अखेर!

........................................
अखेर!
........................................

हात आकाशा तुला आलो कुठे लावून मी?
शांत झालो शेवटी नुसताच घोंघावून मी!

कोण जाणे स्वप्न का हे सारखे पडते मला...
चाचपावा सूर्य़; अंधारात झेपावून मी!

थांबुनी ठेवायचे दारी असे त्याला किती?
... चांदण्याला घेतले मग आत बोलावून मी!

जायचे किंवा कसे; ठरवायचे आहेस तू...
सोडले आहे तुला केव्हाच भंडावून मी!!

ओळखू येई न आता विश्व माझेही मला
घेतली विश्वे किती माझ्यात सामावून मी!

आणते डोळ्यांत पाणी एवढेसे दुःखही
ठेवले आहे मला भलतेच लाडावून मी!

आरसा माझ्यापुढे धरला कुणी हा? कोणता?
पाहतो आहे असा कोणास भांबावून मी?  

राहिला नाही चवीचा अर्थ आता एकही...
शब्द सारे टाकले आहेत उष्टावून मी!

एवढेही रुक्ष कोणीही मला समजू नये...
पापण्या जाईन साऱयांच्याच ओलावून मी!

- प्रदीप कुलकर्णी
................................................
रचनाकाल  :  ५ ऑगस्ट २०१०
................................................