श्रद्धा आणि चमत्कार

पंडित सातवळेकर यानी "मनाचा दृढ विश्वास म्हणजे श्रद्धा" असं एके ठिकाणी म्हंटलं आहे. दृढ विश्वास प्रत्यक्ष अनुभवाशिवाय निर्माण होत नाही. यावरून श्रद्धेचं मूळ अनुभवजन्य विश्वासात असतं असं दिसून येतं. हीच गोष्ट (Dr. F.S.Perls) यांच्या (Gestalt Therapy) या मानसोपचार पद्धतीवरील पुस्तकात सांगितली आहे. त्यात म्हंटल्याप्रमाणे आयुष्यात वेगवेगळ्या प्रसंगांतून गेल्यामुळे निर्माण झालेला स्वतःच्या सामर्थ्याविषयीचा अनुभवजन्य विश्वास व त्यामुळे येणारा निश्चिंतपणा, वास्तव स्वीकारण्याची तयारी नि नुसती तयारीच नव्हे तर त्याच्याबद्दल उत्सुकता, वास्तव अपरिवर्तनीय नसून ते प्रयत्नांनी बदलता येतं हा अनुभवजन्य आशावाद नि कोणत्याही परिस्थितीत आपण टिकून राहातो, मोडून किंवा कोसळून पडत नाही हा अनुभवसिद्ध विश्वास ही श्रद्धेची अंगं होत. अशी श्रद्धा असलेला मनुष्य भौतिक पातळीवर कुठल्याही प्रसंगाचं स्वागत करतो, त्यातून जाताना त्याला प्रत्येक पावलागणिक आपल्यात आवश्यक ते सामर्थ्य निर्माण होत असल्याची जाणीव व्हायला लागते, निरनिराळे पर्याय व मार्ग दिसू लागतात नि यशप्राप्तीच्या वेळी सर्व काही आश्चर्यकारकरीत्या जुळून येत असल्याचा अनुभव येतो (ज्यात आपल्याला चमत्काराचा भास होतो).