न्याय (बालनाटिका)

पात्र परिचय : मॅ : मॅडम, मुख्याध्यापिका,  बा : बाई, एक शिक्षिका,  शि : शिपाई    रे : रेवदांडेकर, एक पालक        (वर्तमानपत्राचा  संपादक)  प्री : प्रीतम पंजाबी, एक पालक, शाळेचा शुभचिंतक,   मु : प्रीतमचा मुलगा.

( माध्यमिक शाळा, मुख्याध्यापिकेच्या कक्षामध्ये त्या आणि एक शिक्षिका बोलत असताना पडदा उघडतो. )

मॅ : हं काय हो बाई, शाळा तपासणीसाठी कोण येणारंय्?
बा : इन्स्पेक्शन् साठी नं?...
मॅ : होय होऽ, तेच ते... काही कळलं कां? तुम्हाला सांगितलं होतं ना चौकशी करायला? कांही खबरबात?
बा : न्यूज नं... काढली की!
मॅ : अहोऽऽ मग कधी सांगणार?.. तुम्हाला कीनै पाल्हाळ लावायची फार संवयच्चय् बघा...
बा : नो सच्च अ हॅब्बिट अं... तसं काही नाही बरं... त्याचं कॉयंय्...
मॅ : (वैतागून) बाई ऽऽऽ, अहो तुम्ही मुद्याचं बोलाल का जरा?...
बा  : होय हो... तेच तर सांगत होते मी... तुम्हीच बोलणं सारखं तोडताहात् हं... तर काय सांगत होते मी..
    (मॅडम कपाळावर हात मारत राहातात... ).... हो, आठवलं! मॅडम...
मॅ : काय ते लवकर सांगा होऽऽ..
बा : छेः बाई, एव्हढं चिडायचं कशाला ते... माझ्या माहितीप्रमाणे कालच नव्या इन्स्पेक्टर-मॅडमनी चार्ज घेतलाय्...
मॅ : नवीन तपासनीस?... धन्य! काय मेलं खात्याचं हे धोरण... दरवर्षी नव्या नेमणुका... जरा उसंत मिळू देत नाहीत् खर्चातनं...
बा : डोंट वरी मॅडम... त्याची अगदी अजिबात काळजी करू नका... सगळी कशी अगदी चोख व्यवस्था केलीय्...
मॅ : म्हणजे?... ठरल्या तारखेलाच तपासणी?
बा : हो ना... अहो, म्हणून तर मॅडमसाठी यायला-जायला आपल्या चेअरमनसाहेबांची कार... अगदी मारुती हं... परत चहा, नाश्ता, नॉनव्हेज   ... ते कॅफे नाझमधून...
मॅ : अहो, तुम्ही तर परस्पर ठरवून मोकळ्या झाल्यात्... पण मी पैसे कुठून उभे करू? (डोके धरून बसतात. )
बा : ते कुठं द्यायचेत्? सगळं देणगीखाते... बिगरपावतीचं... काय?...
मॅ : बाई, बरं झालं हो... तुम्ही स्वतःच अगदी जातीनं पाहाताय् म्हणून बरं! माझी फार मोठी काळजी मिटली पाहा... या शाळेचा कारभार    पाहाता पाहाता दिवसाचे अगदी चोवीस तास पुरत नाहीत हो...
बा : हो नाऽऽ... खरंय् होऽऽ... अगदी ट्रू! तुमची तब्येत किती खराब दिसते आजकाल...
मॅ : काय, म्हणायचंय् काय तुम्हाला?
बा : तसं नाही हो...
मॅ : असू देत... हे घ्या खर्चाला लागले तर ठेवा.. (मॅ कांही नोटा पुढे करतात. )
बा : तुमच्या पर्सचा भार कशाला हलका करता मॅडम? इकडम तिकडम करूनच हा खर्च भागवतो ना आपण? अहो, हे ही सरकारी कामच    आहे की!
मॅ : (हंसत पैसे परत पर्समध्ये ठेवतात )... बरं, ती हजेरीपत्रके, नोटस, रजिस्टर्स...
बा : अहो मॅडम, मी सांगितलं ना... सारी व्यवस्था कशी अगदी चोख केलीय्!
   (शिपाई आंत येतो व एक चिठ्ठी ठेऊन जातो. )
मॅ : (चिठ्ठी मोठ्याने वाचतात) सावळाराम सखारामपंत रेवदांडेकर... बाई, कोण हो हे?
बा : मॅडम, अहो ते म्हणजे त्या हिचे वडील असतील हो...
मॅ : त्या हिचे म्हणजे कुणाचे?
बा : अहो, ती आपली सुमन हो...
मॅ : काय हो बाई... किती मोघम बोलता हो तुम्ही...
बा : नाही हो... सुमन म्हणजे ती हो... त्या माश्यांच्या अक्वेरियमचं प्रकरण हो!
मॅ : हां हां हां... सायकलचा धक्का लागला आणि काचेची पेटी फुटली... मग..
बा : मग बळीरामचं ते आकांडतांडव.. भरपाईची मागणी... बाई गं... काय मेला तो गोंधळ! कशीबशी समजूत घालून त्याला पाठवलं हो    मी...
मॅ : पण या साऽसऽऱ्यांचं इथं काय काम ते?
बा : तुम्हाला मी रिपोर्ट केलं होतं ना मॅडम?... सुमनच्या वडिलांना बोलावलंय्... तेही सांगितलं होतं हो मी... अहो, भरपाई कोण देणार?
मॅ : हां हां हां... आठवलं हं... अहो, काय काय म्हणून लक्षात ठेवायचं?... ( घंटी वाजवतात... शिपायाला हाका मारतात... शिपाई येऊन    उभा राहातो. मॅडन आपल्याच नादात त्याला सांगतात... ) पाठवा त्या साऽसऽऱ्यांना आत...
शि : सासऱ्यांना?.. पण मॅडम, आपलं तर अजून... ( मॅडम लाजतात... बाई फुसकन हंसतात)
मॅ : तुम्ही म्हणजे असे आहात् कीनै... चान्स सोडणार नाहीत... ते बाहेर कोण आलंय्... ते हो... त्यांचं नांव म्हणजे फलाटात न मावणारी    मालगाडीय! (चिठ्ठीवरचं नांव वाचतात... ) सावळाराम सखारामपंत रेवदांडेकर...
बा : रियली हं... खरंच बोलता बोलता डिरेलमेण्ट व्हायची... म्हणजे एखादा डबा घसरायचा... म्हणून मॅडमनी शॉर्टफॉर्म केलाय्... सा-स-रे!    समजलं?... जा आता नि पाठवा त्यांना...
शि : सा-स-रे (हंसत हंसत जाताना म्हणत असतो... ) पाठवतो हां तुमच्या त्या सा-स-ऱ्यांना (जातो. )
रे : (शरीरानं किरकोळ, बोलण्यात मीपणा, दुसऱ्याबद्दल तुच्छता... आंत येत... ) मॅडम, नमस्कार!
मॅ : या बसा... (बाईंना उद्देशून... ) आतां तुम्ही वर्गावर गेलात तरी चालेल...
बा : (खोचकपणे) जाऊ म्हणता?
मॅ : (खोच ओळखून आवाज किंचित चढवून ) बाईऽऽऽ
बा : जाते हं... पण मला थोडं बोलायचं होतं... पण जाऊं देत, नंतर येईन (जातात. )
रे : सुमननं निरोप दिला होता, पण खरं सांगू...
मॅ : अहो, ही शाळा आहे, इथं विद्या आणि सत्य दोन्ही गोष्टी अगदी हातात हात घालून असायला हव्यात, खरं ना?
रे : माझा त्याच्याशी काय संबंध?... तुमचं नांव विद्या असलं तरी माझं नांव सत्य नाही.. म्हणे हातात हात घालून... मी             इथं आलोय् ते केवळ स्त्रीदाक्षिण्य म्हणून!
मॅ : आम्ही काय एव्हढं कवडीमोल आहोत्? आपण कोणतं पद भूषवितां?
रे : माहित नाही? आश्चर्यम्! अहो, मी म्हणजे सुप्रसिद्ध ‘कालरोजी’ वर्तमानपत्राचा संपादक!
मॅ : मग बरोबरंय... पेपरचा संपादक म्हणजे मी-मी म्हणणारे सरकरी अधिकारीसुद्धा तुमच्यापुढे गोंडा घोळणारंच!
रे : अलबत!
मॅ : पण मी तशी मुळ्ळीच नाही हं... मी तुम्हाला बोलावलंय् ते तुमच्याच मुलीच्या संदर्भात...
रे : नो- नेव्हर... तुमचे शालेय समारंभ म्हणजे... बोलूच नका... तिला ड्रामा-डान्समध्ये भाग घ्यायला मी परवानगी देणार नाही... नो...    नेव्हर... त्रिवार न्नो!
मॅ : मी तसं कांही म्हणालेय कां?
रे : ट्रीपला?... तेही नाही... एक पै देणार नाही...
मॅ : त्याबद्दलही मी कांही बोललेले नाहीयेय्... नाही म्हणजे नाही म्हणजे नाऽही!
रे : (आवाज उतरवून) म्हणजे माझा पैशांचा कांही प्रॉब्लेम नाही हां... बिलकुल नाही. अहो, तुम्हाला सांगतो, सुमननं लहानपणी ट्रायसिकल    मागितली... मी कोरी-करकरीत बायसिकल आणून उभी केली तिच्यापुढं... ताबडतोब!
मॅ : पण ऐका तरी...
रे : त्यात काय ऐकायचंय्? मुलांना वाऱ्यावर सोडायला मी तयार नाही... बिलकुल नाही... हं... मला अजिबात वेळ नाही... मी चाललो..
मॅ : थांबा, माझं काम दोन मिनिटांचं आहे... तुम्ही उगाच झाड सोडून गवत बडवताय्... अगदी बीटींग विदाऊट मीटींग द पॉईंट!
रे : बरं, सांगा काय काम आहे ते... समारंभाच्या अध्यक्षपदासाठी विचारणार असाल तर, आय यॅम रेडी... पण देणगीचं मात्र जमणार नाही... आधीच स्पष्ट केलेलं बरं! (हॅः हॅः हॅः... खांदे उडवत हंसतो... )
मॅ : असल्या उत्सवमूर्तींची कांही वाण नाही, मी तुम्हाला बोलावलंय् ते वेगळ्याच कारणानं...
रे : काय?
मॅ : तुम्ही तुमच्या सुमनला अगदी कोरी-करकरीत बायसिकल दिलीत्... अजून चालवायला नाही शिकवलीत्?
रे : त्यात काय विशेष? ती आता शिकतेय्.. येईल!
मॅ : हां, त्या शिकवणुकीची फी आता भरा...
रे : म्हणजे तुम्ही तिला सायकल शिकवताय् की काय?
मॅ : मी काय शिकवणार? अहो, तिनं शाळेच्या गेटपाशीच पराक्रम केलाय...
रे : तो काय?
मॅ : मुलांना प्रात्यक्षिकासाठी मासे असलेली काचेची पेटी घेऊन आला होता एक विद्यार्थी... परत घेऊन जात असताना सुमननं   सायकल       घातली त्याच्या अंगावर... पेटी फुटली नि सारे मासे स्वर्गवासी झाले...
रे : मग त्या माशांचं काय केलं?
मॅ : ते नेले कावळ्यांनी उचलून... त्या मुलानं धरल्या सुमनच्या झिंज्या.. कसं बसं आम्ही सोडवलं तिला...
रे : त्या पोट्ट्याची एव्हढी हिंमत? कोण तो? कुठाय तो? आमच्या मुलीच्या झिंज्या म्हणजे... अं... म्हणजे काय, त्याला वडाच्या       पारंब्या वाटल्या, आलं मनात खुशाल लोंबकळावं?
मॅ : नाही, नाही... तशा तिच्या त्या उंदराच्या शेंड्याच आहेत की! लोंबकळता कसं येईल?
रे : (चिडून) मॅडम, हे - हे फारच होतंय हां... मला सहन न होण्यासारखं...
मॅ : मी त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना दोघांनाही बोलावते... आपापसात तुमचं तुम्ही मिटवावं हे चांगलं! नाही मला तरी तसं वाटतं    हो!
रे : मिटवावं?... ह्यॅः... आता मी सोडणार नाही... माझ्या मुलीच्या झिंज्या... अरे, एकेकाची लक्तरं लटकावीन... कालरोजीचा मी संपादकंय्    म्हणावं, लक्षात ठेवा...
मॅ : आणि हो, सांगायचं राह्यलंच... त्या मुलानं दोनशे रुपये भरपाई म्हणून मागितलेत्...
  (मॅडम फोन करतात... दुसरीकडे रे हातवारे करीत स्वतःशीच कांहीतरी बडबडत राहातात. )
रे : अरे हट्, म्हणे भरपाई... कसली भरपाई? सुमन सायकल शिकतेय्... कुणाला तरी धक्का लागला... तो लागायचाच... त्यासाठी भरपाई   ? एक छदाम देणार नाही!
मॅ : छदाम कां बदाम ते तुमचं तुम्हीच बघा... ते येईपर्यंत हा ‘सायरन’चा अंक पाहा.
     (शिपायाला बोलावतात आणि त्याला सांगतात - ते प्रीतम पंजाबी आले की त्यांना लगेच आत पाठवा... बऽरं म्हणून शिपाई जातो. )
मॅ : (काही तरी बोलायचं म्हणून आपलं काम करत्ता करता बोलतात, लक्ष फायलीत ) संपादकसाहेब, तुमचं नांव बाकी फार लांबलचकंय् बाई,    अगदी रबर ताणत राहिल्यासारखं वाटतं!
रे : अहो, आमचं खानदानंच तसं प्रसिद्ध आहे... आमच्या पूर्वजांचा पराक्रम वाचा... त्या ‘तात्या खडकवीसां’च्या बखरीतनं... आम्हीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहोत... (उगीच छाती फुगवतात. )
मॅ : आता रणगाणी संपली!...
रे : म्हणून काय झालं? आमचा ‘कालरोजी’ आहे ना... रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग... कलमबहाद्दूर आहोतच आम्ही! (हॅः हॅः हॅः करीत    सारं शरीर हलवत हंसतात. )
  (तेव्हढ्यात प्रीतम पंजाबीचा मुलगा बळीराम प्रवेश करतो... गोरा, बांधेसूद, चुणचुणीत, शाळेच्या ड्रेसमध्ये. विचारतो... )
मु : मी आत येऊ कां?
मॅ : अरे ये... ये ना... तुझे बाबा नाही आले?
मु : येताहेत् ते मॅडम... बाहेर नगरसेवक भेटले, त्यांच्याशी बोलताहेत...
रे : हाच कां तो दांगडोबा?... काय रे, तुझा बाप तुला हेच शिकवितो कां? माझ्या मुलीच्या झिंज्या...
मॅ : अहो, संपादकमहाशय, ही माझी केबीन आहे... कालरोजीची कचेरी नव्हे... रस्त्यावरची भाषा बंद करा... त्याच्या वडिलांना येऊ देत...
रे : अरे येऊ दे नाऽऽ डरतोय् का?
  (प्रीतम पंजाबी आंत येतो... भारदस्त, बळकट, बोलणं नम्र पण करारी आवाज... )
प्री : नमस्कार मॅडम... कशाला बोलावलंत्? कांही सेवा? कुणी कांही त्रास वगैरे देतोय् कां?
मॅ : तसं कांही नाही हो... तुम्ही आमच्या पाठीशी असताना कुणाची हिंमत होणारंय्?
प्री : (रे कडे पाहात... ) मॅडम, बिलकुल संकोच करू नका... अगदी पैशांची अडचण असली तरीसुद्धा...
मॅ : नाही हो, खरंच कांही नाही... ती हंडी फुटली होती ना त्याबद्दल बोलावलं होतं...
प्री : हां हां... आले त्या पोरीचे वडील?
मॅ : हो... आलेत ना. तुमचीच वाट पाहात बसलेत्... हे रेवदांडेकर... ‘कालरोजी’चे संपादक आहेत... बहाद्दूर आहेत, म्हणजे कलमबहाद्दूर हो!
प्री : हे कां? अरे मी तर यांना ओळखतो.. हॅलाऽव् मिस्टर (शेकहॅंडला हात पुढे करतो. )
रे : (शेकहॅंड टाळतात... बसल्या बसल्या झटकन नमस्कार करतात. प्रीतमच्या व्यक्तीमत्वामुळे भारावलेले) अहो, लहान मुलगी आहे,      सायकल शिकतेय... लागला असेल धक्का, कुणी काय जाणून बुजून असे थोडेच करतात?
प्री : करेक्ट!
रे : अहो,   तिच्याकडून झाली चूक... त्याचा भुर्दंड बापाकडून मागायचा? बरोबर नाही वाटत बुवा!
प्री : मिस्टर, असे पाहा... माझ्या मुलाकडनं ती हंडी फुटली असती, तर ते नुकसान मीच सोसलं असतं, नाही कां?
रे : हो ना... मुलाचे उद्योग म्हणजे असंच चालायचे की! (मनावरचे ओझे हलके झाल्याचा चेहऱ्यावर भाव. )
प्री : तेच तर मी म्हणतोय्... तुमच्या मुलीच्या चुकीनं नुकसानी झाली, ती तुम्ही बाप म्हणून सोसली पाहिजे, काय?
रे : (पेचात पकडला जातो) नाही नाही, असं कसं?
मॅ : अहो, साऽसऽरे... दोघांनाही न्याय एकच... मुलांनी केलेले नुकसान त्यांच्या वडिलांनी सोसायचं... जी कांही वाजवी किंमत आहे, ती द्या    आणि मिटवा...
  (रे दोनशे रुपये काढून नाराजीने प्रीतमच्या हाती देतात... रेवदांडेकरांना उद्देशून)
मॅ : (हंसत) अहो, तुम्ही तर छदाम देणार नव्हता... एकेकाची लक्तरं लटकावणार होता नं?
रे : (परत फुशारकी दाखवत) आम्ही कलमबहाद्दूर आहोत... जे न्यायाचं तेच आम्ही स्वीकारीत असतो... आमच्या घराण्याचा तो बाणाच    आहे!
प्री : मॅडम, हे दोनशे रुपये तुमच्याकडेच ठेवा... शाळेसाठी मासेऱ्हंडी पाठवून द्यायला सांगतो.. मुलांना त्याचा उपयोग होईल... (रे कडे पाहात) अहो मिस्टर, मला वाटतं, आपणही दोनशे रुपये द्या, म्हणजे शाळेला दुप्पट मोठी हंडी घेता येईल, काय?
रे : (गोंधळून) पण हे दोनशे रुपये मीच दिलेत ना?
प्री : (आवाज कांहीसा करारी करीत) काय? तुम्ही दिलेत् ?... ते पैसे माझे आहेत आणि मी ते दिलेत्... अगदी न्यायानं तुम्ही ते मला दिले होते ना?
रे : (अजून गोंधळलेलेच) अं... हो, पण...
मॅ : अहो, खानदानी साऽसऽरेऽ संपादकसाहेब, तुम्हाला पैशांचा कांही प्रॉब्लेम नाही, असं तुम्हीच म्हणत होता...
प्री : ओऽऽऽ होऽऽऽ! मग द्या ना हो... शाळेलाच देणार आहात की...
  (रेवदांडेकर भेदरलेल्या नजरेनं पुन्हा दोनशे रुपये देतात-)
रे : या सुमीची सायकल फारच महागात पडली बुवा! (जाऊ लागतात)
  (प्रीतम खळखळून हसतो... मुलगा आणि तो वेस्ट-इंडियन स्टाईल टाळी देतात-घेतात. मॅडमला -जातो- सांगून जातात. )
मॅ : (चारशे रुपये हातात पसरवून धरत हंसतात... स्वतःशीच बोलतात ) म्हणे कलमबहाद्दर, व्वा!
 (मॅडमचे बोलणे चालू असताना बाई प्रवेश करतात. मॅडमच्या हातातील चारशे रुपयांच्या नोटांकडे आ वासून पाहात असताना पडदा पडतो. )