बंडू

 

लहानपणी मला बंडू म्हणून का हाक मारायचे ते मला जाम समजायचं नाही. एकतर मी बंड नव्हतो, अगदी संदीप खरेच्या "मी मोर्च्या नेला नाही" सारखी, म्हणजे... "मी मनात सुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही";  माझी परिस्थिती होती.

आमच्या ड्रॉईंगच्या सरांनी मला लहानपणी एक गोष्ट सांगितली होती ते म्हणायचे बंडू तुला आता समजायचं नाही पण ही गोष्ट तू मनात ठेव ‘जेवढा आपण बाहेर कमी धक्का मारू तेवढा आत कमी धक्का बसतो’.

मी म्हणालो सर मला काही समजलं नाही, तर ते म्हणाले की एक विनोद ऐक:

एकदा तीन नौसेना प्रमुख; एक अमेरिकन, एक रशियन आणि एक आपला भारतीय, एका युद्धनौके वरून प्रवास करत असतात. सगळं अगदी व्यवस्थित चालू असतं पण डेकवर बसल्या बसल्या त्यातल्या अमेरिकन प्रमुखाला एक कल्पना सुचते, तो इतर दोघांना म्हणतो चला आपण आपल्या कॅडेटसचं धाडस बघूया! आता असा कार्यक्रम म्हटल्यावर इतर दोघं  लगेच उत्सुकतेनं विचारतात, काय करायचं? अमेरिकन म्हणतो बोलवा कॅडेट्स, लगेच तीन उमदे कॅडेट्स डेकवर येतात. तिथे खवळलेल्या समुद्रात दूर अंतरावर एक दीपस्तंभ असतो, तो दाखवून अमेरिकन त्यांना म्हणतो : तुमच्या पैकी एकेकानं आता समुद्रात उडी घ्यायची, आम्ही टायमिंग लावणार आणि जो कमीतकमी वेळात दीपस्तंभाला शिवून येईल तो सगळ्यात धाडसी असं जाहीर होईल, कमॉन!

रशियन कॅडेट सर्वप्रथम उडी घेतो आणि जीवाच्या आकांतानं पोहत जाऊन दहा मिनिटात दीपस्तंभाला हात लावून येतो, रशियन प्रमुख मोठ्या अभिमानानं इतर दोघांकडे बघतो आणि म्हणतो : बघा धाडस!

हे बघितल्यावर अमेरिकन प्रमुख त्याच्या कॅडेटला फर्मान सोडतो : तू आठ मिनिटात दीपस्तंभाला शिवून यायचंय, कमॉन! अमेरिकन कॅडेटनी आधीच सगळी तयारी केलेली असते, तो लगोलग उडी घेतो आणि अक्षरशः: आठ मिनिटात दीपस्तंभाला शिवून येतो, अमेरिकन प्रमुख अत्यंत गर्वानं इतर दोघांकडे बघतो आणि म्हणतो: ‘बघा धाडस! ’

मग आपल्या भारतीय कॅडेटला आपला नौदल प्रमुख फर्मावतो : ‘तुला आता सात मिनिटं आहेत, कमॉन, गो! आपला कॅडेट शांतपणे त्याच्या प्रमुखाकडे बघतो आणि म्हणतो ‘ तुमच्या बापाला तरी जमेल का? ’ क्षणभर एकदम सुन्न शांतता पसरते आणि मग भारतीय नौदल प्रमुख इतर दोघांकडे बघून म्हणतो : ‘बघा धाडस! ’

मी म्हणालो ‘ आहो सर यात कसलं धाडस? तर सर म्हणाले ‘अरे जीव असेल तर नोकरीचा उपयोग नाहीतर नोकरी काय कामाची’? उगाच किरकोळ कारणासाठी जीवावर कशाला उदार व्हायचं!

हा विनोद माझ्या मनावर असा काही परिणाम करून गेला की मी प्रत्येक बाबतीत आपल्याला नक्की काय साधायचंय आणि त्यासाठी कितपत देहभान विसरायचं हे ठरवायला लागलो.

माझ्या अशा स्वभावामुळे माझ्या कडून काहीही धाडसी उपक्रम होणार नाही हे माझ्या जन्मदात्यांना (विशेषतः पिताश्रींना) कळून चुकलं त्यामुळे आपल्या घराण्यात एकतरी डॉक्टर पाहिजे या आमच्या सर्वात मोठ्या काकांच्या मनीषेला वारस लाभला नाही. मी आपला कॉमर्स हा मध्यम मार्ग निवडला!

जसजसा मी मोठा होत गेलो तसं मला कळलं की आपल्याला धाडस करायला भरील घालणारे, बाका प्रसंग ओढवला तर आपल्या मागे नसतात, त्यामुळे धाडस करायचंच झालं तर एकट्याच्या जवाबदारीवर करायचं आणि मग स्वतःला शाबासकी द्यायची. स्वतःची जवाबदारी नेहमी स्वतःवर ही दुसरी खूणगाठ मी मनाशी पक्की बांधली.

मला बायको मात्र जाम धाडसी मिळाली. आम्हाला मुलगा झाल्या झाल्या तिनी मला सांगितलं की मी याला सैन्यात पाठवणार! मला ती आयडिया काही पटेना कारण अशा कामाला मिलिटरी बॅकग्राउंड पाहिजे असं मला मनोमन वाटत होतं. त्यात आपल्याला जे काय अपत्य होणार ते एकच कारण उगाच संसार वाढवायचं धाडस काही माझ्यात नाही हे मी तिला आधीच सांगितलं होतं. ती लहानपणीच मुलाला अत्यंत प्रभावीपणे, म्हणजे आवाजात चढ-उतार करत, शौर्यकथा वगैरे वाचून दाखवायची.   मुलगा जेव्हा पाच-सहा वर्षाचा झाला तेव्हा तिनी एकदा त्याला आपली मनीषा बोलून दाखवली, ती म्हणाली ‘अरे तू आपल्या देशासाठी काही तरी केलं पाहिजेस’ मुलगा म्हणाला ‘काय करायचंय’? तर ती म्हणाली की ‘मी तुला मिलट्रीत घालणार आहे’ यावर त्या सहा वर्षाच्या मुलानं काय उत्तर द्यावं? तो म्हणाला ‘मला अजिबात मरायचं नाही’! माझी बायको थक्क होऊन माझ्याकडे बघत राहिली.

पण संधी सोडेल ती बायको कसली, ती म्हणाली ‘तुमचा मुलगा म्हणजे अगदी तुमच्या हाता-वर- हात आणि पाया-वर-पाय आहे! मी म्हणालो ‘अगं इतक्या लहानपणी त्याला कशातून काय निष्पन्न होणार हे कळतंय हे काय कमी आहे’! ‘आहो सगळे सैन्यात जाणारे मरतात का? ’ ती म्हणाली. ‘अगं पण तो म्हणतोय ‘मरायला तिकडे जायचंच कशाला? ’ तर अशा पद्धतीनं धाडस निर्माण होण्याची जी काही शक्यता माझ्या पुढच्या पिढीत बायकोमुळे आली होती ती ही मावळली.

काही वर्षानं मुलानं यथावकाश चित्रकला हा अत्यंत साधा आणि सोपा मार्ग निवडून त्यात करिअर करायचं ठरवलं. एकदा आम्हाला काही तरी कार्यक्रमाला माझ्या सासरी बोलावलं होतं. पुरणपोळी होती, मी यथेच्छं जेवलो, हॉलमध्ये वाऱ्याची मंद झुळूक येत होती, बायको आणि तिची आई जेवत होती, मी शांत झोपून गेलो. वर्किंग डे ला, वर्किंग अवर्स मधे, सासऱ्याच्या घरी, सासऱ्या समोर निवांत झोपणं यात मला काही धाडस वाटलं नाही. थोड्या वेळानं माझा मुलगा कॉलेज मधून परस्पर आजोळी जेवायला आला. त्यांची जेवणं झाल्यावर ते सगळे हॉलमध्ये येऊन गप्पा मारत बसले तर मला जाग आली.

माझा मुलगा मला म्हणाला ‘बाबा, तुम्हाला एक विचारायचंय’ म्हटलं ‘काय? ’ तर तो म्हणाला की ‘आम्हाला साहस या विषयावर एक काँपोझिशन करायचंय, काही तरी सुचवा’. माझी बायको म्हणाली ‘अरे तू कुणाला विचारतोयस? त्यांचं सगळं धाडस फक्त एकाच गोष्टीत आहे ती म्हणजे आराम करणं! ’ माझ्या सासूबाईंना लेकीच्या वाक्कौशल्या विषयी वाटलेलं कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं.

मी म्हणालो, ‘काँपोझिशनचं मला माहिती नाही पण निवांतपणे जगणं हे सर्वात मोठं धाडस आहे’.

क्षणभर विचार करून तो म्हणाला : ‘बाबा मला काँपोझिशन सुचलंय! ’

 मी चाटंच पडलो, म्हटलं ‘काय आहे ते?

तो म्हणाला ‘मी लंबकाचं एक प्राचीन घड्याळ काढणार आहे, त्यात लंबक स्थिर झालेलायं , काटे अदृश्य झालेत आणि वेळेचे आकडे पुसले आहेत! ’

मला काय बोलावं ते सुचेना. वेळ संपली की सगळं निवांत होईल, मनाच्या चकव्याला आपण भूलणार नाही ही गोष्ट त्यानी काय अचूक हेरली होती.  मी त्याच्याकडे बघीतलं, तो माझ्याकडे बघत होता, काहीही न बोलता मी त्याला मिठी मारली.

संजय