३२. अर्जुन, कृष्ण आणि भवसागर

कृष्ण आणि अर्जुन या महाभारतातल्या व्यक्तिरेखांशी या लेखाचा काहीही संबंध नाही. कृष्ण आणि अर्जुन या प्रत्येक व्यक्तीच्या दोन मनोदशा आहेत, कृष्ण ही चित्तदशा मोकळीक आणि स्वच्छंद दर्शवते तर अर्जुन ही चित्तदशा संभ्रम आणि उद्विग्नता दर्शवते! जीवनाच्या रथाचं सारथ्य जोपर्यंत मनाकडे आहे तो पर्यंत व्यक्तीची चित्तदशा अर्जुना सारखी आहे, हे सारथ्य तुमच्याकडे आलं की मग चित्तदशा आकाशा सारखी होते, मुक्त आणि स्वच्छंद!

तुम्ही जर कधी पोहणं शिकायचा प्रयत्न केला असेल तर अध्यात्मात जीवनाला ‘भवसागर’ का म्हटलंय ते  तुमच्या लक्षात येईल. इथे पोहणं या प्रणया इतक्याच नितांत रम्य विषयावर थोडं लिहायला हवं.

नव्यानं पोहणं शिकणाऱ्याच्या पाठीला शरीर तरंगेल असं काही तरी बांधायचं आणि मग त्याला हात-पाय मारायला शिकवायचं ही पद्धत सर्वांना माहिती आहे, यात दोन गोष्टी आहेत : एक, शरीर तरंगायला हवं आणि दोन, हात-पाय मारता यायला हवे. शिकणाऱ्याला जेव्हा साधारण हात-पाय मारता येतात तेव्हा त्याच्या पाठीचा फ्लोट काढला जातो. बहुतेकांचा त्यामुळे असा समज होतो की हात-पाय मारल्यामुळे शरीर तरंगतं आणि हात-पाय मारणं बंद केलं की आपण बुडणार! एकदा ही गोष्ट मनात खोल गेली की पोहणारा जीवाच्या आकांतानं हात-पाय मारत किनारा गाठण्याचा प्रयत्न करतो. संसाराचं अगदी असंच आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपण हात-पाय मारतोय म्हणून जगतोय जरा जरी हात-पाय मारणं थांबलं की सगळं संपलं!

पोहायला शिकवणारा एकही प्रशिक्षक हे सांगत नाही की पाण्याला मुळात उद्धरण शक्ती आहे, पोहण्याची सगळी कला फक्त शरीराचं आणि पाण्याचं ट्यूनिंग जमवण्यात आहे. शरीर पाण्यावर फक्त आल्हाद सोडायचं मग पाणीच शरीर उचलून धरतं, शरीर आपोआप तरंगायला लागतं! तुम्ही हात-पाय मारू नका, तुम्हाला कितीही वेळ लागला तरी चालेल पण पाण्याच्या उद्धरणाचा फिल घेण्याचा प्रयत्न करा. पाण्याशी ट्यूनिंग हा एक फिल आहे, तो एकदा आला की शरीराची होडी होते आणि मग वल्ह्या सारखे निवांतपणे, हवे तेव्हा हात-पाय मारता येतात. पोहण्याची अशी काय धमाल मजा येते की विचारू नका कारण शरीरावर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम नाहीसा झालेला असतो आणि शरीर बुडण्याची शक्यता शून्य झालेली असते. तुम्ही तासन्तास पाण्याशी खेळू शकता, शरीराच्या होडीतून हवा तसा जलविहार करू शकता, आकाशाकडे बघत, आकाशाशी एकरूप होत पाण्याच्या शय्येवर सुखात पडून राहू शकता.

पण पाणी उचलून धरतं ही कल्पनाच नसल्यानं पोहणं प्रयास होतो, पोहण्यातली मजाच निघून जाते; पाण्यात असताना पाणी नाकतोंडात शिरेल ही भीती कोंडमारा करत राहते. भवसागराचं नेमकं असंच आहे, भवसागराचं पाणी म्हणजे निराकार! ज्या निराकारानं आख्खं अस्तित्व उद्धरलंय तो आपल्याला उद्धरेल किंबहुना त्यानं आपल्यालाही उद्धरलंय ही कल्पनाच नसल्यामुळे आपण किनारा शोधत शेवटापर्यंत बेतहाशा हातपाय मारत राहतो, तरंगण्याची मजा कधी येतच नाही (दारूचं खरं आकर्षण त्यामुळेच तर आहे! ).

पाण्यात असताना पाणी नाकतोंडात शिरून जीव गुदमरेल ही भीती तर भवसागरात विचारांनी श्वासाचा ताबा घेतल्यामुळे जीवाचा झालेला कोंडमारा इतकाच काय तो फरक आहे!

या भवसागरात पोहण्याची कला अशी आहे:

जोपर्यंत ‘आता काय करायचं? ’ असा प्रश्न पडत नाही, असा विकल्प उपलब्ध होत नाही, अशी फुरसत उपलब्ध होत नाही, तोपर्यंत जीवन हे एकाच चाकोरीतून चालू आहे असं समजा. जीवनात अजून स्वच्छंद उपलब्ध झालेला नाही.  श्वासाचा ताबा तुमच्याकडे नाही तर विचारांकडे आहे,  तुम्ही व्यक्तिमत्त्वातून आणि व्यक्तिमत्त्व अबाधित ठेवण्यासाठी जगताय असा त्याचा अर्थ होतो.

जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ आहे असं वाटेल तेव्हा एक करा उंच मोकळ्या पठारावर जा किंवा तुमच्या टेरेसवर जा आणि सरळ आकाशाखाली या, शांत बसा आणि निराकार तुमच्यात प्रवेश करतोय अशी कल्पना करा. शरीराच्या कोणत्याही भागापासून सुरुवात करा, जिथे सगळ्यात जास्त ताण आहे (म्हणजे डोळे, चेहरा, जीभ, मेंदू) तो भाग नंतर घ्या. तुम्ही योग्य दिशेनं चाललाय याची सगळ्यात सोपी प्रचिती म्हणजे तुमचं तुमच्या श्वासाशी अनुसंधान साधेल. तुमचा श्वास तुमच्या ताब्यात येईल, मग श्वासाच्या लयीत राहून निराकार संपूर्ण शरीरात सामावून घ्या, डोळे, मेंदू, चेहरा, पावलं, हात, मान, पाठ, मेंदूचा मागचा भाग (इथून विचारांचा शरीरात प्रवेश होतो) सगळं हळूहळू शांत होत जाईल.   आता या शांत अवस्थेचं भान ठेवा,   व्यक्तिमत्त्वातून संपूर्ण मोकळीक झालेल्या या अवस्थेतून ‘आता काय करायचं’ ते ठरवा, तुम्ही भवसागरात पोहण्यात वाकबगार व्हाल. अर्जुनाच्या संभ्रमित चित्त दशेतून कृष्णाच्या आकाशात याल, हा भवसागर तुम्हाला विहाराला उपलब्ध होईल!

संजय