भाजीबाजाराची कथा

    वेळच्या वेळी अगदी नियमीतपणे घर आवरून टापटीप ठेवणाऱ्यांबद्दल मला फारच आदर वाटतो बुवा; कारण कितीही ठरवलं ना की आता आजिबात घरात पसारा करायचा नाही तरीही आमच्या घरात तो होतोच. अगदी नियमितपणे आवरायचं ठरवलं तरी जमतंय थोडंच? आम्ही पसारा आवरतो ते जर पाहुणे येणार असतील तर आणि तरच फक्त - हे सत्य आहे. (आणि सत्य तसं फार कमी वेळा कटू नसतं!) त्यातूनही नुसते चहाला किंवा जेवायला येणारे पाहुणे असतील तर काम तसं सोपं असतं. हॉलमधला पसारा बेडरूममध्ये ढकलायचा. टेबलावर जो काही पसारा असेल तो कपाटात कोंबायचा, की झालं! शेवटच्या अर्ध्या तासातही पटापट वरच्यावर आवाराआवरी आणि सारवासारवी करता येते की लगेच हसतमुखानं पाहुण्यांचं स्वागत करायला तय्यार! पण खरी कसोटी लागते ती राहायला येणारे पाहुणे असतील तर! घराच्या कान्याकोपऱ्यात पहुडलेला पसारा मग आधी आवरून ठेवावाच लागतो. काही स्वच्छतेची कामं कित्येक दिवस ऑप्शनला पडलेली असतात. ती उरकायलाच लागतात. (त्यामुळे आजकाल घरात अती पसारा झाला की कोणा पाहुण्यांना बोलवावं की काय असं मनात येतं...निदान त्या निमित्तानं तरी आमचं घर जरा स्वच्छ होईल!)

    तर त्या दिवशी असंच पुण्याहून पाहुणे मुक्कामाला यायचे होते म्हणून सकाळी सकाळीच घरातला सगळा पसारा आवरण्याचं काम अंगावर घेतलं. बरीचशी कामं एकदाची उरकली आणि हश्श्य हुश्श्य करत पलंगावर पाठ टेकवली. तसं फार वेळ झोपायला मिळणार नव्हतंच कारण लगेच स्वयंपाकाला लागावं लागणार होतसं. मीच मोठ्या उत्साहात चारी ठाव स्वयंपाकाचा बेत केला होता. पण त्याची सुरूवात मात्र बाजारातून भाजी आणण्यापासून करायची होती! किती बटाटे, किती मेथी अन मटार आणि काय काय लागेल ह्याची मनातल्या मनात यादी करतच मी डोळे मिटले.

    .......    हातातल्या भाजीच्या रिकाम्या पिशव्या हलवत हलवत मी चालत होते. मंडईतून....ते ही आमच्या आजीच्या मागोमाग. "आज्जी, चल ना कंट्टाळा आलाय अगदी.." अशी भुणभूणही चालू होती. आजी मात्र प्रत्येक भाजीवाल्याबरोबर तेवढ्याच हिरिरीनं भावाची घासाघीस करत होती आणि तिच्या जवळच्या पिशवीत भाज्या भरत होती. तिच्या जवळच्या दोन्ही पिशव्या भरल्या की मग माझ्याजवळच्या. म्हणजे अजून बराच वेळ खरेदी चालणार तर! दुपारची वेळ होती. मंडईत नेहमीप्रमाणेच भरपूर गर्दी, गडबड, गजबज होती. भाज्यावर मारलेलं पाणी खालीही बरचं सांडलं होतं. जमीनीवर थोडा चिखलही होताच. खराब झालेल्या भाज्या खाली टाकलेल्या होत्या. तिथेच पोतीही पडलेली होती. त्यातल्याच एका ओल्या झालेल्या पोत्यात अस्मादिकांचा पाय अडकला आणि मी पडणार, तेवढ्यात  .....

मला दचकून जाग आली! भाजी आणायला मी पुण्याच्या मंडईत पोचले होते खरी... पण स्वयंपाक करायचा होता अमेरिकेतल्या घरी! आणि बरोबर होती माझी आजी...तिला जावूनही आता कितीतती वर्षं झाली! काळ, वेळ, स्थळं, प्रसंग आणि माणसं ह्यांची अशी जबरदस्त खिचडी केवळ स्वप्नातच शिजू शकते! स्वप्न अजून थोडा वेळ चालू राहिलं असतं तर आजीबरोबर आणखी काही वेळ मिळाला असता, नेहमीप्रमाणे आजीनं घरी येतायेता आइस्क्रीमही खायला घातलं असतं असं वाटून गेलं! पण स्वप्नात रमायला वेळ होता कुठे? संध्याकाळी घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर इज्जतीचा सवाल होता ना! तडक उठून भाजी आणण्यासाठी "safeway" ला निघाले.

    'safeway' हे अमेरिकेतल्या मोठ्या 'ग्रोसरी स्टोअर'चं नाव आहे. मला हे जेव्हा पहिल्यादा कळलं होतं तेव्हा जरा आश्चर्यच वाटलं होतं. असं काय वेगळंच नाव आहे बुवा! असं क्षणभर वाटून गेलं. बाकी तसंही म्हणा, ह्यापूर्वी मी ‘प्रभू रामचंद्र धुलाई केंद्र’ नावाच्या दुकानातून कपडे ड्रायक्लीन करून घेतले होते; 'आई गं' नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जेवले होते आणि 'डोईफोडे' आडनावाच्या बाईंकडून 'हेड मसाज'ही करून घेतला होता. त्यामुळे 'सेफ वे' नावाच्या दुकानातून भाजी घ्यायला माझी तशी काहीच हरकत नव्ह्ती. सेफ वेत गेल्या गेल्या मला तर थंडी वाजायला सुरूवात झाली. येणाऱ्याला 'वॉर्म वेलकम' करण्याची खरं तर आपली पद्धत; पण इथे गिऱ्हाईकाचं आत आल्या आल्या असं थंडगार स्वागत? त्या थंडीबद्दलची नापसंती तेवढी सोडली तर बाकी तक्रारीला जागा नाही! पहिल्यांदा सेफ वे ला गेले तेव्हा तर दुकानात जे काही दिसत होतं ते बघून मी अवाकच झाले होते. केवढं मोठ्ठं ते दुकान! केवढी ती पदार्थांची व्हरायटी! ब्रेड आणि चीझच्या भागांत तर एवढे असंख्य प्रकार होते की आजवरच्या आयुष्यात एवढे प्रकार मी कधी पाहिले नव्हते. पदार्थांच्या व्हरायटीचं राहू द्या, आजवरच्या आयुष्यात एवढं मोठ्ठ 'ग्रोसरी'चं दुकान मी कधी पाहिलं नव्ह्तं. माझ्या आठवणीत होती ती गावच्या पेठेतली किराणा मालाची तेलकट दुकानं आणि छोटी छोटी भाजीची खोपटं...एवढचं! आज काल खरं तर भारतात सुद्धा कितीतरी सुपर मार्केटस झाली आहेत... पण भारतात होते तेव्हा तिकडे कधी फिरकले असीन तर ना! बाजारहाट, स्वयंपाक असल्या संसारी कामांशी चुकुनही संबंध येवू दिला नाही मी! तरी आई सांगत असायची,"आत्तापासूनच सवय लावा म्हणजे पुढे अवघड नाही वाटणार.."वगैरे वगैरे.... पण तिच्या त्या बोलण्याकडे लक्ष्य दिलं असेल तर ना! कधीतरी आई खूप रागावलीच तर, तिला भाजी आणून देण्यापर्यंत माझी मजल जायची. पण मंडईपर्यंत किंवा सुपरमार्केट पर्यंत जायचे कष्ट कोण घेणार? घरासमोरच्या 'बबन' भाजीवाल्या’कडे पळत सुटायचं आणि २,४ भाज्यानी भरलेली पिशवी आईच्या हातात कोंबायची की आपण मोकळं!

    ह्या बबनकडे भाजी खरेदीचा अनुभव म्हणजे तसा अगदीच घरगुती आणि साधा सरळ असायचा. ग्लोबलायझेशनचं वारं न लागलेला! बबनच दुकान म्हणजे एक छोटसं खोपटं.  सेफ वे मधल्या एका छोट्याश्या कोपऱ्यात त्याचं आख्खं दुकानं मावलं असतं. भिंतीत मारलेल्या चार लाकडी फळ्यांचे कप्पे आणि त्यावर मांडलेल्या काही भाज्या. पण दुकानात गिऱ्हाईकांची गर्दी मात्र कायम! बबन प्रत्येकाशी आपुलकीने बोलायचा. मी जायचे तेव्हा स्वतःच मला चांगली भाजी बघून द्यायचा. त्याच्याकडे हातात तोलून धरायच्या वजन काटा असायचा. त्याच्यात वेगवेगळ्या मापाची वजनं टाकायचा, एकीकडे तोंडी हिशोब करायचा की काम झालं! मी जर भाजीला पिशवी न्यायला विसरलेच तर बबनची बायको स्वतःची पिशवी द्यायची; किंवा शेंगा वगैरे असतील तर कागदाच्या पुडीत गुंडाळून! प्लास्टिकच्या भारंभार पिशव्या नाहीत किंवा सेफ वे मध्ये भाज्या ताज्यातवान्या रहाव्या म्हणून सतत चालू असतात तसे गार पाण्याचे फवारे मारणारे ‘ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स’ नाहीत. कम्प्युटरवर बिलविल करायची भानगड तर दूरच. कम्प्युटरचं सोडा पण बबन शाळासुद्धा किती शिकला असेल कोण जाणे. भाजीचे तोंडी हिशोब मात्र न चुकता आणि अगदी पटापट करायचा. वडिलोपर्जित भाजीचा व्यवसाय. 'ऑन द जॉब ट्रेनींग' म्हणतो तेवढंच काय ते शिक्षण! पण सगळ्या कुटुंबाचं छान चालायचं त्या दुकानावर! बबनचा मुलगा दुकानाच्या मागच्या बाजूला अभ्यास करत बसलेला असायचा. "पोरगा अभ्यासात हुशार आहे; त्याला दुकानचं चालवायची सक्ती करणार नाही" असं म्हणायचा. "पुढेमागे चालवायचं म्हणालाच तर मोट्ठ दुकान काढू, कम्प्युटरचा उपयोग करू." असंही म्हणायचा. बबनची बायकोही असायची नेहमी. कधी कुणी घाईत दिसलं तर आवर्जून म्हणायची,"काकू, तुम्ही या बाकीची कामं करून. मी तुमच्यासाठी भाजी निवडून ठेवते तोपर्यंत."

    तर असा आणि एवढाच काय तो माझा 'भाजीबाजारा'चा पूर्वानुभव! अगदी घरगुती. सोफिस्टिकेशनचं पाणी जराही न लागलेला....आणि त्यानंतर 'ग्रोसरी शॉपींग'ची वेळ आली ती थेट अमेरिकेतल्या सेफ वे’मध्येच! तिथे तर सगळंच रोखठोक. ह्या दोन्ही ठिकाणच्या अनुभवांत इतकं जमीन अस्मानाचं अंतर की 'गांव की छोरी शहरमें' वगैरे चित्रपटात दाखवतात अशीच अवस्था व्हावी! पण हळूहळू सेफ वे ची चांगलीच सवय झाली! इतकी की, तिथे जायचं ते दूध भाज्या वगैरे आणायला आणि नंतर एक चक्कर चीझ, केक, आईस क्रीम ठेवलेल्या भागांतूनही - असं रूटीनचं बनून गेलं. केक, आईसक्रीम, चीझ, चॉकोलेट्स असले पदार्थ 'रूटीनली' खाल्यानंतर जे व्हायचं तेच झालं; आमच्या व्यक्तीमत्त्वाला चांगलंच वजन प्राप्त व्हायला लागलं! असल्या वजनदार सवयी वेळीच बदललेल्या बऱ्या म्हणून आम्ही आमचा मोर्चा 'फार्मर्स मार्केट'कडे वळवला. ह्या 'फार्मर्स मार्केट'मध्ये एक चांगलं असतं ते म्हणजे आईसक्रीम आणि केकबीक सारख्या (गोड लागून घात करणाऱ्या) वस्तू तिथं मिळतंच नाहीत!

    फार्मर्स मार्केट म्हणजे खराखुरा शेतकऱ्यांचा बाजार असतो. जे शेतकरी पिकवतात, तेच त्यांचा माल विकायला आणतात. आपल्या गावाकडं कसा आठवडी बाजार असतो ना तसाच काहीसा प्रकार. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ओळीनं भाज्यांचे आणि फळांचे ढीग मांडून बसलेले आणि आपल्या खास गावरान ढंगाच्या भाषेत बोलणारे अनेक भाजीवाले आणि मधल्या रस्त्यातून वाट काढत, हातातल्या पिशव्या सांभाळत सांभाळत चालणारी, आठवड्याभराची भाजी घ्यायला आलेली अनेक गिऱ्हाईकं! इथेही सगळे सुट्ट्या पैशातलेच व्यवहार असतात. अगदी भाजीच्या भावावरून चाललेली घासाघीससुद्धा! फरक फक्त एवढाच की घासाघीस असते ती 'क्वार्टर्स' आणि 'डाईम' मधली आणि बोलण्याची भाषा अर्थातच इंग्लिश. पण प्रत्येकाचा बोलण्याचा 'ऍक्सेंट' निराळा. कुणी चायनीज वंशाचा, कुणी मेक्सिकन तर कुणी गोरा अमेरिकन. प्रत्येकाची बोलण्याची लकबच निराळी! पण काही काही जण मस्त गप्पा मारतात. गावाकडची, शेतावरली काय काय माहिती सांगत असतात. चक्क शेतकऱ्यांशी गप्पा मारायला मिळतात आणि अगदी मंडईसारख्या माहोलात भाजीखरेदी केल्याचा आनंद मिळतो; म्हणून ह्या फार्मर्स मार्केटला उत्साहानं येणारे कितीतरी आहेत! पण इथे ना शॉपींग कार्ट मिळते ना डोक्यावर छप्पर असतं! त्यामुळे उन्हातान्हात फळं,भाज्यांच्या जड पिशव्यांची ओझी वाहण्याचे तेवढे कष्ट पडतात! पण त्या कष्टांची फळं एवढी गोड!! पीचेस, प्लम्स, चेरीज, स्ट्रॉबेरीज इतक्या ताज्या, गोड आणि रसाळ असतात की कष्टांच फळ मिळणं वगैरे शब्दप्रयोग असल्या फार्मर्स मार्केटमुळे तर चालू झाले नसतील असं वाटावं. बाकी आम्ही पडलो सूर्यवंशी. उन्हं वर आली तर पलंग आणि पांघरूणाच्या साथीनं निद्रादेवींची आराधना करत राहण्यातच आम्हाला आनंद जास्त. त्यामुळे सकाळी लवकर उठायचं (आणि ते ही रविवारी) आणि ह्या फार्मर्स मार्केटला सुटायचं ह्याचा नाही म्हटलं तरी कंटाळा येतोच!

    भारतात येतात तसे भाज्या आणि फळांचे गाडीवाले इथे का येत नाहीत असं राहून राहून वाटतं. म्हणजे चार पायऱ्या उतरल्या की झाली भाजीखरेदी. मला आठवतंय पूर्वी आमच्या शेजारी राहणाऱ्या एक आजीबाई तर तेवढेही कष्ट घ्यायच्या नाहीत. "दोडकी, मुळा, भोपळाSSSय" किंवा "मटकी म्वॉडSSS" अशी नेहमीची आरोळी ऐकू आली की त्या गॅलरीतूनच सुट्टे पैसे टाकायच्या. भाजीवालीलाही सराव होताच. ती ही मग नेम धरून भाजीच्या गड्ड्या, मटकीच्या पुड्या वर फेकायची! जर चुकून नेम चुकलाच तर परत खेळ चालू! आजकाल मला त्यांच्या त्या 'कॅचकॅच'च्या 'मॅच'ची फार आठवण होते. काय भारी सोय होती! काय आहे; म्हणजे पाहुणे वगैरे येणार असले की आधीच खूप काम पडलेलं असतं. घरातली सगळी आवराआवरी आणि स्वच्छता करून करून माझी दांडी गुल झालेली असते. त्यात स्वयंपाकाचंही मोट्ठ काम अंगावर ओढून घेतलेलं असतं. मग भाज्या, फळं वगैरे अशी पटापटा 'कॅच'करून घ्यायची सोय झाली तर उत्तमच आहे. नाही का?

    तर अशी ही भाजीबाजाराची कथा! प्रत्येक ठिकाणंची मजा निराळी. एरवी भाजी आणणं हे तसं 'रूटीन' आणि म्हटलं तर जरासं कंटाळवाणं काम. पण त्यातही एवढं काही अनुभवण्यासारखं आणि लिहिण्यासारखं मिळेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं!