लाडका पाहुणा

आज अनंतचतुर्दशी ! आपल्या घरी आलेल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ!
हा येणार, येणार असे म्हणता म्हणता कधी त्याची जायची वेळ येते कळत नाही. मात्र या पाहुण्यासाठी आपले घर, बाजारपेठ महिनाभर आधी तयार होऊन बसते, तो कधी येणार याची वाट बघत!

एकदा का बाप्पांचे आगमन झाले की घरदार मंगलमय होऊन जाते. हा पाहुणा सुद्धा चांगला १०-११ दिवस पाहुणचार घेतो आणि निघायच्या वेळी सगळ्यांचे डोळे ओले करून जातो. आपली झोळी त्याने दिलेल्या आशीर्वादाने गच्च भरलेली असते. विसर्जनाला निघताना त्याच्या हातावर दही पोहे ठेवून 'बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या! ' असे म्हणत डोळे पाणावतात. त्याला नदीत तीन वेळा बुडवून चौथ्यांदा पाण्यात सोडताना मला अक्षरशः रडू येते.  असे वाटते वर्षभर का नाही राहत गणपती आपल्याकडे? मग लहानपणी आई वडिलांनी दिलेले उत्तर आठवते. ... 'चार दिवसांसाठी आलेल्याला पाहुणा म्हणतात.... तेवढ्या दिवसात त्याची सेवा करावी, त्याला काय हवे नको ते बघावे त्याचे आशीर्वाद घ्यावे आणि हसत वाजतगाजत निरोप द्यावा.... ' हे आठवून मन परत उल्हासित होते आणि ढोल ताशांच्या गजरात मी या लाडक्या पाहुण्याला निरोप देते... "गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या ! "