अनुत्तरित प्रश्न

अनुत्तरीत प्रश्न

वय वाढत तस मुलांचे प्रश्न पण वाढत जातात आणि जास्त प्रगल्भ होत जातात. जेव्हा बाहुल्यांबरोबर खेळणारी चिमुरडी विचार करायला लावणारे प्रश्न विचारते तेव्हा पालक होण्याची जबाबदारी फक्त मोठीच नाही तर कठीण वाटायला लागते.

किमया जेव्हा पाचवीत गेली, तेव्हा आपली लेक आता मोठी झालिये अस समजून (किंबहुना मला सुद्धा गोष्टी सांगून जबाबदार पालकत्व निभावता येत हे दाखवण्यासाठी) हेमंत एक दिवस तिला अॅडम आणि ईव्हची गोष्ट सांगत होता. पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळी असणारे दोन मानव सदृष्य(?? ) जीव, सफरचंदाच झाड, त्यांच भांडण, आपण सगळे कसे त्याचे वंशज आहोत वगैरे आणि पुढची सगळी कथा अगदी रंगात आली होती. किचन मध्ये स्वयंपाक करत असले तरी माझे कान त्याच्याकडेच होते.

सगळ शांतपणे ऐकणारी किमया अचानक हेमंतला म्हणाली, "बाबा, पृथ्वीच्या उत्पत्तीच्यावेळी फक्त अॅडम आणि ईव्ह हे दोघेच जर मनुष्यप्राणी असतील तर त्यांची मुले म्हणजे एकमेकांचे बहिण-भाऊ झाले, मग पुढची पिढी कशी काय जन्माला आली? आणि आपण त्यांचे वंशज कसे काय??? "

हेमंत आणि मी दोघेही एकमेकांकडे बघतोय आणि चेहरे पांढरे फटक. काहीतरी थातुरमातुर उत्तर मीही देवू शकले असते पण त्यामुळे माझ्याही मनात अनेक वर्षे दबा धरून बसलेला हाच प्रश्न वर आला. भिडस्त स्वभाव म्हणा किंवा आई-बाबा सांगतात ते सगळ बरोबरच अशी झापड लावल्यामुळे मी कधी हा प्रश्न विचारला नव्हता पण प्रश्न मनात आला होता जरुर.

असा प्रसंग दुसऱ्यांदा आला जेव्हा आजी (साबा) सगळ्या नातवंडांना कृष्णजन्माची कथा सांगत होत्या. त्या नेहमीच पौराणिक कथा सांगत असतात आणि बदलत्या विश्वाबरोबर आपली नातवंडे आपली संस्कृतीही जपतील याची पुरेपूर काळजी घेत असतात.

साबा अगदी तल्लीन होऊन सांगत होत्या, 'देवकी आणि वसुदेवाचे लग्न झाले आणि त्यांची वरात स्वत: कंस रथ हाकत घेऊन चालला होता. अचानक आकाशवाणी झाली, "ज्या देवकीसाठी तू इतका आनंदीत आहेत त्याच देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल"

झाल सगळ तिथेच बिनसल, कंस चिडला आणि रागाने त्याने देवकी आणि वसुदेव यांना तुरुंगात टाकले. त्यांच्यावर कडा पहारा ठेवला. देवकीच्या सातही मुलांना त्याने निर्घुणपणे मारले. आठवा कृष्ण मध्यरात्री जन्मला आणि वसुदेवाने त्याला आपल्या परम मित्राकडे यमुनेचा पूर पार करून सोडले. नंतर कंसवधाची कथा.

मुले पण तल्लीन होऊन ऐकत होती. शेवटी 'सार्थक' माझा भाचा (इयत्ता ६वी) म्हणाला, "आजी कंस काय मुर्ख होता का ग? त्याला जर माहित होते की देवकीचा आठवा मुलगा आपल्याला मारणार आहे तर त्याने देवकी व वसुदेवाला एकाच तुरुंगात का ठेवले? वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले असते तर पुढे काही घडलच नसत ना! "

आजी खरतर अनुत्तरीत झाल्या. रागतिरेकाने त्यांनी धपाटा जरी मारला असला तरी त्यांच्याकडेही उत्तर नव्हते या प्रश्नाचे.

आतापर्यंत असे अनेक अनुत्तरीत प्रश्न मला विचारले असतील किमया आनी येशाने ज्यांची उत्तरे मी देवू शकले नाही किंबहुना माझ्या उत्तरांनी त्यांच समाधान झाल नाही.

"सीता जमीनीखाली पेटीत सापडली, आई तिचा श्वास थांबला कसा नाही ग?? "

"रामाने अग्नीपरिक्षा द्यायला लावल्यावरच सीता जमीनीत का नाही गेली? वनवास भोगायची तिला हौस होती का? "

"नुसत सुर्याकडे बघितल्यावर आणि इंद्राकडे बघितल्यावर कर्ण, अर्जुन कसे जन्मले?? "

"कृष्ण जर अवतारी होता तर त्याने स्वत:ची गीता फेमस करायला महाभारत घडवल का??

असे असे अनेक प्रश्न तुम्हालाही विचारले गेले असतील ना? किंवा पडले असतील. मग पौराणिक कथा काय बिनबुडाच्या का??