जुन्या आणि नव्या काळातील गोष्ट

लहानपणी एक मस्त गोष्ट वाचली होती काहीशी अशी की एका शेतकऱ्याची बायको अतिशय असंतुष्ट असते आणि तिला मोठं घर हवं असतं. मग शेतकरी १ युक्ती करतो त्याच्या लहान घरातच कोंबड्या, बकऱ्या, गाय आणून बांधतो. खूप दिवस जातात बायको त्रागा करते करते पण शेवटी रुळते. असह्य दुर्गंधी, अजीबात जागा नसणे या गैरसोईंमध्ये दोघे राहत असतात. पुढे शेतकरी परत सगळी जनावरं गोठ्यात नेऊन बांधतो आणि बायको जाम खूष होते तिला आता तेच घर मोठं, ऐसपैस वाटू लागतं, नवरा तालेवार वाटू लागतो आणि सर्व काही आलबेल होतं.

याच तात्पर्याची गोष्ट नव्या काळातील -

आई मुलीच्या खोलीमध्ये प्रवेश करते आणि भींतीवरील मुलीच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी पाहून तिच्या पोटात खड्डा पडतो. थरथरत्या हाताने, धडधडत्या हृदयाने ती चिठ्ठी वाचू लागते. -
" आई, तू ही चिठ्ठी वाचत असशील तेव्हा माझ्या स्वप्नांच्या राजकुमाराबरोबर मी खूप खूप दूर गेले असेन. खरं तर हे लिहीताना मला दु:ख होत आहे पण काय करू, राकेश शिवाय जगणं मला शक्य नाही. आमचे प्रेम अमर आहे. राकेशला जरी गुटखा आणि दारूचे व्यसन आत्ता असले तरी मी त्याला त्यापासून सोडवेन याबद्दल तू निश्चिंत राहा. राकेश फक्त सलमान खानसारखा दिसतच नाही तर सलमान खानसारखीच त्याच्यामध्ये लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची हिंमत आहे आणि या जगात फक्त मी हे जाणते. मी फक्त १५ वर्षाची असले तरी मला बऱ्या वाईटाची चांगली जाण आहे. राकेश आत्ता जरी १२ वी पास असला तरी त्याला पुढे डॉक्टर होऊन एडस वर औषध शोधायचं आहे आणि त्याच्या या संशोधनात मी त्याची सहचारीण बनून साथ देणार आहे. आम्हाला खूप मुलं हवी आहेत. आम्ही दोघं लवकरच तुझं नातवंड घेऊन येऊ तेव्हा आमचं स्वागत तू आणि बाबा कराल ना ग? अरे हो एक सांगायचं राहीलं मी तिजोरीमधून तुझी मोहनमाळ, ठुशी आणि हीऱ्याच्या कुड्या घेऊन जात आहे नाहीतरी त्या तू मलाच दिल्या असत्यास याची मला खात्री आहे.

ता. क. - आई वरील सर्व गोष्टी खोट्या आहेत. मी शेजारी शुभांगीकडे गेले आहे. माझं निकालपत्र कपाटाच्या खालच्या कप्प्यात आहे. माझ्या निकालपत्राखेरीजही वाईट गोष्टी जगात आहेत हे सांगण्याकरता हा पत्रप्रपंच.