मज सांग रे मना तू - जडलास तू कुणावर?

मज सांग रे मना तू - जडलास तू कुणावर?
कुणि मोहजाल पसरी - स्वप्नातल्या जगावर? ।ध्रु।

मादक सुरावटी का - ही रात्र गात आहे?
येऊन नीज नयनी - का दूर जात आहे?
कुणि दुष्ट ओढ लावी - माझ्या मना अनावर ।१।
कुणि मोहजाल पसरी .....

हृदयावरी धडकत्या - ताबा उरे न आता
जाणार रात्र बहुधा - कुक्षी बदलबदलता
तो येतसे कदाचित - हृदया, स्वतःस सावर
।२।
कुणि मोहजाल पसरी .....

ऋतु भासतो गुलाबी - ओलावलेत वारे
केवळ न चंद्र तारे - धुंदीत विश्व सारे
गाऊन कोणि गेला - हळुवार गीत सुस्वर
।३।
कुणि मोहजाल पसरी .....

टीपा :

१. अनावर, सावर, सुस्वर ह्यांचे उच्चार अनावर्, सावर्, सुस्वर् असे करावे.

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   (गागालगालगागा - गागालगालगागा (आनंदकंद? )) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक वर असे जमवा बरका ! (उच्चार वर् असा करायचा.)

(संपादित : प्रशासक)