ठिगळ

इतके कुणी कुणाच्या जावे जवळ कशाला
लगटून वार करण्या द्यावेच बळ कशाला

आयुष्य भोगण्याची संधी पुन्हा न येते
ही अर्थ शोधण्याची ढवळाढवळ कशाला

मातीत चाक रुतणे चुकते इथे कुणाला
प्रारब्ध माणसाचे ठरते अटळ कशाला

नीती म्हणून काही उरली न औषधाला
मी अन्यथा कुणावर ओकू गरळ कशाला

उल्केसमान सारे खातात रोज माती
मी एकटाच येथे राहू अढळ कशाला

कोणी म्हणोत काही, बसणार स्वस्थ आता
आकाश फाटल्यावर लावू ठिगळ कशाला