सप्टेंबर १२ २०१०

अमेरिकेतला "गणपती"............

आज १२ सप्टेंबर २०१०, कालच गणेश चतुर्थीचा दिवस होता. आयुष्यात पहिल्यांदाच ह्या सणाच्या दिवशी मी माझ्या घरी नव्हतो. फार वाईट वाटतं होतं. शिक्षणासाठी स्वतःचं घर, शहर (डोंबिवली), माणसं, देश सोडून इकडे अमेरिकेत आलो. तसं न्यूयॉर्क हे शहर बऱ्याच बाबतीत मुंबईशी समानता साधणारं  आहे. पण, मुंबई मधले गणपती म्हणजे एक मोठा उत्सवच असतो. शेवटी आपला देश  तो आपला देश. त्यामुळे ह्या वर्षी गणपतीचं दर्शन हे काही आपल्या नशिबात नाही हे जसं काही मी मनात पक्कं ठरवलं होतं. देवाला कुठूनही मनोभावे नमस्कार केला की तो त्याच्या पर्यंत पोहोचतो, ही आई बाबांची शिकवणं डोक्यात ठेवून मी मनाला समजावत बसलो. अचानक इंटरनेट वरच्या एका साईट वर नजर पडली. पाहिलं तर समजलं की, इथे ह्याचं शहरात एक गणपती मंदिर आहे. काय आनंद झाला म्हणून सांगू. मग ठरवलं की आज दर्शन घ्यायचंच. सकाळी लवकर उठून आधी स्वच्छ अंघोळ केली आणि घरातल्या गणपती ची मनोभावे पूजा केली. इंटरनेटच्या युगात काहीही शक्य आहे हे अगदी खरं आहे. पूजा करताना गणपतीची सगळी गाणी लॅपटॉप वर लावली. असं प्रसन्न वातावरण बाहेर देशात मी स्वतः निर्माण केलेलं पाहून माझं मालाचं कौतुक वाटलं. साखरेचा नैवेद्य दाखवून मी पारंपरिक वेषात निघालो दर्शनासाठी. देवळात पोहोचलो आणि तिकडे चक्क सगळे भारतीय माझ्याचंसारख्या पारंपरिक वेषात आले होते. देवाचं ह्या देशातलं तेच रूप पाहून मनाला शांती तर मिळालीच पण त्याहूनही जास्त समाधान ह्या गोष्टीचं वाटलं की, कुठेही असोत पण भारतीय आपली समृद्ध संस्कृती स्वतःबरोबर जपतात. आता तुम्ही म्हणाल की अगदी ह्या वयाला काहीतरी शोभेल असं मी लिहावं पण, खरंच सांगतोय मला हे असंच वाटलं तिकडे. दर्शनानंतर मिळालेला प्रसादही सुंदर होता. अपेक्षित नसलेली गोष्ट अशी भरभरून मिळाली की त्याचा होणारा आनंद हा काही औरच. मनातली देवदर्शनाची सुप्त इच्छा देवाने पूर्णं केलेली पाहून त्याच्यावरचा विश्वास अजूनच दृढ झाला. "मनी वसे ते स्वप्नी दिसे" हि उक्ती शब्दशः खरी आहे ह्याचा काल अनुभव आला. लॉस अँजलीस मधल्या माझ्या आई, बाबा, ताई आणि सचिनला ही गोष्ट सांगितली तर त्यांनाही माझ्या आनंदाची आयडिया आली. असा हा "अमेरिकेतला गणपती" माझ्या मनात कायमचं स्थान निर्माण करून गेला. आता आमच्या मित्र-मैत्रिणींचे पुढचेही प्लॅन्स ठरलेले आहेत, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, संक्रांत अश्या आणि इतर सर्व सणांना इकडे ह्या देवळात यायचंच.

Post to Feedलेख आवडला
भाग्यवान
धन्यवाद
सुरुवात उत्तम!!
धन्यवाद!

Typing help hide