थोबाडपुस्तक

परवाच्या रविवारी दुपारी निवांत वेळ होता; म्हणून 'थोबाडपुस्तक' उघडलं आणि...
अरे! दचकलात ना?
हम्म्म्म... सहाजिक आहे.
'थोबाडपुस्तक' हा नेहमीसारखा शुद्ध आणि पारंपारिक मराठीत बोलायचा विषयच नाही; तर तो बोली मराठीत मांडण्याचा एक 'टॉपिक' आहे.
... तर ... परवाच्या 'सन्डे आफ्टरनून 'ला 'टाईमपास' म्हणून 'फेसबुक'(!!!) 'लॉगिन' केलं आणि 'वॉल' वरचे 'पोस्ट्स' बघत बसलो होतो. त्यापैकी काहींवर मी माझ्या (उपरोधक) 'कमेंट्स' टाकल्या, तर काही 'लाईक' केल्या. वास्तविक माझ्या 'फ्रेंड्सलिस्ट' मध्ये अडीचशे जण 'एडेड' आहेत. त्यामुळे 'फेसबुक'वर 'आक्टिव' रहायला मला पुरेशी कारणं 'अव्हेलेबल' असतात. नाही; कसंय... 'फेसबुक' हा जेवढा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तेवढाच तो करमणुकीचाही आहे.
उदाहरणार्थ, श्रीकांतने काल 'आय एम बोअर्ड' असं जाहीर केलं. आता यात मितालीला आवडण्यासारखं काय होतं कुणास ठाऊक; पण तिला ते 'लाईक' झालं खरं!
'फेसबुक'चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाची हालचाल... माफ करा... 'आक्टिविटी' अगदी तारीख-वेळेसकट नोंदवली जाते. त्यामुळे, दोन वर्षांची लहान मुलगी असणाऱ्या कमलेशने त्याचं स्व:चं 'प्रोफाईल' दहा तासांपूर्वी जेव्हा 'अप(टु)डेट' केलं, तेव्हा मला आलेलं 'नोटीफिकेशन' काहीसं असं होतं...
Kamlesh is married.
10 hours ago
माझं हसून हसून पोट दुखण्याची वेळ आली होती.
माझं हसून होतं न होतं, तेवढ्यात मला एक 'पिंग' आला. उजव्याबाजुच्या 'कॉर्नर'मध्ये एक 'पॉपप' दिसायला लागला. क्षमा नावाच्या माझ्या शाळेतल्या वर्गमैत्रिणीने मला 'ऑनलाईन' पाहून 'च्याट' करण्यासाठी 'हाय' केलं होतं. आता..., हा 'फेसबुक'चा खराखुरा फायदा आहे. इतर कोणत्याही प्रकारे संपर्कात नसलेल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधून काढण्याचं खात्रीलायक साधन म्हणजे 'फेसबुक'!
... तर, क्षमाच्या 'हाय'ला मीही पटकन 'हेलो'ने 'रिप्लाय' दिला. इथे क्षमाने आपलं 'डिस्प्ले नेम' 'क्षमा... To forgive' असं ठेवलं होतं, ही नमूद करण्यासारखी गोष्ट आहे.
'हायऱ्हेलो' नंतर रंगलेलं आमचं संभाषण काहीसं अशा प्रकारचं होतं...
क्षमा    : वॉंत्सप???
मी       : नथिंग स्पेशल. तू सांग.
क्षमा    : सेम हिअर. टी.व्ही., 'फेसबुक' आणि थोडंफार 'कुकिंग' यातच फार 'बिझी' असते रे.
मी       : चांगलंय! एकंदरीत तुझं चांगलं चाललंय!
             (या माझ्या खोचक शेऱ्यावर तिनं नुसताच एक 'स्माईली' पाठवला.)
मी       : मग? शाळेतल्या इतर कोणाशी 'टच'मधे आहेस का?
क्षमा    : हो. स्वाती, प्रणिता, अमित, प्रकाश आणि कोण-कोण आहेत माझ्या 'फ्रेंड्सलिस्ट'मधे. 'हायऱ्हेलो' होतच असतं.
मी       : गुड...
क्षमा    : वॉट एल्स? अमेरिका काय म्हणते?
मी       : अमेरिका ठीक. सध्या थंडी पडायला लागलीये.
क्षमा    : चल! यु आर सो नॉटी!!!
मी       : (गप्प)!!!
             (हे वाचून मी त्या थंडीपेक्षाही गार पडलो. काय 'रिप्लाय' द्यावा, हेच मला सुचत नव्हतं! एवढ्यात तिचाच खुलासा आला...)
क्षमा    : सॉरी! राँग विंडो!
             (अजूनही माझा अडकलेला अवंढा गळ्यातच होता. म्हणजे, ही बया इतर कोणाशीतरी (अ)'च्याट' करत होती.
              पण म्हणून, 'त्या'चा चावटपणा + हिची चूक = मी नॉटी???)
क्षमा    : अरे! निक ऑफिसमधून 'च्याट' करतोय.
              (त्या तशा थंडीत आलेला घाम मी पुसून घेतला. तिच्या या वाक्याने मला जरा धीर आला. क्षमाचा नवरा निखील उर्फ निक त्याच्या         ऑफिसमधून स्वत:च्या बायकोशी उगीचच चावटपणा करत होता. आणि क्षमाच्या अनावधानाने मी 'नॉटी' ठरलो होतो.)
मी       : ओ.के. कसा आहे निखिल?
क्षमा    : एकदम फाईन!
              (मी खरंतर इथेही 'नॉटी' याच उत्तराची अपेक्षा बाळगून होतो.)
              आज त्याला रविवारचं ऑफिसला जावं लागलं. सो, आम्ही 'फेसबुक' वर 'टाईमपास' करतोय.
मी       : ओह! कूल.
              (मी अजूनही स्वत:ला च 'कूल' करण्यात मग्न होतो!)
क्षमा    : बायदवे, तू व्हेगास ट्रीप केलीस का रे?
मी       : नाही अजून.
क्षमा    : अरे! जाऊन ये मग. 'बिंगो' नावाच्या तिथल्या कसिनोची 'ब्रांच' सद्ध्या पुण्यात उघडलीये. मस्त आहे.
             (म्हणजे, पाश्चात्य संस्कृतीच्या असल्या 'फांद्या' आता आपल्याकडेही फोफावाताहेत. आणि त्यांचं गुणवर्णन मी इथे राहून ऐकतो आहे!)
मी       : ओ.के.
क्षमा    : बी.आर.बी.
             (असं म्हणून क्षमा 'आयडल' झाली. इथे, 'बी. आर. बी.' चा फुल फॉर्म 'बी राईट ब्याक' असा असून 'आलेच हं!' इतका सोज्ज्वळ आहे, याची अज्ञानी वाचकांनी नोंद घ्यावी.)
.....
             (सुमारे दहा मिनिटांनी क्षमा जी आली, तीच 'सी या' करायला!)
क्षमा    : चाओं! सासुबाईना 'कुकिंग'मधे मदत हवी आहे. जाना पडेगा. टी.टी.एल.वाय!
मग, मीही 'शुअर' म्हणत तिला 'बा-बाय' केला.
इथे, 'टी.टी.एल.वाय' चा फुल फॉर्म 'तॉंक तु यु लेतर' असा आहे, हे सूज्ञांना सांगणे न लगे!
आमच्या दोघांच्या या संभाषणावरून हे सहज दिसून येतं की, 'फेसबुक'ची अशी स्वत:ची भाषा आहे. ती निव्वळ मराठी नाही, इंग्रजी नाही किंवा इतर कुठलीही नाही.
पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे 'फेसबुक' हे आता जीवनच होऊ लागलंय. 'फार्मविल'मधे शेती करून फावल्या वेळात ऑफिसचं काम(ही) करणारे पुष्कळ शेतकरी(!) मला ठाऊक आहेत.
जोडधंदा म्हणून 'कोफीऱ्हाऊस' चालवून 'हौस' भागवणारे कित्येक महाभाग माझे मित्र आहेत. शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे, यावरून तुमचाच स्वभाव ओळखणारे (वात्रट) ज्तोतिशी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच की!
या आणि अशा अनेक प्रकारांनी या 'फेसबुक'ने आपल्या पारंपारिक जीवनावर चांगलाच परिणाम केलाय. 'कब्जा मिळवलाय' हा कदाचित 'पर्फेक्ट' वाक्प्रचार ठरेल.
आता हेच पहा ना... नेहमी प्रमाणेच हा ही लेख शुद्ध मराठीत लिहिण्याची माझी मनापासून इच्छा होती. पण 'फेसबुक'चं भाषांतर 'थोबाडपुस्तक' केल्यावर माझी मीच माघार घेतली आणि हा लेख जमून आला...