पोच

अन्न खातो, श्वासही घेतोच आहे

मी तुझ्यावाचूनही जगतोच आहे

 
दीप विझले फक्त डोळ्यांतील माझ्या

अंतरीच्या घन तमी जळतोच आहे

 
बोलण्याचा सूर काही और आहे

लाघवी शब्दांत देखिल खोच आहे

 
का तुझ्या नजरेत ओळखही नसावी ?

वेगळे झालो तरी मी तोच आहे

 
गारुडी कित्येक आले आणि गेले

वासनेचा नाग पण डसतोच आहे

 
शेवटी शृंगारही उपचार ठरला

हा तुझा हुंकार नाही, पोच आहे