शुक्रवार फनीवार

गणपतीसाठी आई व भाऊ गावी गेले होते. घरी मी एकटा. शुक्रवारी रात्री ठाण्यात
राहणाऱ्या डॉ. प्रविण घाडीगावकर व डॉ. सौ. नैना घाडीगावकर या
नवदांपत्याकडे जेवणाचे निमंत्रण होते. (डॉक्टरांच्या मागे डॉ. लावावे
लागते.) ऑफ़िसमधुन घाईघाईने कोडींग क्रिया पूर्ण करुन ठाण्याला गेलो. जेवण
मस्त झालेले. पनीर-सोयाबीन ग्रेव्ही (शाकाहारी जोशीसाठी)/चिकन (मांसाहारी
बाकिच्यांसाठी), बिर्याणी, वडे, लिंबू सरबत(चवीसाठी) आणि नंतर भरपुर
आईस्क्रीम व गप्पा.

गप्पांत वेळ कसा गेला कळलेच नाही. शेवटी नवदांपत्याने आठवण करुन दिली अरे
ऊशीर झालाय, तुम्हाला ट्रेन मिळणार नाहित. (नवदांपत्य ना ते!) ठाणा
स्टेशनवरुन पनवेलची ट्रेन गेलेली, बस देखील नाही. मग कुर्ल्याला आलो आणि
तेथुन १.१५ च्या शेवटच्या ट्रेनने सीवुड्स. स्टेशनवरुन बिल्डींगपर्यंत
चालत. पाय थकलेले, जेवण अंगावर आलेले, झोप अनावर झालेली.

दारासमोर उभा मी किल्लीसाठी बॅगेत हात घातला, हाताला किल्ली लागली नाही!
पुन्हा बॅगेत बघितले, सगळे खिसे चाचपडुन बघितले. झोप इफ़ेक्ट असेल म्हणुन
पुर्ण बॅग रिकामी करुन बघितली. पण छे! किल्ली नाही. नंतर लक्षात आले,
कोडींग क्रियेच्या गडबडित ती ऑफ़िसमध्येच राहीली. आता काय करायचे? रात्रीचे २
वाजलेले. तसा सीवुड्समधे एक मित्र आहे पण नवदांपत्य असल्यामुळे त्याला
जागे करायचे पाप केले नाही. बॅचलर मित्र दुर राहणारे. शेजारी किल्ली आम्ही
ठेवत नाही. शेवटी बिल्डींगच्या पार्किंग लॉटमध्ये एक ग्रॅनाईटची लादी आहे,
ती साफ़ केली आणि दिले झोपून. सुदैवाने डास नाईट आऊटला बाहेर गेलेले, हवा
थंडगार होती, छान झोप लागली. (प्रत्येक सकाळ्चे वाक्य.)

सकाळी काही "School" मध्ये जाणाऱ्या मुली ("Business School" मधल्या मुली
सोसायटीत नाही आहेत.) मला बघुन ओरडल्या आणि मला ७.३० च्या सुमारास जाग आली.
दाराबाहेर अडकवलेला पेपर घेतला आणि तडक ऑफ़िसला गेलो. (दुसरे करणार काय?)
"Jovan Musk" चा खऱ्या अर्थाने मला त्या दिवशी उपयोग झाला. ऑफ़िसची वेळ
१०.३० वाजता. ऑफ़िसमधले सगळेजण मला विचारत होते, "काय रे आज लवकर आलास?" मी
म्हटले, "अरे हो रे/ग, आज कोडींग क्रिया भरपुर आहे ना!". रात्री घरी जाताना
मात्र तिला आठवणीने सोबत घेतले.