक काम.. ८ तासाचे ६००० ते ८००० रुपये.. मी कुठलाही
व्यावहारिक विचार न करता, क्षणाचा ही विलंब न करता हो म्हटले.. पुढे १ तास
मिशेल ने १०-१२ जणांना फोन फिरवले तेव्हा कुठे ऑलीव्हेर नावाचा एक वाटाड्या
६७५० रुपयाला तयार झाला.. ८:३० वाजता भेटायचे ठरले.. माझ्या बरोबर माझ्या
टीमचा विनय गोविंदराजुलू यायला तयार झाला, ८:३० ला मिशेल आणि त्याची बायको
'जो' आम्हाला घ्यायला आले, पेद्रो दि गावाच्या पायथ्याशी असलेल्या एका
हॉटेल मध्ये आम्ही कॉफी पीत ऑलीव्हेरची वाट पाहत थांबलो.. ९ वाजता ऑलीव्हेर
आला आम्ही त्याच्या गाडी मागोमाग आमची गाडी न्यायला सुरुवात केली आणि
पुढच्या दहा मिनिटात आमच्या गाड्या पेद्रो दि गावाच्या पायथ्याच्या
पार्किंग लॉटमध्ये लावल्या.. पिशव्या पाठीला अडकवल्या. मी हर हर महादेवाची
आरोळी ठोकली.. विनय तेलगू का तमिळ असल्यामुळे इतर तीन ब्राझीलीयन लोकां
प्रमाणे त्याने काय वेडा माणूस आहे असे माझ्याकडे बघितले.. मी पर्वा इल्ले
म्हणून चालायला सुरुवात केली.. साधारणता ३० मीटर वर घनदाट जंगल सुरू झाले..
वाटेत झाडाला लगडलेले /झाडाखाली पडलेले फणस दिसू लागले..

  

वाटेवर झाडांची मुळे.. भले मोठे दगड.. पाण्याचे
झरे.. पडलेले मोठे वृक्ष पार करत मजल दर मजल करत आमची चढाई सुरू झाली..
वाटेत आमच्या सारखेच उत्साही लोक हि भेटले..

    

झाडांच्या मुळांना, दगडांतील
खाचा कापऱ्यांना धरून आमचे मार्गक्रमण चालू राहिले..

 

जसजसे आम्ही जंगलात आत आत शिरलो तसं तसे प्रचंड मोठे
वृक्ष आणि कोसळलेल्या शिळा दिसू लागले.

   

वाटेत आम्हाला ब्राझीलीयन Mico
Estrela माकडांचे आणि सरड्याचे दर्शन झाले..

  

एक तास पायपीट केल्यावर ५०० मीटर उंचीवर एक
पठार आले, तिथे सगळ्यांनी जरा वेळ बूड टेकून विश्रांती घेतली   
 
अजून एक २०० मीटर चढाई केल्यावर प्रथमच त्या गूढ चेहऱ्याचे जवळून
दर्शन झाले..

 

ह्या सुळक्याला लागून उजवी कडे एक पायवाट जाते
त्यावाटेने सुळक्याला अर्धा वेढा घातल्यावर सुळक्यावर जायची वाट आहे..
सुळक्याच्या सावलीत क्षणभर थांबून आजूबाजूच्या देखाव्याचा आस्वाद घेतला..
दूरवर
दिसणारे 'तिजूका पिक'     

 

बाहा शहर..   
 
बाहा चा समुद्र किनारा..   
 
आणि ज्या ऑफिसच्या खिडकीतून हा सुळका दिसतो ते ऑफिस कॉम्प्लेक्स..
  
 
सुळक्याला वळसा घालून थोडे पुढे आल्यावर मार्सेलो छद्मीपणे का
हसला होता ह्याची जाणीव झाली.. पुढे पाऊलवाट संपली होती आणि शंभर एक मीटर
उंचीची दगडाची भिंत आवासून उभी होती.. आमच्या आधी पोचलेले लोक त्या भिंतीला
लटकून वर सरपटताना बघितल्यावर

 

एक आवंढा गिळला.. आपण इथूनच परत फिरावे असे ही एक
क्षण वाटले.. पुढच्या क्षणी आमचा मराठीबाणा जागा झाला आणि आम्ही भिंतीला
चिकटलो.. पहिली ढांग टाकली आणि बूट घसरत असल्याची जाणीव झाली.. पुन्हा खाली
आलो आणि बूट काढून पिशवीत टाकले
  
 
 आणि अनवाणी चढाई सुरू केली   
 
  
 
  
 

   

आमची ही अनवाणी चढाई सर्व
ब्राझीलीयन लोक अचंब्याने बघत होती..

  

एक तासाच्या अवघड चढाई नंतर आमचे चरण पेद्रो दि
गावाच्या माथ्याला टेकले..   
 
  
 

 

चहूबाजूंचे दृश्य वर्णन करायला माझ्याकडे शब्द
नाहीत... नंतर साधारणता १० मिनिटे फक्त क्लिक क्लिक क्लिक.. दुसरे काही ही
नाही.. कोणी ही कोणाशी ही काही ही बोलले नाही..
बाहा चा समुद्र किनारा   
 
साओ कॉन्राडो किनारा
लागोआ(तळे)
रिओची कुप्रसिद्ध झोपडपट्टी- फावेला
सुळक्या लगतची दरी
शेजारचा पेद्रो बोनीता इथून पॅराग्लायडीग करतात.. (पुढच्या
विकांताचा बेत)
ऑन दि टॉप ऑफ दि वल्ड
ज्या शीळेवर आम्ही बसलो आहोत ती शीळा पायथा कडून अशी
दिसते..
निसर्ग भारतातील असो वा ब्राझील मधील त्याची किमया अगाद आहे आणि
मनुष्यप्राणी त्याच्या पुढे कस्पटासमान आहे ह्याची पुन्हा एकदा जाणीव
झाली..