मुलाखत एका न-गुरुची

मुलाखत एका न-गुरुची
न-गुरु: या, या, माझी मुलाखत घ्यायची दुर्बुद्धी कशी काय सुचली बुवा तुम्हाला?
मी: अनेक् गुरु, बाबा, बुवा, बापू, महाराज्, ताई, दिदी, संत्, महात्मे, मौलाना, मौलवी, फादर, मदर आणि आम्ही तुम्हाला काही तरी देवू शकतो किंवा अमुक अमुक केल्याने सकल जगाचे कल्याण होईल असे सांगणाऱ्या सर्वांना मी भेटलो. त्यांच्या "बोलाचीच कढी-बोलाचाच भात" छापाच्या विधानांनी माझे समाधान झाले नाही म्हणून सत्याच्या शोधात मी तुमच्याकडे आलोय गुरुदेव.
न-गुरु: अहो मला गुरुदेव म्हणू नका हो. गुरु आणि देव् या दोन्ही संकल्पना मला मान्य नाहीत आणि तुम्ही चक्क गुरुदेव म्हणता आहात्. गुरु आणि देव ह्या दोन्ही सामान्य माणसांचे शोषण करणाऱ्या संकल्पना/यंत्रणा आहेत.
मी: जरा स्पष्ट करून सांगा ना.
न-गुरु: तथाकथित गुरु आणि तथाकथित देवांचा, ईश्वराचा आपल्या समाजाला काही एक उपयोग नाही. आपल्या घामाच्या किंवा बेईमानीच्या कमाईवर मजा मारणारी ही बांडगूळं / पॅरासाईट्स् आहेत. म्हणजे गुरु बरं का, देव किंवा ईश्वर किंवा तत्सम शक्ती मला मान्य नाहीत. मला कधीही, कुठेही किंवा कसाही ईश्वर, परमेश्वर किंवा देव भेटला नाही. तसाच तो कोणालाही भेटलेला नाही असं माझं स्पष्ट मत आहे. जे लोक तो भेटल्याचं सांगतात ते चक्क खोटं बोलत आहेत. आणि समजा कोणाला भेटलाही असेल, तर त्यामुळे समाजाचं काय भलं झालं हा माझा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरानं त्या तथाकथित ईश्वराकडे पसायदान मागण्यासाठी जे पत्र पाठवलं, ते पोस्टमननं ईश्वर न सापडल्यामुळे परत आणलं आणि म्हणूनच ज्ञानेश्वरानं कंटाळून समाधी घेतली असं माझं मत आहे. हजारो वर्षांपासून "ईश्वर" ही संकल्पना आपण कुरवाळीत आहोत हे शहाणपणाचं लक्षण नाही. 
मी: म्हणजे तुम्ही नास्तिक आहात तर. 
न-गुरु: लौकिकार्थाने म्हणाल तर मी नास्तिक आहे. पण देव आहे आणि देव नाही, हा वादच निरर्थक आहे. कोणीतरी सुरुवातीला देव आहे म्हटलं म्हणून देव नाही असे म्हणणारे पुढे आलेत. मी या दुसऱ्या वर्गाच्या जास्त जवळ आहे पण पहिल्या वर्गापासून मला दूर जायचे नाही, त्यांना सुधरवण्याचाही मला प्रयत्न करायचा नाहीय. अशा परस्परविरोधी लोकांमधे राहण्यात मजा येतेय मला.
मी: का पण? या वहावत जाणाऱ्या सामान्यजनांना सुधारावंसं का वाटत नाही तुम्हाला? 
न-गुरु: अनेक हुशार लोकांनी प्रयत्न करून पाहिलेत काहीही उपयोग झालेला दिसत नाही. मी कुणाचीही नावं घेत नाही. नावात काय आहे?  सर्व धर्मातील, सर्व पंथातील, सर्व राज्यातील-देशातील, सर्व जातीतील सर्व तथाकथित हुशार गुरुंनी आपापल्या परीनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हे करू नका-ते करू नका, असे वागा-तसे वागू नका, हे सांगण्यात आपले आयुष्य खर्ची घातले, करोडो पानांचे धार्मिक् साहित्य-संत साहित्य निर्माण केले, या साहित्याचा खपही अन्य साहित्याच्या तुलनेत जास्त असतो तरीही त्या साहित्यात दिलेले नीतिनियम का पाळले जात नाहीत हा माझा प्रश्न आहे. मला सांगावसं खूप वाटतं पण् कोणाला जर ऐकायचेच नसेल तर मी कोणासाठी बडबड करू? 
मी: तुम्ही निराशावादी आहात का? 
न-गुरु: कशाच्या बाबतीत?
मी: म्हणजे या जगातील लोक असेच राहतील, कधीही सुधरणार नाहीत असं तुम्हाला वाटतं का? 
न-गुरु: नाही, तशा अर्थाने मी निराशावादी नाही. जग बदलत असतं, धर्म बदलत असतात, रुढी बदलत असतात, परंपरा बंद पडतात. हे सर्व आपण पाहतो, वाचतो, ऐकतो आहे. बदल घडतात नं. एक प्रथा जावून दुसरी येते. मनुष्य सदैव आपला मूर्खपणा वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करीत असतो.
मी: तुम्हाला वाईट प्रथा-परंपरांवर आघात करावासा वाटत नाही का? आपलाही शिष्यवर्ग असावा असं वाटत नाही का? आपणही एखादी जीवनशैली प्रतिपादीत् करावी असं वाटत् नाही का?
न-गुरु: नाही, मुळीच नाही. आपण कसं वागावं ऱ्हे दुसऱ्याला सांगावं लागावं यासारखं दु:ख नाही. आपण कसं वागावं -एवढं समजण्याची पात्रता मानवात नक्कीच असते असं माझं मत आहे. आणि जर समजा कोणामधे नसेल तर त्या व्यक्तीला एका वाक्यात् सांगता येईल.  महाभारतातील शांतिपर्वात एक नियामक तत्त्व दिलेले आहे.  ते असे...........
" जे कर्म आपल्या बाबतीत करणे योग्य नाही असे आपण समजतो तसे आपण दुसऱ्याशी वागू नये कारण ते आपल्याला अप्रिय वाटते". किती सोपे आणि सरळ तत्त्व आहे. पण मनुष्य स्वभाव पडला स्वार्थी. त्यामुळेच हे तत्त्व आचरणात् आणले जात नसावे.
मी: तुम्ही महाभारतासारख्या पुराणकथांना आधार मानता का? 
न-गुरु: पुराणकथा झाल्या म्हणून् काही त्या अगदीच टाकाऊ नाहीत. त्यातील अनेक बाबी आचरण्यायोग्य असतात. पण मला वाटतं सर्व समाजासाठी उपयुक्त असं एखादं तत्त्व सांगणं कठीण. अनेक देश, राज्य, प्रांत, जातिसमूह्, धर्म, असे सर्व मिळून हे जग तयार झाले आहे. या सर्व प्रकारांना एका सूत्रात बांधणे निव्वळ अशक्य आहे असं मला वाटतं. तुमचा आणि आमचा तथाकथित ईश्वर एकच आहे तर मग् निरनिराळ्या धर्माचे अनुयायी आपापल्या ईश्वराचे किंवा त्याच्या दूतांचे न् ऐकता एकमेकाचे मुडदे का पाडतात्?  कुठेतरी गल्लत होते आहे. ईश्वर नावाचं कोणी नियामक तत्त्वच अस्तित्त्वात् नाही असं माझं ठाम मत आहे.
मी: तुम्ही विवेकवादी आहात काय? 
न-गुरु: मी विवेकवादी नाही. मुळात मी कुठलाही वादी नाही. प्रत्येक वादाच्या काही मर्यादा असतात. प्रत्येक वादाला प्रतिवाद असतात. मला कुठलाही वाद निर्माण करायचा नाही. कुठलाही धर्म स्थापायचा नाही किंवा धर्मांतरही करायचे नाही. धर्मांतराने प्रश्न सुटत नाहीत हे आपण पाहिलेच आहे. मूर्तीपूजक आणि विभूतीपूजकांचा विरोध् करणारेच आज मूर्ती होऊन बसले आहेत. आपली मानसिकताच तशी आहे. आपल्याला कोणीतरी आधार लागतो. प्रश्न स्वतः सोडवायला आपल्याला आवडत नाही. कोणी तरी उत्तर सांगितलं तर हवं असतं. आपला समाज नुसते "उच्चविद्याविभूषित" निर्माण करतो. "समजदार" निर्माण करत नाही. खरं म्हणजे लहानपणी बालवाडीत, खोटं बोलू नये, हे आपल्याला शिकवलं जातं. आयुष्यभर खोटं न बोलता जगतो का आपण्? आजच्या जगातील सर्व नामवंत उद्योगपती, मोठमोठे राजकारणी, तथाकथित संत-महात्मे, किंवा आजच्या सामाजिक् मापदंडाने "यशस्वी" असलेली व्यक्ती एकदाही खोटं बोलली नसेल् का? महाभारतातील कृष्ण तर खोटं बोलण्यात पटाईतच होता पण रामायणातील सत्यवचनी राम सुद्धा खोटं बोलला होता. शूर्पणखेनं रामाला लग्नाची मागणी घातल्यावर् " तू लक्ष्मणाला विचार, त्याचं लग्न झालेलं नाही" असं खोटंच सांगितलं होतं.
मी: तुमचं बरंच वाचन झालेलं दिसतंय. 
न-गुरु: हो मी वाचतो खूप्. जे जे मिळेल ते वाचतो. माझ्या वाचनाला कुठलाही निर्बंध नाही. सर्व प्रकारचे साहित्य वाचूनच मी या निर्णयाला पोहचलो आहे की जे चाललं आहे ते चालू द्या. तुम्ही कितीही डोकं आपटलं तरी जग् तितकंच मूर्ख राहणार आहे. "पागलपणा" एखाद्या व्यक्तीत नेहमीच आढळेल असं नाही पण समाज, समूह्, देश, राज्य, झुंड याच्यात तो हमखास आढळतो. जातिवाद, प्रांतवाद, धर्माधर्मातील वाद, राष्ट्राराष्ट्रातील वाद-लढाया, भाषिक वाद ही त्याचीच उदाहरणे आहेत.
मी: म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की या जगाची तब्येत सुधारण्यासाठी कुठलंही एक् "औषध" नाही.
न-गुरु: नाही, नाही, औषध आहे किंवा तयारही करता येईल, जगातील सगळे लोक ते औषध घेतील का? हा खरा प्रश्न आहे. कारण..आपल्याइथे ते औषध किती उपयुक्त आहे त्यापेक्षा ते कोणत्या जातिधर्माच्या किंवा कोणत्या देशाच्या माणसानं बनवलं, का बनवलं ते पहिले पाहिलं जातं. त्यावरून वाद, प्रतिवाद उत्पन्न होतात, कोर्ट-कचेऱ्या होतात. आपल्या देशातील थोर समाजसुधारक सुद्धा जातिधर्मात विभागले गेले आहेतच. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते यावरून आता वाद होत आहेत, रामसेतुवर वाद आहेत, राम-जन्मभूमीबाबत वर्षानुवर्षे वाद सुरू आहे, काश्मीर-प्रश्न सुटत नाही, पाण्यावरून वाद आहेत, भाषिक वाद आहेत आणि आपण जगाचं कल्याण करायला चाललो. 
मी: म्हणजे भारत जागतिक आणि आर्थिक महासत्ता बनणार नाही असं तुम्हाला वाटतं का?
न-गुरु: जागतिक आणि आर्थिक महासत्ता बनण्यापेक्षा आपल्या देशाने आपले स्वत:चे प्रश्न् सोडवले तर जास्त बरं होईल. मागे कलाम् राष्ट्रपती असताना त्यांनी अनेक शाळांमधे जाऊन बालकांना-विद्यार्थ्यांना शपथ दिली होती. मी भ्रष्टाचार करणार नाही, करू देणार नाही, असा वागीन, तसा वागणार नाही, वगैरे, वगैरे अनेक कलमा होत्या. कलामांचा उपक्रम स्तुत्य नक्कीच होता पण शपथ दिल्याने प्रश्न सुटतात का? आपल्या देशात किंवा जगातही शपथेवर खोटं बोलणाऱ्याचं काही वाकडं होतं का?  न्यायालयात शपथेवर खरं बोलणाऱ्यांचं प्रमाण किती आहे?  पद् आणि गोपनीयतेची शपथ् घेऊन राज्यकारभार करणारे आपले राज्यकर्ते तरी नीट वागतात का? 
मी: आपण असं काय करायला पाहिजे की भारताचे संपूर्ण जगावर आधिपत्य राहील?
न-गुरु: आपण अशी इच्छाच का धरावी? आपल्या देशातील एकही हात रिकामा राहणार नाही, एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, सर्वांना रहायला घर मिळेल, कपडे मिळतील अशी व्यवस्था करा नं. इथे एका व्यक्तीचं घर पन्नास-शंभर कोटींचं तर हजारो लोक फूटपाथवर निवारा शोधतात, हे चित्र बरं नव्हे. जगाच्या सुरूवातीपासून सामाजिक विषमताच नांदलेली आहे, समता वगैरे केवळ पुस्तकी कल्पना आहेत. सगळे सारखेच राहू शकतील असं माझं मत नाही पण निदान प्राथमिक गरजा तरी सगळ्यांच्या पूर्ण व्हायला हव्यात. त्याही होत नाहीत. भीक मागणे गुन्हा आहे पण भिकाऱ्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करण्याची क्षमता सरकारमधे नाही. असू द्या. एका विषयातून अनेक विषय निघतात आणि मी आपला बोलत जातो. आपण एवढी बडबड करणे केवळ निरर्थक आहे. साने गुरुजींनी या देशासाठी एक महान स्वप्न पाहिलं होतं, तशीच स्वप्ने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, आगरकर, भगतसिंह्, इतर अनेक क्रांतिकारक, समाज सुधारकांनी पाहिली होती पण एकाचे तरी स्वप्न खरे ठरले का? भारत स्वतंत्र झाला पण फक्त् ब्रिटीशांपासून. जनता अजूनही गुलामगिरीतच जगते आहे. सामान्य माणूस आजही राज्यकर्त्यांपासून खूप दूर आहे. आणि ही परिस्थिती बदलेल अशी कुठलीही चिन्हे नाहीत. असो. बस करा आता.
मी: जाता जाता एक संदेश द्या नं सर्वांसाठी.
न-गुरु: संदेश वगैरे देण्याइतका मी मोठा नाही. मी स्वत:च संभ्रमात् आहे. पण तरी सुद्धा मी मघाशी म्हणालो तसं "तुमच्याशी एखाद्याने जसे वागलेले तुम्हाला आवडणार नाही तसे त्याच्याशी वागू नका." पण हे कोणाला कळत नाही आणि कळलं तरी वळत नाही. 
अतुल सोनक,
बी-२०१, सुखनिवास,
अंबाझरी गार्डन रोड, 
एन.आय.टी. लेआऊट,
नागपूर-३३
९८६०१११३००