सिंदूर

नि:शब्द होत गेलो, कणसूर होत गेलो
तेव्हा कुठे जगाला मंजूर होत गेलो

ठिणग्या विझून गेल्या, जमले न पेट घेणे
केवळ जरा धुमसलो अन्‌ धूर होत गेलो

धारा न अमृताच्या वळल्या फिरून मागे
जो ओसरून गेला तो पूर होत गेलो

झाल्यात पोसलेल्या जळवा कशा टपोर्‍या
माझीच चूक आहे, मी ऊर होत गेलो

स्मरणातुनी जगाने पुसले असे मला की
वैधव्यग्रस्त भाळी सिंदूर होत गेलो