ऑगस्ट १५ २०१०

प्रतिबिंब

माझ्या अभ्यासिकेच्या खोलीतून ते घर दिसतं. तीन खोल्यांचं छोटेखानी! समोर अंगण असलेलं. त्या अंगणात रोपं लावलीत, अबोलीची, झेनियाची आणि धुंद करून टाकणाऱ्या मोगऱ्याची. आमच्या मोठ्या बंगल्यापुढे ते घर फारच छोटंसं दिसत, तरीही मला ते खूप आवडतं. चार ते सहा हा माझा वेळ लेखन, वाचन आणि मनन करण्याचा. एकदा या अभ्यासिकेत आले की मी लिखाणात आणि वाचनात दंग होते. रोजनिशी लिहायची हा नियम मी न चुकता पाळते. त्यानंतर चांगली पुस्तकं वाचून त्यावर मनन करायचं. चार ते साडेपांचपर्यंत हा कार्यक्रम व्यग्रतेने चाललेला असतो. साडेपांचच्या दरम्यान ती बाहेर येते, अंगण झाडायला आणि माझं वाचनातलं लक्ष उडतं तिच्या मोहक हालचाली न्याहाळण्यात गुंतून जातं अंगणाचा कानाकोपरा स्वच्छ करणारे तिचे गोरे, काचेच्या बांगडयांनी भरलेले हात. साडी वर खोचून, कपाळावर आलेले केस मागे सारून, झाडाच्या मुळांशी कोरून नवीन माती घालतानाची तिची व्यग्रता! हे सारं करत असताना घरातून तिची छोटी धावत येते, मळक्या हातांनीच ती तिला उचलून घेते, गोल गोल गिरकी घेत तिच्या गोबऱ्या गालांची पापी घेते. छोटीला घेऊन ती घरात गेली तरी हाताच कोपरे टेबलावर टेकवून, हाताच्या ओंजळीत हनुवटी टेकवून मी कितीतरी वेळ त्या घराकडे बघत राहायची. रस्त्याच्या एका बाजूला आमचा बंगला आणि दुसऱ्या बाजूला ते घर. फार लांब नाही. या एवढ्या अंतरावरूनही मला त्या घरातली स्पंदन जाणवायची. त्या घराची दारं, खिडक्या, अंगण सारे माझ्याशी गुजगोष्टी करायचे, हवेबरोबर मंदमंद हेलकावे घेणारे पडदे त्या मालकिणीचं गुपीत मला सांगायचे.

मला माहीत होतं, आता ती घरात जाणार छोटीच आणि तिचं आवरणार. तो येण्याच्या आत. काठपदराची साडी असली तर लांब बाह्यांचा ब्लाऊज, लांब वेणी, त्यावर माळलेला मोगरीचा गजरा. तलम साडी असेल तर त्यावर स्लिवलेस ब्लाऊज, लांब केसांचा, उंच मध्यभागी घातलेला अंबाडा. ती अशी आवरून तयार झाली की माझं घड्याळाकडे लक्ष जायचं, साडेसहा झालेले असायचे, व्हिजीटसाठी सातला बाहेर पडायचयं. सात ते आठ विवेकानंद केंद्रात मोफत उपचार, आठ वाजता खालचा दवाखाना उघडायचा, मग पेशंटची गर्दी व्हायची, त्यांची दुखणी, गाऱ्हाणी, त्यांचे इलाज, औषधोपचार यामध्ये ’ते घर आणि ती’ सारं काही मी विसरून जायचे. एक कोडं माझं मलाच उमगत नव्हतं. ते घर, त्या घरातली ’ती’ आणि इतर माणसं मला आवडत होती, त्यांना बघणं, त्यांना न्याहाळणं, माझा अगदी आवडता छंद होता, तरीही ती माझ्या दवाखान्यात आली की तिच्याशी अत्यंत तुसडेपणाने वागायची, तिचा अपमान करण्याची एकही संधी मी सोडायची नाही, अंतर्मुख होऊन विचार करायला लागले की मला अपराधी वाटायचे, असं का? खूप विचार करून शोधण्याचा प्रयत्न करायचे, पण कारण सापडत नव्हते. मी एक प्रतिष्ठित डॉक्टर होते, मला असं वागणं शोभत नव्हते, हे मलाही कळत होते, तरीही हे असं घडायचच, मग मनाला चुटपुट लागायची. पुन्हा असं होऊ द्यायच नाही असं ठरवूनही परत असच काहीतरी घडायचच.

त्यादिवशी तिच्या छोटीला, सायलीला ताप होता, लगबगीने आल्याने तिला श्वास लागला होता, सायलीला तपासायला घेतलं आणि हिची बडबड सुरू झाली, "काल रात्रीपासूनच ताप आहे, रात्रभर जागी होते ती आणि मी, फारच काळजी वाटतेय हो, कसला असेल ताप?, बरं वाटेल नां लवकर?, ती फारच नाजुक आहे" आज मी मनाशी नक्की ठरवलं होतं तिच्यावर रागावायचंच नाही, त्याचवेळेस सायलीने तपासायच्या टेबलवर शू केली, तरीही मी तुसडेपणा करणार नव्हते, ती घाईगर्दीत दवाखान्यात आली आणि सायलीच्या आजारपणाच्या काळजीमुळे दुपटं आणायला विसरली असणार, मी कंपाउंडराला कपडा आणायला सांगणारच होते, तेवढ्यात माझं लक्ष तिच्याकडे गेलं, सायलीने टेबल ओलं केलं आहे याकडे तिच लक्षच नव्हतं, मायेने तिचे डोळे भरून आले होते, सायलीविषयी वाटणारे प्रेम तिच्या नजरेतून ओसंडून वाहत होतं. ती नजर बघितली आणि क्षणभर मी माझे अस्तित्वच विसरले, माझ्या मनावरचा ताबा सुटला, मी जोरात ओरडले, " अग बघतेस काय अशी बावळटासारखी, मुलीने सगळं टेबल ओलं केलंय ते पूस आधी, मग रड! एवढया शिकलेल्या मुली तुम्ही, साध्या साध्या गोष्टी कळत नाही" ती खूपच ओशाळवाणी झाली, उतरलेल्या आवाजात तिने विचारलं डॉक्टर कपडा मिळेल का एखादा? कपडा द्यायला काही हरकत होती का पण नाही,

माझा पारा आणखीनच चढला आणि वरच्या स्वरात मी ओरडले, साध दुपटं सुद्धा आणता येत नाही का घरून? तिचा चेहरा आणखीनच उतरला. " एक मिनिट ", असं म्हणत ती घराकडे धावली, घरून आणलेल्या दुपट्याने तिने टेबल पुसलं, दुसऱ्या दुपट्यात सायलीला गुंडाळलं. माझ्या तोडून बोलण्याने तिला दु:ख झालं होत, पण ते बाजूला सारून ती काकुळतीने विचारत होती, "डॉक्टर सायलीला बरं वाटेल ना लवकर, काय पथ्य पाळू अंघोळ नको ना घालू दोन दिवस? तिचा झालेला अपमान तिच्यातली आई कधीच विसरली होती. मी कोरडेपणाने उत्तर दिलं, "साधाच ताप आहे, होईल बरी", खरा म्हणजे त्यावेळेस तिला माझ्या धीराच्या, प्रेमाच्या शब्दांची आवश्यकता होती, पण नाही, माझ्यातली कटुता आणखीनच तीव्र झाली होती. सायलीला बरं वाटेपर्यंत ती नेमाने येत होती, प्रत्येक वेळेस या ना त्या कारणाने तिचा अपमान करण्याची संधी मी सोडत नव्हते. त्यादिवशी ती आली वेगळ्याच चिंतेत, तिच्या नवऱ्याला, निरंजनला ताप आणि उलट्या सुरू झाल्या होत्या. मी मनाला सारखी बजावत होते कुठलीही कटुता निर्माण करायची नाही. ताप जरा जास्तच होता त्यामुळे औषध दिल्यावर सांगितलं, ’उद्या जर ताप असेल तर दवाखान्यात आणू नकोस, मी घरी येईन’, नेहमी प्रमाणे त्याची काळजी करत, बडबड करत ती दवाखान्यातून बाहेर पडली. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही ताप जास्त होता म्हणून त्याच्या प्रेमापोटी, काळजीने ती त्याला अगोदरच दवाखान्यात घेऊन आली. ताप उतरतच नव्हता, तापाच निदान झालं ’टाईफाइड’! आता मात्र मी तिला बजावलं, "हे बघ टाईफाइड मध्ये विश्रांतीची आवश्यकता असते, मी घरीच तपासायला येत जाईन, औषधांचा काय परिणाम होतो बघूया, नाहीतर मोठ्या हास्पिटलमध्ये ऍडमिट करूया, पण तू त्याला घेऊन दवाखान्यात मात्र घेऊन येऊ नकोस.

दुसऱ्या दिवशी व्हिजीटला म्हणून घरी गेले. त्याच्या तापाच्या धावपळीतही ते छोटंसं घर तिने स्वच्छ, सुंदर ठेवलं होतं, प्रत्येक कानाकोपरा कलात्मकतेने सजवला होता, तिच्या त्या छोट्याश्या विश्वात ती आनंदात, सुखात होती याची जाणीव होत होती. ’ डॉक्टर, काल ह्यांना खूप भूक लागली होती म्हणून ब्रेडच्या कडा काढून दुधात भिजवून खायला दिला, चालेल ना? टाईफाइडमध्ये फार पथ्य असते, असा ब्रेड द्यायला नको होता. मी त्याला तपासत होते, आणि त्याच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवत ती काळजीने विचारत होती, ’भूक लागली का?, पेज देऊ का? ’ गेल्या पंधरा दिवसात जागरणाने, काळजीने, त्याचं पथ्य, ऒषधांची वेळ सांभाळून कृश झालेली तिची कांती, आणि मायेने ओथंबलेली तिची नजर.! एक क्षणभर माझा हृदयात काहीतरी टोचलं, आणि मी आग पाखडायला सुरुवात केली "सांगितलेली पथ्य पाळत नाही, आणि बरं वाटत नाही म्हणून डॉक्टरांनाच जबाबदार ठरवतात. डॉक्टरांनी सांगितलेले ऐकायचे नाही, स्वतः:ची अक्कल वापरायला सांगितले कुणी? जेवढे म्हणून कटू शब्द वापरता येतील तेवढे मी वापरत होते, तिला जास्तीत जास्त दुखावत होते. "उद्या पेशंटच काही बरं वाईट झालं तर माझ्याकडे रडतं यायचं नाही, मी सांगितलेली पथ्य पाळायची नसतील तर माझं औषध बंद करा". तिने ओंजळीत चेहरा झाकून रडायला सुरुवात केली, पण माझा चढलेला पारा उतरायलाच तयार नव्हता. मनाच्या रागावलेल्या अवस्थेत त्याला इंजेक्शन दिलं आणि कारमध्ये येऊन बसले, पुढे विवेकानंद केंद्रात जायचे होते. ती धावत बाहेर आली, रडवेल्या सुरात म्हणत होती, ’ डॉक्टर, माझं चुकलंच, असा ब्रेड द्यायला नको होता, काही नवीन औषध आणायची का? बरं वाटेल ना डॉक्टर ह्यांना? मी कोरडेपणाने उत्तरले, ’आहे तीच औषध चालू ठेव, आणि बरं वाटण्याबद्दल विचारशील तर तुझा मूर्खपणा तू जोपर्यंत चालू ठेवणार आहेस तोपर्यंत त्याला त्रास होणारच. माझी गाडी चालू झाली तरी ती तिथेच उतरल्या चेहेऱ्याने उभी होती, मी रागाने तिच्याकडे पाहिलं, गाडी चालू केली.

संध्याकाळी अभ्यासिकेत बसल्यावर मात्र मी अस्वस्थ झाले, आज अंगणात तिचा वावर नव्हता, अंगण सुने भासत होते, तिचा रडवेला, केविलवाणा चेहरा डोळ्यासमोर उभा राहिला. त्याच्या दुखण्याने किती हळवी झाली होती ती! कुणाच्यातरी धीराच्या, गोड शब्दांची आवश्यकता होती, कुणाच्यातरी मायेने पाठीवरून हात फिरवण्याची गरज होती. अशावेळेस माझं हे असं कठोर, कटू वागणं. सगळ्यांशी प्रेमाने, वडिलकीच्या नात्याने वागणारी मी तिच्याशीच अशी का वागते? डोळे भरून आलेत, मनावरचा ताण असह्य होऊन मी डोळे बंद केलेत. टप...... टप...... गालावरून आसव वाहायला लागलीत......... त्या आसवांच्या धारांवरून मी हलकेच भूतकाळात शिरले.

त्यावेळेस मी डॉक्टर नव्हते, नुकतीच दहावी पास होऊन, पुढे काय करायचं या संभ्रमात पडलेली शुभदा प्रधान होते! गणित, सायन्स, भाषा सगळ्या विषयात ९५ च्या वरती मार्क्स मिळाले होते. त्यामुळे सायन्स, कॉमर्स, कुठल्याही शाखेत प्रवेश मिळायला काहीच अडचण नव्हती. तिच्या बाबांनातर इतका आनंद झाला होता की सगळ्या गांवाला पेढे वाटत होते. बाबांना इतकं दिलखुलास हसताना त्यांनी सगळ्यांनी प्रथमच पाहिले होते. तसे ते खूप कठोर होते, किंवा मुलांवर त्याचे प्रेम नव्हते अशातला भाग नव्हता, पण त्यांची कडक शिस्त, नियम यामुळे मुलं त्यांना घाबरायची एवढं मात्र निश्चित! साहित्याची तिला खूप आवड होती तिने मनाशी निश्चित ठरवलं होतं, कलाशाखेत प्रवेश घ्यायचा, पदवीधर झाल्यावर एम. ए., मग डॉक्टरेट! खूप वाचन करायचं, खूप लिखाण करायचं. सोळाव्या वर्षात पदार्पण केलं अन तेव्हापासून तिला ते स्वप्न बघायची सवय लागली होती. सुंदर संसार करायचा, अगदी नीटनेटका, टाप-टीपीचा! डोळे बंद केले की तिच्या स्वप्नातलं घर मनासमोर साकारायचं. तिच्या स्वप्नातला तो!............... देखणा............. उंच........... दोघांनी मिळून रंगवलेल्या स्वप्नात ’तीच’ आगमन, हो ’तिचंच’! तिला मुलगी फार आवडायची. फार मोठ्या अपेक्षा न ठेवता, साधं पण सुंदर जीवन जगायचं, अनेक रात्री तिने या सुंदर स्वप्नात रंगवल्या होत्या. तिची ही हळुवार स्वप्न तिने कवितेच्या रूपात कागदावर उतरवली होती. ही सगळी स्वप्न तिने मनातल्या मनात रंगवली होती. बाबांच्या कडक शिस्तीत वाढणारी ती आणि तिची भावंड, बाबांसमोर एक शब्दही काढण्याचे त्यांचे धैर्य नव्हते. तिच्या शिक्षणाविषयी ठरवताना बाबांनी कडक शब्दात सांगितले "शुभदा तू डॉक्टर व्हावं अशी माझी इच्छा आहे. "पण बाबा मला तर आर्टसला जायची इच्छा आहे" सार धैर्य एकवटून ती बोलली त्यानंतर बाबा तिच्यावर जे बरसले होते, "अग आर्टसला जायचे काय भिकेचे डोहाळे लागले आहेत का?, तुझं गणित, सायन्स दोन्ही विषय चांगले आहेत, तू सायन्सलाच प्रवेश घ्यायचाय, नाही बाबा मला आर्टसला जायचंय, "मला उलट उत्तर देतेस, थांब जरा" असं म्हणून ते रागारागाने बाहेर निघून गेलेत. त्यानंतर जे रामायण घडलं ते भयंकरच होतं. बाबा दोन दिवस ऑफिस मधून घरीच आले नाही, सगळेजण खूप तणावाखाली होते, दोन दिवस झालेत, ते घरी आले नाहीत बघून आईने रडायलाच सुरुवात केली. घरांतलं वातावरण, आईच रडणं, मनाच्या विमनस्क अवस्थेत तिने बाबांचा निर्णय स्वीकारला, स्वतः:च्या आवडीला मुरड घालून तिने डॉक्टर व्हायचं ठरवलं. सायन्सला ऍडमिशन घेतली, तिने खूप मनापासून अभ्यास केला होता, त्यामुळे मेडिकलला प्रवेश मिळायला अजिबात त्रास झाला नाही. घरात बाबा एकटे कमावणारे होते, परिस्थिती तशी मध्यमच होती. या सगळ्यांची जाणीव तिला होती. त्यामुळे ती मनापासून अभ्यास करत होती. मेडिकलचा क्लिष्ट, कठीण अभ्यास, मोठी पुस्तकं, या व्यापात स्वतः:च्या आवडीचं एखादं पुस्तक देखिल वाचायला सवड मिळायची नाही तिला. पण तक्रार न करता तिने हे जीवन स्वीकारला. मनाने ती कधीच कॉलेज मध्ये रमली नाही, कुणाशीच मैत्री पण करावीशी वाटली नाही. मनातल्या स्वप्नांना असं आत कोंडून टाकताना, कधीतरी आसवांनी उशी ओली व्हायची, पण जवळ कुणी नसायचं, मनातलं दु:ख मोकळं करायला. प्रत्येक वर्षी ती फर्स्टक्लास मिळवत होती. बघता बघता पाहिली चार वर्ष संपलीत, आता फक्त एक वर्ष आणि सहा महिन्याची इंटर्नशीप, त्यानंतर एम. बी. बी. एस. ची डिग्री, मग स्वतः:चा दवाखाना! अचानक त्यांच्या कुटुंबावर दु:खाची कुऱ्हाड कोसळली. बाबांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. घरात तीच मोठी, सगळ्या जबाबदाऱ्यांच ओझं तिच्यावर टाकून बाबा निघून गेले. तिच्या पाठीवरचे संजू, सतीश, आणि धाकटी स्मिता, तीन भावंड, आणि आई. घरात मिळवते कुणी नव्हते. बाबांच्या प्राव्हिडंड फडांत आणि ग्र्याच्युटीत पांचजणांच भागणं शक्यच नव्हत. नेटाने तिने राहिलेलं शिक्षण पूर्णं केलं आणि तिथल्याच दवाखान्यात नोकरी धरली. तिचा पगार, शिलकीचे व्याज यावर त्यांचे जेमतेम भागत होत. कोसळलेल्या आईला सावरणं, सतीश, संजूच आणि स्मिताच शिक्षण, अचानक आलेल्या या जबाबदारीच्या ओझ्यांमुळे ती प्रौढ झाली, तिने रंगवलेल्या स्वप्नांचे रंग हळूहळू उतरत होते. स्मिता ग्रॅज्युएट झाली आणि तिने तिचा जोडीदार समोर आणून उभा केल्यावर तर तिचं स्वप्न पार तोडून मोडून गेलं. ती घराला सावरण्यासाठी अपार कष्ट करत होती, पण कुणालाच काहीच वाटत नव्हत. हिच्या मनाची कुणालाच कदर नव्हती. सतीश, संजूने स्वतः:ची लग्न ठरवलीत त्यावेळेस आईने म्हटलं "इतकी वर्ष तुमच्यासाठी झिजते आहे, तुमची शिक्षणं पूर्णं केलीत, घरासाठी दिवसरात्र राबते आहे, कधी केला तिच्या मनाचा विचार? स्वतः:चा स्वार्थ तेवढा बघितला! किती करायचं एकट्या पोरीनं? " असं म्हणून आई एकटीच कितीतरी वेळ रडत होती. तिचं लग्नाचं सरत वय, तिच्यावरच्या या जबाबदाऱ्या, या जाणीवेने आईचं मन आतून पोखरून निघत होतं. वयाची चाळीशी आली, लग्नाची उमेद संपली, तिचं भाव-विश्व असं कोसळून पडलं.

तिने डॉक्टरी व्यवसायात नांव कमावलं, स्वतः:चा मोठा दवाखाना, बंगला!, एक नामांकित डॉक्टर म्हणून समाजात मिळवलेला मान, सरत्या काळाबरोबर मनातली बोच हळूहळू कमी होत गेली. मनात फुलवले ते स्वप्न, मग हृदयाच्या आतल्या कप्प्यात कधीच बंद केलं होतं. ते स्वप्न आज दुसरंच कुणीतरी साकार करत होतं., जे तिला मिळालं नव्हत ते दुसऱ्या कोणालातरी उपभोगताना बघून तिच्या आतला ’मी’ दुखावला जात होता, प्रतिबिंब म्हणजे बिंबाची सावली, ते दोन्ही वेगळे असूच शकत नाही, पण इथे प्रतिबिंब ’तिच्या’ रूपात समोर उभं राहिलं होतं त्याला तिच्या स्वप्नातलं जीवन जगतांना बघून तिच्यातल्या बिंबाला त्रास होत होता म्हणून हा सगळा राग, हा तुसडेपणा ’मी’ चा अहंकार दुखावला जात होता म्हणून ही कटुता. त्या तुसड्या ’मी’ चा भयंकर राग आला होत मला. माझं स्वप्न साकार झालं नाही म्हणून तिच्यावर असं रागावण्याचा मला काय अधिकार होता. मनाच्या कोर्टात अशी स्वतः:चीच उलटतपासणी घेतली आणि मनाला मग थोडंसं शांत वाटलं, मनावरच ओझं उतरलं, आभाळ मोकळं मोकळं झालं. आज मी वेळेच्या अगोदरच व्हिजीटला बाहेर पडले, रस्ता ओलांडून ’त्या’ घराच फाटक उघडून आट शिरले. फाटकाचा आवाज ऎकून ’ती’ बाहेर आली. "शुभदा, निरंजनला बरं वाटतंय का", मी अत्यंत प्रेमाने तिला विचारलं, माझ्या आवाजाच तिला खूपच आश्चर्य वाटत होतं, गडबडलेल्या अवस्थेत ती उत्तरली, " पण डॉक्टर, माझं नांव शुभदा नाही, माझं नांव...........! " "असू दे, आजपासून मी तुला शुभदाच हाक मारणार, चालेल ना? निरंजन, आजपासून नवीन औषध सुरू करते, लवकरच बरं वाटेल". असं म्हणत मी सायलीला मांडीवर घेतलं, आणि बघता बघता तिने माझी साडी ओली केली, तिचा चेहरा चांगलाच गोरामोरा झाला. "डॉक्टर थांबा, दुपटं देते, म्हणून ती किचन कडे धावली, "अगं असू दे, लहान मुलं नाही तर मोठी माणसं का करणार असं? मी जोरात हसले आणि माझ्या हसण्यात त्या दोघांच्याही हसण्याचा आवाज मिसळला.

सौ.दिप्ती जोशी,(शोभा जोशी) डोंबिवली *************************************

Post to Feedवेगळी गोष्ट
मनापासून धन्यवाद.
सुंदर
सुंदर!
विचार करायला लावणारे लेखन
छान. आवडली कथा.
सुंदर लेखनशैली.
स्पष्ट लिहितो, माफ करा .......
तुमचे वापरायचे नाव
प्रतिसाद
सुंदर कथानक...
प्रतिसाद.
छान आहे कथा!!!
प्रतिसात
कथेचा आशय भावला.

Typing help hide