३१. (दोन) स्मृती

स्मृती या विषयावर पहिल्याच दिवशी आलेले चार प्रतिसाद बघून मला आणखी लिहावसं वाटतंय

स्मृती हा विषय विस्मृती वर लिहिल्या शिवाय पूर्ण होणार नाही. एक विनोद आहे:

एक सायकॅट्रीस्ट आपल्या पेशंटला उद्विग्नता आणि दहशत यातला फरक समजावून सांगत असतो तो म्हणतो :

'व्हेन यू कॅनॉट डू इट फॉर द  सेकंड टाईम इट इज फ्रस्ट्रेशन'.

पेशंट विचारतो ‘येस, बट देन डॉक व्हॉट इज पॅनिक?

डॉक्टर म्हणतात: ‘व्हेन यू कॅनॉट डू इट फॉर द फस्ट टाईम दॅट इज पॅनिक!

हा विनोद विस्मृती म्हणजे काय हे समजायला उपयोगी आहे. एखादी गोष्ट तुम्हाला एकदा आठवते पण दुसऱ्या प्रयत्नाला आठवू शकत नाही तेव्हा तुम्ही उद्विग्न होता पण जर तुम्हाला ती पहिल्यांदाच आठवेनाशी झाली तर दहशत निर्माण होते!

विस्मृतीचं शारीरिक कारण वय होणं आहे, वयपरत्वे मेंदूतल्या काही पेशी निकामी (डिजनरेट) व्हायला लागतात आणि मग त्यांच्यावर लिहिलेली स्मृती अनाकलनीय (अनरिडेबल) होते. स्मृतीच्या सलग प्रवाहात ब्लँक्स यायला लागतात आणि आपण हवालदिल व्हायला लागतो. यात साधारणपणे न वापरल्या गेलेल्या स्मृतीच्या पेशी आधी निकामी होतात.

मेंदूच्या पेशी निकामी होऊ नयेत किंवा झालेल्या पुनर्जीवित व्हाव्यात यासाठी भारतीय योगशास्त्रात एक सर्वोत्तम उपाय आहे तो म्हणजे ‘भ्रामरी’

भ्रामरी काय आहे हे समजावून घेण्यापूर्वी विस्मरण ही मेंदूशी संबंधीत घटना आहे (म्हणजे पायचं फ्रॅक्चर ही जशी आपण पायाशी संबंधीत गोष्ट आहे असं समजतो तशी), असा वस्तुनिष्ठ विचार करणं सर्वात महत्वाचं आहे त्यामुळे मनावरचा ताण एकदम कमी होतो आणि विस्मृतीशी व्यवस्थित डील करता येतं.

शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पाठ कुठेही टेकवून शांत बसा, मांडीवर दोन उश्या ठेवा आणि कोपरं उशांवर टेकवा (हे कोपरं टेकवणं महत्वाचं आहे). आता अंगठे कानात घालून उरलेल्या बोटांनी डोळे बंद करा. दीर्घ श्वास घेऊन मनोगती जसा हंम्म प्रतिसाद देतात तसा आवाज किंवा ॐ म्हणायला सुरुवात करा. तुम्ही जर योग्य प्रक्रिया करत असाल तर प्रत्येक उत्छ्वासा बरोबर आवाज सुरू होईल आणि मग श्वास संपल्यावर एका सहज विश्रामा नंतर आपोआप श्वास आत घेतला जाईल आणि पुन्हा आवाजाचं दुसरं आवर्तन सुरू होईल.

नैराश्य आणि निद्रानाश यावर भ्रामरी हे सर्वोत्कृष्ट औषध आहे

भ्रामरीत न सांगीतली जाणारी पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आतून मेंदूकडे बघा आणि तुम्ही करत असलेला भ्रमरा सारखा आवाज मेंदूच्या सर्व भागात न्या. एखादं सूक्ष्म ड्रील फिरावं तसा आवाज संपूर्ण मेंदूतून फिरवा यानी मेंदूच्या पेशी सक्रिय होऊ लागतील. मेंदूच्या पेशी सक्रिय करायचा हा जगातला एकमेव निर्धोक आणि विनाऔषधाचा उपाय आहे. तुम्हाला मजा वाटते आहे तो पर्यंत भ्रामरी करा, मेंदू सक्रिय झाल्यामुळे तुम्हाला एकदम लाईट वाटायला लागेल.

आता मी पहिल्या लेखात सांगीतलेली ‘गोइंग डाऊन द मेमरी लेन’ प्रक्रिया करून बघा. काही दिवसांच्या प्रयत्ना नंतर, ज्या पहिल्या संवेदनेला स्मृती सक्रिय झाली तिथे तुम्ही सहज येऊ शकाल, तुम्हाला मनाच्या प्रक्रियेचा उलगडा होऊ लागेल!

या अस्तित्वातली प्रत्येक प्रक्रिया आवर्तनात्मक (सर्क्युलर) आहे, विचारांची प्रक्रिया पण तशीच आहे, आपण बेसावध असल्यामुळे विचार कसा सुरू झाला आणि तो आपल्याला कुठून कुठे घेऊन गेला हे आपल्या लक्षात येत नाही.

थोडक्यात, विचाराच संपूर्ण आवर्तन ( सुरुवात-प्रवास-शेवट) जो पर्यंत आपल्या लक्षात येत नाही तो पर्यंत मनाची प्रक्रिया काय आहे ते कळणार नाही. त्याच प्रमाणे विचार अनियंत्रित आणि अनिर्बंध चालतील, 'विचार करण्याचं’ स्वातंत्र्य राहणार नाही, विचार 'होत राहतील'.

 मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की फक्त शास्त्रज्ञच एखाद्या विषयावर सलग आणि तासंतास विचार करू शकतो. पैसा हा अगदी अस्तित्वालाच धक्का लावणारा विषय असल्यामुळे तो एक सोडला तर इतर कोणत्याही विषयावर आपण सलग आणि दीर्घ काळ विचार करू शकत नाही. जर असं सलग आणि दीर्घ काळ विचारचक्र सुरू झालं तर ते आपल्याला नको असणाऱ्या विषयावर असतं (बहुदा अपमान किंवा आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी भविष्यकालीन घटना) आणि ते आपल्या नियंत्रणा बाहेर असतं!

जोपर्यंत विचार कसा चालू झाला आणि कुठे येऊन थांबला हे तुम्हाला कळत नाही तो पर्यंत तुमचं व्यक्तिमत्व विसर्जित होणार नाही कारण प्रत्येक विचाराचं आवर्तन हे संवेदनेनी अनियंत्रितपणे सुरू होतं आणि वर्तमानात अमक्या तमक्या गोष्टीचा आपल्याला काय धोका आहे इथे येऊन थांबतं! तुम्ही जोपर्यंत त्याच्याकडे लक्ष देऊन तुम्हाला सुरक्षित ठेवेल असा तर्कपूर्ण उपाय किंवा उत्तर देत नाही तोपर्यंत तुमचं लक्ष विचारांची मालीका सतत वेधून घेत राहील. अशा तऱ्हेनी विचारांकडे लक्ष द्या आणि दरवेळी आपली सोडवणूक करून घेत राहा हा अनिवार्य कार्यक्रम होऊन बसला आहे. मध्ये एका विनोदी लेखात एका मनोगतीनी म्हटलं होतं की ‘माझं मन टूथपेस्ट सारखं आहे एखादा विचार त्यातून बाहेर आला की तो काही केल्या पुन्हा आत जात नाही! ’ विचारांची प्रक्रिया तुम्हाला कळली की ही विचारांची पेस्ट तुमच्या संमतीविना बाहेरच येणार नाही आणि समजा कधी बाहेर आली तर तुम्हाला फार लांब घेऊन जाऊ शकणार जाणार नाही.

संजय