व्यसनी लोकांची विनोदी भाषा

आमच्या शाळेत एकदा स्टाफरुममध्ये संस्कृतचे शिक्षक आणि मराठीचे शिक्षक यांचा सुखसंवाद चालला होता. संस्कृतच्या शिक्षकांनी चंची काढली, तंबाखू मळली आणि बार भरला मग चंची मराठीच्या शिक्षकांकडे सरकवली. संस्कृतचे शिक्षक म्हणाले, ' संस्कृतमध्ये वचन आहे, तमाखुपत्रं राजेद्रं भजमा ज्ञानदायकं (हे राजन! तंबाखू खा. ती ज्ञानवर्धक असते). का हो? मराठीत असे काही आहे का? ' त्यावर मराठीचे शिक्षक म्हणाले, 'वचन नाही, पण प्रसंग आहे. भ्रांत अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले, 'शरण तुला भगवंता-सांग लवकरी गीता आता' त्यावर भगवान म्हणाले, ' वत्सा अर्जुना-आधी काढ तंबाखू आणि चुना' तेवढ्यात त्या दोघांचे लक्ष आम्हा मुलांकडे गेले आणि त्यांनी आम्हाला तेथून चालते होण्यास फर्मावले.

मी निरागसपणे वडिलांना विचारले, की संस्कृतमध्ये खरंच असे वचन आहे का? त्यावर वडील हसले आणि म्हणाले, 'अरे व्यसनी माणसे विनोदासाठी कशाची मोडतोड करतील सांगता येत नाही. वास्तविक त्या वचनात म्हटले आहे, की हे राजेंद्रा तू आखुपत्र म्हणजे गणपतीची उपासना कर. ' या लोकांनी त्वम आणि आखुपत्र जोडून त्याचे तमाखुपत्र केले. पण ही गंमत आहे. हसायचे आणि सोडून द्यायचे.

खरंच ही व्यसनी लोकांची सांकेतिक भाषा ऐकून गंमत वाटते. पत्रकार भेटले की एकच वाक्य बोलतात 'मग बसूया एकदा निवांत' यावर सगळ्यांचे एकमत होते. संपादक आणि लेखकांची सांकेतिक भाषा अशी असते, ' आज सायंकाळी नव्या पुस्तकाच्या वाचनाचा कार्यक्रम आहे. परदेशातून आलेल्या आपल्या मित्रांना हे पुस्तक भेटीदाखल मिळाले आहे. तरी रसग्रहणास अगत्य येणे. ' याच चालीवर आमचा एक मित्र संदेश पाठवायचा, 'आज सायंसंध्येचा कार्यक्रम आहे. प्रत्येकाने आपापले पळी-पंचपात्र घेऊन यायचे आहे' (म्हणजे पार्टी टीटीएमएम (बिल तुझे तू माझे मी) तत्त्वावर आहे)

हे लोक तंबाखूला चैतन्यचूर्ण, सिगरेटला धूम्रकाष्टी, मद्याला रंगीत पाणी किंवा आनंदसुधा म्हणतात. ही भाषा नवागतांना समजत नाही. आमचे एक वरिष्ठ चेन स्मोकर होते. त्यांना सर्वजण 'श्रेष्ठ अग्निहोत्री' म्हणत. सिगरेटला सांकेतिक नाव ठेवण्यावरुनही एक विनोदी कथा आहे. लग्न झाल्यावर एक जण बायकोपासून आपली धूम्रपानाची सवय लपवून ठेवतो, पण मित्राकडे स्टॉक ठेऊन तलफ भागवणे सुरुच असते. एकदा गंमत होते की त्यांचा विशिष्ट ब्रँड बाजारातून लुप्त होतो. काही दिवसांनी या पहिल्या मित्राच्या पत्नीला त्याच्या शर्टच्या खिशात एक चिठ्ठी सापडते. त्यावर लिहिलेले असते, 'श्वेतांबरी आलेली आहे. भेटीस येणे. ' चिठ्ठी वाचल्यावर बायकोचा प्रचंड गैरसमज होतो आणि पुढचे विनोदी रामायण घडते.

तर सांगायचा मुद्दा असा, की यापेक्षा वेगळे शब्दप्रयोग तुमच्या कानावरून गेले असतील किंवा गंमतीशीर प्रसंग घडले असतील तर देवाण-घेवाण करा.