साहेब

‘महाराज’ म्हटल्यावर साधकांच्या मनात वेगवेगळ्या प्रतिमा उमटतात, सत्ताभिलाषींच्या मनात वेगळीच छबी उमटते पण ‘साहेब’ म्हटल्यावर मात्र प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या डोळ्यांसमोर एकमेव छबी दिसते असं हे नांव आहे.

या महान नेत्यानी काय काम केलं असं अनेक अज्ञजन विचारतात पण त्यांचं कर्तृत्व देवासमान आहे, म्हणजे प्रत्येक महत्त्वाच्या प्रकरणात त्यांचाच हात असून ते त्यांनी घडवलं आहे मात्र अत्यंत दुर्लक्षीत माणसा कडून! ही अत्यंत श्रेष्ट अवस्था आहे कारण करणाऱ्याला शेवट पर्यंत आपणच करतो आहोत असं वाटत राहतं आणि प्रसंग बेतल्यावर त्याला खरा प्रकार काय होता ते कळतं; कर्ता करवीता तो होता आपण केवळ नाममात्र होतो. अर्थात त्यानी कर्तेपण स्विकारल्यामुळे त्याला पुढचं सर्व भोगायला लागतं आणि देव नामानिराळा राहतो पण चूक 'कार्यकरणाऱ्यानी कर्तेपण स्वतःकडे घेतल्यामुळे' झालेली असते, देवाचा त्यात काही दोष नसतो.

कविवर्य मंगेशजी पाडगावकर यांनी आपल्या ‘उदासबोध’ या काव्यसंग्रहात या स्थितीचं मोठं समर्पक वर्णन केलं आहे:

सकळ करोनी अकर्ता
सर्व भोगोनी अभोक्ता
उभा राहूनी लोंबता
आयुष्यात

इथे
तिसऱ्या ओळीचा अर्थ कुठेही, कसाही आणि कितीही वाकणारा अत्यंत बेभरवशाचा,
केव्हा कसा शब्द फिरवेल याचा नेम नसणारा असा नसून, दूरदर्शी, परिस्थितीचं
भान असणारा, अत्यंत लवचिक आणि कोणत्याही परिस्थितीत समन्वय साधणारा असा
आहे.

यावरून त्यांना काही जण उपहासानी 'कुंपणा वरचा नेता' असं म्हणतात पण ती निव्वळ मत्सराची भाषा आहे कारण सामान्य लोकांना ही कल्पना नाही की एकदा जनतेच्या सेवेचं व्रत अंगीकारल्यावर सत्ता हवी मग पक्ष हा फक्त नाममात्र राहातो. त्यांना स्वतःला सुद्धा स्वतःचा पक्ष माहित नसला तरी त्यांना त्याची तमा नसते कारण लोकहीत महत्त्वाचं असून पक्षाला अत्यंत गौण स्थान आहे हे त्यांनी केव्हाच जाणलं आहे. पक्षनिष्ठा काय किंवा कोणतीही निष्ठा काय जनहीता पुढे असले प्रश्न राजकारणाशी फक्त ‘पेपर वाचण्या पलिकडे’ काहीही संबंध नसणारे सामान्य लोक विचारतात, असामान्य राजकारण्यांना त्याची पर्वा नसते.

पाडगावकरजींना कल्पना नसतांनाही त्यानी या चातुर्याचं वर्णन किती खुबीनं केलं आहे ते बघा:

ज्यावरी मागून केला वार
पुढुनी त्याच्याच गळा हार
हे लक्षण प्रज्ञेचे

सुधीर गाडगीळ हे त्यांचे कॉलेजचे स्नेही आहेत, स्वतःच्या कार्यक्रमात ते एक विनोद सांगतात तो असा:

"दोन अधिक दोन किती हा प्रश्न तत्कालीन पंतप्रधान श्री. नरसिंह राव यांना विचारण्यात आला, त्यावर आपल्या नेहेमीच्या सवयी प्रमाणे त्यांनी प्रदीर्घ वेळ घेतला पण अजिबात उत्तर दिलं नाही. मग तो प्रश्न श्री. अर्जुन सिंग यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की ‘दो और दो वैसे होता तो चार है लेकीन अगली कार्यकारिणी बैठकमे हम इसे रखेंगे, नेताओंसे विचार विमर्ष होगा फिर जवाब देंगे. ’ पण हा प्रश्न जेव्हा साहेबांना विचारला गेला की 'दोन आणि दोन किती' तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता साहेब म्हणाले 'द्यायचे आहेत की घ्यायचे? '. आता हा विनोद असतांना देखील नतद्रष्ट माणसे याचा काहीही अर्थ काढतील पण या उत्तरातून त्यांचं प्रसंगावधान दिसून येतं हे सामन्यांच्या लक्षात येणार नाही.

सुधीर गाडगीळ हे प्रश्नावली न देता मुलाखत घेतात आणि त्यांनी अशीच साहेबांची प्रकट मुलाखत घेण्याचा कार्यक्रम आयोजीत केला होता त्यावेळी साहेब सपत्निक हजर झाले. गाडगीळांचे प्रश्न पेचात आणतात याची साहेबांना पूर्व कल्पना असल्यानी त्यांनी एखाद्या मुत्सद्यालाच साजेल अशी खेळी केली, ते गाडगीळांना म्हणाले, 'तुम्ही हवा तो प्रश्न विचारा उत्तर माझ्या सौभाग्यवती देतील'. गाडगीळां सारख्या कसलेल्या पत्रकाराची देखील मोठी पंचईत झाली त्यांनी अत्यंत फालतू प्रश्नानी सुरुवात केली, ते वहिनीनां म्हणाले ' तुम्ही साहेबांना इतक्या जवळून आणि इतकी वर्ष ओळखता पण आज सुद्धा यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय चाललं असेल हे तुम्ही ओळखू शकता का?

आता याचा ही अर्थ सामान्य बुद्धीमत्तेची माणसं 'यांचा चेहरा इतका बथ्थड आहे की यांचे विचार आणि मेंदू यांचा काही तरी संबंध आहे का? असा काढतील पण 'मनाच्या निग्रहानी मनाचे भाव चेहेऱ्यावर दिसू न देणं' हे एखाद्या योगीपुरुषाला शोभेल असं यांचं कौशल्य सामन्यांना काय कळणार?

अर्थात साहेबांचं प्रसंगावधान इतकं कमालीचं की त्यांनी अनावस्था प्रसंग ओळखून पटकन माईक सौभाग्यवतीं कडून काढून स्वतःकडे घेतला. प्रेक्षक यावर फिदीफिदी हसले त्यांना वाटलं की साहेबांची पार गोची झाली पण खऱ्या राजकारण्याला यातून बिकट प्रसंग मुरब्बी नेता कसा हाताळतो हे बघायला मिळालं.

सध्या त्यांची प्रकृती अस्वस्थ असते याचं कारण मेडीया किंवा विरोधी पक्षीय अनिर्बंध गुटखा सेवन असं सांगत असले तरी तो निव्वळ बदनामीचा प्रकार आहे, अहर्निश आणि देहभान हरपून केलेलं देशकार्य हे खरं तर त्याचं कारण आहे.

कविवर्य मंगेशजी पाडगावकरांनी उदासबोधात पुढे संवेदनाशील होऊन असं म्हटलं आहे:

कोणी जाडजूड प्रचंड
त्याचे नेतृत्व अखंड
बघता बघता भूखंड
अदृष्य केला

अर्थात यातली केवळ दुसरी ओळ या महान नेत्याला उद्देशून घ्यायची आहे, पहिली ओळ कोणत्याही राजकिय नेत्याला लागू होते म्हणून ती महत्वाची नाही आणि तिसरी आणि चवथी ओळ तर लागू होणं शक्यच नाही कारण कितीही आरोप झाले तरी तसा ठोस पुरावा आजतागायत कोणीही देऊ शकलेलं नाही.

देशाचे सर्वेसर्वा होण्याची क्षमता असलेला असा नेता केवळ संभाषण कौशल्या अभावी तिथपर्यंत पोहोचू शकलेला नाही याची प्रत्येकाला कल्पना आहे. यावर अनेकजण, 'ते कितीही वेळ कोणत्याही विषयावर काहीही अर्थ बोध न होता बोलू शकतात' असा काढतात पण ते अत्यंत चुकीचं आहे. एखादा कसलेला मल्ल आपण प्रतिस्पर्ध्याच्या हातीच लागू नये म्हणून आखाड्यात अंगाला तेल लावून उभा राहातो तशी ही स्थिती आहे. पुढच्या अनेक राजकिय पिढ्या काहीही कमीट न करता प्रदीर्घ कसं बोलावं याचा अभ्यास करू शकतील असं त्यांचं वक्तृत्व आहे.

समर्थ रामदासांनी किंवा तत्सम कुणी तरी अत्यंत योग्य शब्दात अशा नेत्याचं वर्णन केलं आहे:

झाले बहू, होतील बहू पण यासम हा. जय महाराष्ट्र!

संजय