कन्या शाळेमध्ये जाये...

नुकतीच माझ्या मुलीची, आभा ची (वय वर्ष ३ ) न्यू जर्सी मध्ये शाळा सुरू झाली. आम्हाला इथे येऊन दोन महिने झाले. इथल्या शाळा सप्टेंबर पासून सुरू होत असल्याने सुरुवातीला ती आणि मी दोघी घरीच असायचो. मग कधी भातुकलीचा डाव रंगायचा, तर कधी पुस्तकं वाचून दाखवायची, कधी भांडणं, मारामाऱ्या सुदधा! मी भारतात असताना पूर्णवेळ नोकरी करत होते त्यामुळे तिला एवढा वेळ कधीच देऊ शकले नव्हते. आता मला खरं आईपण अनुभवायला मिळत होतं आणि अशातच तिची शाळा सुरू होण्याची वेळ आली.

समस्त मातृवर्ग ज्या उत्साहात आपल्या मुलीसाठी वर संशोधन करतो त्या उत्साहात मी पण तिच्या 'शाळा संशोधनाला' लागले.  घराजवळ पाहिजे, शाळेत भारतीय मुले पाहिजेत, खूप वेळ नको या चाळण्या लावून शोधता शोधता खाली काही पडलेच नाही. त्यातल्या त्यात घराजवळ मिळाली पण शाळेत भारतीय कोणी नाही, वेळही भरपूर सकाळी ८ ते दुपारी ३ (भारतातल्या शाळांच्या तुलनेत ही वेळ खूपच जास्त वाटली). पण काही पर्याय नव्हता. नुसते घरी बसवून ठेवण्यापेक्षा तिथे मुलांच्यात रमेल हा विचार करून नोंदणी केली.

मग शाळेतून एक यादी देण्यात आली. पांघरूण, गादीवरच्या दोन चादरी, पेस्ट, ब्रश, २ जोड घरातले कपडे, गणवेश आणि बूट अशी सगळी तयारी झाली आणि पहिला दिवस उजाडला. शाळेत जायची मानसिक तयारी न झालेल्या आभाला तयार केले आणि आम्ही दोघे तिला सोडायला गेलो. मी मनात कल्पना केली होती त्यापेक्षा वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. सगळी मुले हसत होती, आईबाबांना टाटा करत होती, फोटो काढून घेत होती फक्त

आमचे पिल्लू जरा बावरल्यासारखे झाले होते. शेवटी तिला वर्गात बसवून यायला निघालो. तिच्या वर्गशिक्षकांना सगळ्या सूचना दिल्या (म्हणजे खूप रडली तर फोन करा वगैरे वगैरे) आणि त्यांनी ही बरोब्बर २.४५ वाजता येऊन घेऊन जा नाहीतर त्यानंतरच्या प्रत्येक मिनिटासाठी ३ डॉलर असा दंड पडेल अशी प्रेमळ धमकी दिली. 

आम्ही निघालो आणि २-३ मिनिटातच जोरात रडण्याचा आवाज आला, म्हटले ही आभाच  रडतेय!......... परत तिच्याकडे जायला निघालो तर तिथल्या मदतनिसांनी थांबवले, म्हटले आम्ही मुलांची काळजी घेऊ ("तुम्ही जा! ")

मग काय जड अंतः करणाने मी घरी यायला निघाले, आभाची शाळेत पाठवणी करून! घरी आल्यावर घर अगदी खायला उठले. तिच्या सगळ्या वस्तू, खेळणी बघून सारखे डोळे भरून यायला लागले. मनात आले... 'आभाला नवी न वातावरणात जुळवून घ्यायला कसे जमेल? ते काय बोलतील ते समजेल का? भूक लागली तर कसे सांगेल? तिला कोणी त्रास तर नाही ना देणार? 'असे हजारो प्रश्न डोक्यात यायला लागले.  मग वेळ घालवण्यासाठी टीव्ही पाहिला, मेल्स बघितल्या, घर आवरले.... पण छे वेळ जाईचना ! तिकडे मिस्टरांना पण चिंता... पोरगी काय करतेय शाळेत?

अशा एकूण अस्वस्थतेत ५-६ तास काढले आणि ठरलेल्या वेळेच्या थोडे आधीच आणायला गेले. तिथे गेल्यावर काचेतून पाहिले आणि हुश्श झाले.... आभा आनंदात टेबल-खुर्चीत बसून फळं आणि बिस्किटं खात होती.

घरी आल्यावर आम्ही दोघेही म्हटलो "ही सासरी गेल्यावर आपले कसे होणार? "