चष्मेभाद्दर

व्यक्ती तितक्या प्रकृती. त्याप्रमाणेच चष्म्याचेही किती प्रकार! फ़्रेमच्या आणि भिंगांच्या नाना तऱ्हा. फ़्रेम मध्ये पुरुषी आणि बायकी अशा दोन लायनी. शिवाय आजकाल युनीसेक्स ही तिसरी. कुणाच्या दांड्या काळ्या कुळकुळकुळीत, कुठे धूसर राखाडी, कधी अंगावर येणाऱ्या लाल भडक, पाचूसारख्या हिरव्या, वेगळेपणा जपणाऱ्या पांढऱ्या, तर कधी श्रीमंती मिरवणाऱ्या सोनेरी. एकाच रंगाचा कंटाळा आला म्हणून कुणी रेषा रेषांची नक्षी पांघरलेल्या. कुणाच्या काड्या मालकाप्रमाणेच गलेलठ्ठ. कुणाच्या हडकुळ्या. भिंगाचे सुद्धा अनंत प्रकार. गोल, लांबोळकी, चौकोनी, अरुंद, डोळे बेडकासारखे करून दाखवणारी जाडजाड, किंवा घातली आहे हे कळणार नाही इतकी पातळ. गांधीजींनी प्रसिद्ध केलेली गोल भिंगे आता अभावानेच दिसतात. तसेच काड्यांऐवजी दोऱ्या कानावर लटकवण्याचे चित्र कदाचित कार्टून मध्येच पाहायला मिळेल.

चष्मा माणसाला एक वेगळेच व्यक्तिमत्त्व देतो. नेहमी चष्मा घालणारा माणूस एकदम चष्मा न लावता समोर आला की क्षणभर वेगळीच व्यक्ती आहे असे वाटते. काही वेळा चष्म्याचा उपयोग करून मुळात नसलेले व्यक्तिमत्त्व दाखवता येते. चष्मा थोडासा खाली खेचून फ़्रेमच्या वरच्या बाजूने रोखून पाहणारे डोळे द्वाड कार्ट्यांवर लक्ष ठेवून असणाऱ्या खडूस पंतोजींचेच असणार! प्रश्नाचे उत्तर देण्याआधी चष्मा डोळ्यांवरून काढून थेट प्रश्नकर्त्याच्या डोळ्यात पाहत उत्तर देणारा बहुदा विश्वास मिळवून जातो. बोलताना उगाचच सारखी चष्म्याची काढघाल करणाऱ्याला बरेचदा नीट ऐकून घेतले जात नाही.

साधारणपणे पुरुषांना चष्मा हा प्रकार आपल्या चेहऱ्याला काही बट्टा लावत आहे असे वाटत नसते. उलट अनेक पुरुषांनाच नव्हे तर कित्येक स्त्रियांना देखील चष्मा लावलेला पुरुष कर्तबगार किंवा रुबाबदार वाटत असतो. का कोण जाणे, चष्मा घातलेली स्त्री मात्र बहुतेक पुरुषांना रुचत नसावी. चष्मा घातलेल्या एखाद्या अप्सरेचे चित्र कोणी पाहिले आहे का? सौंदर्यस्पर्धेत कधी एखादी लावण्यवती चष्मा घालून वावरली आहे का? चष्मा म्हणजे आपले सौंदर्य बिघडवणारा नतद्रष्ट प्रकार आहे असा गैरसमज झाल्यामुळे कित्येक स्त्रिया गरज असून देखील चष्म्याला चार हात दूर ठेवतात. लेसीक शस्त्रक्रियेच्या लोकप्रियतेचे हे कारण नक्कीच आहे.

चाळिशीच्या मध्यावर येऊनही रेवती अजून चाळीशी लावीत नाही ही गोष्ट इतर बायकांच्याच डोळ्यात खुपू लागली होती. मैत्रिणी हेव्याने म्हणायच्या "तुझं बरं आहे बाई. अजून तरी डोळ्यावर चष्मा चढवावा लागला नाही." हे ऐकताना इतकी वर्षे नजरेआड केलेली निकड आणखी किती काळ लपवून ठेवता येणार आहे असा प्रश्न रेवतीला पडायचा. तरी पण सगळे त्रास विसरून तिने हट्टाने चष्मा स्वीकारला नव्हता. आवडीच्या टीव्ही मालिका धूसर दिसू लागल्या, तेव्हा काय तीच ती सासुसुनेच्या भांडणांची दळणे बघत बसायची, असे म्हणून तिने टीव्ही बघणे सोडले. ती आता जास्त वेळ फ़ेसबुकवर गप्पा मारण्यात घालवू लागली. कारण संगणकाचा पडदा अगदी जवळून वाचावा लागतो. आणि जेवढी पाहिजे तेवढी अक्षरेही मोठी करून वाचता येतात! तिचे हे संगणक प्रेम विकासच्या पथ्यावरच पडले. त्याच्या आवडीच्या इंग्लिश मालिकांसाठी त्याला कोणी प्रतिस्पर्धी उरली नव्हती. आधी काही दिवस त्याने हे स्वातंत्र्य मनमुराद भोगून घेतले. पण लवकरच रेवतीला त्याचे टीव्ही बघणे खुपायला लागले. नेहमीची अस्त्रे वापरून विकासला तिच्या असहायतेचा गैरफायदा घेण्यापासून रोकणे तर अगदी सोपे होते. रेवतीने तेच केले. नेमक्या त्याच्या डेस्परेट हाउसवाईफ़्स रंगात आल्या असताना उंदीर येवढ्या उड्या मारत का चालतो आहे, किंवा संगणक टांगल्या गेला अशी कारणे काढून त्याचा रसभंग करणे. किंवा स्वयंपाक घरातून अवचित "आधी इकडे ये पाहू" अशा किंचाळ्या मारणे. इत्यादी लीलांनी रेवतीने बरोबर सूड घेतला.

मला वाटते, मी मॅट्रिकला असताना चष्मा लागला असेल. नंबर काढून चष्मा तर आणला मोठ्या उत्साहाने. तो लावल्यावर सगळे कसे स्वच्छ धुतल्यासारखे दिसू लागले होते. तरीही, पहिल्या दिवशी शाळेत चष्मा डोळ्यावर चढवून गेलो, तेव्हा तो काढून फेकून द्यावा असे वाटत होते. आजूबाजूचे सगळे जणू सारखे आपल्याच कडे पाहत आहेत असा संशय येत होता. पण लवकरच लक्षात आले, की बऱ्याच मुलांना माझ्यात काही वेगळे आहे याची जाणीव देखील नव्हती. आणि मुलींचे विचाराल, तर कोणी बोलले नाही. पण सुशीने "चष्मा लावून कसा स्मार्ट दिसतो आहेस" असा चोरटा लुक दिल्याचे मला उगाचच वाटून गेले होते. तेव्हापासून आजपर्यंत सुशीचे एक जाऊ द्या, चष्म्याने माझी सोबत काही सोडली नाही.

चष्मा लावण्याचे कितीही दिवस टाळले, तरी बहुतेकांना चाळिशीनंतर एक ना एक दिवस चष्म्याचा स्वीकार करावाच लागतो. निदान वाचण्यापुरते म्हणून का असेना! सतत चष्मा डोळ्यावर लावणे एक वेळ बरे! कारण स्वतः:ला आणि इतरांना त्याची सवय होऊन जाते आणि तो घातलेला लक्षात देखील येत नाही. पण फक्त वाचण्यासाठी डोळ्यावर चढवावा लागणारा चष्मा जेव्हा हवा असतो तेव्हा कधीच हातात येत नाही. "माझा चष्मा कुठे दिसला का" हा प्रश्न जर मोजला तर, दिवसातून पन्नास वेळा तरी चित्रा विचारीत असेल. ह्याची इतकी सवय झालेली आहे, की तिने हातात काहीही वाचायला घेतले, की तिच्या आधी आम्हीच सर्व तिचा चष्मा शोधायला लागतो.

काढून ठेवलेला चष्मा घरातल्या एखाद्या बर्म्युडा ट्रॅन्गलमधे जात असावा असा तिला दाट संशय आहे. "अहो इथेच तर ठेवला होता." हे नेहमीचेच. "इथेच होता ना?, मग असेल की तिथेच. जातो कुठे? त्याला काय पंख थोडीच आहेत?" असे गमतीने म्हटले तर म्हणणाऱ्याची खैर नाही. हा प्राणी नवरा जर असेल तर त्याची कंबक्तीच! "नक्की तुम्हीच इथून तो हालवून कुठे तरी ठेवला असेल" अगदी जीव बाहेर काढून ठेवला तरी तुझा चष्मा गायब करण्याचे षडयंत्र माझे नव्हे हे कुठलाच नवरा बायकोला पटवून देऊ शकत नाही. त्यामुळे बायको जेव्हा चष्मा शोधीत असेल, तेव्हा तिकडे पूर्ण दुर्लक्ष करणे हेच आपल्या तब्येतीला चांगले. नाहीतरी नवरा आपल्याकडे दुर्लक्ष करतो हे बायकोच्या अंगवळणी पडलेले असतेच. त्यामुळे दु:ष्परीणाम भोगावे लागले, तरी अनपेक्षित असे काही सोसावे लागत नाही.

आमच्याकडे हा नेहमीचा त्रास बंद व्हावा म्हणून न जाणो कुठल्या अशुभ क्षणी मला एक दिव्य आयडिया आली होती. "अग तू असं कर. वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी तुझे चष्मे पेरून ठेव. म्हणजे ऐन वेळी कुठला ना कुठला तरी सापडेलच." चित्राने नवरा टवाळकी करीत असावा म्हणून आधी ह्याकडे लक्ष दिले नव्हते. पण एक दिवस तिला पटले की खरंच असं केलं तर नेहमीची त्रेधा तिरपीट बंद होईल. मग काय! हळूहळू वेगवेगळ्या फ़्रेमचे, आकाराचे अन रंगांचे डझनावारी चष्मे घरात जमा झाले. बेडरूमच मध्ये चार होते. त्यातला एक पलंगाखाली ठेवला होता. तो एकदा अचानक नाहीसा झाला. व्हॅक्युम बॅग साफ करताना घुसमटलेल्या अवस्थेत तिलाच मिळाला म्हणून बरे. मला मिळाला असता, तर तुम्हीच मोडला असा ठपका बसला असता. पुस्तकांच्या शेल्फवर दोन असायचे. पुस्तक काढताना ते बरोब्बर मागच्या बाजूला पडायचे. त्यानंतर दिवाळीच्या साफसफाईतच सापडायचे. कपड्यांच्या कपाटात दोन तीन पडलेले असायचे. शिवाय ड्रेसेसच्या खिशातले वेगळेच. ह्यातले काही वॉशिंग मशीन मधून कपड्यांबरोबर धुतल्या जायचे. जिकडे तिकडे विखुरललेले चष्मे पाहून मला असा संशय होता की किचन मध्ये डाळीच्या डब्यात एक, तांदळाच्या बरणीत एक, असेही काही असावेत. एक फ्रीज मध्ये देखील असावा. एकदा फ्रीज स्वच्छ करताना तो तात्पुरता म्हणून फ्रीजर मध्ये ठेवला होता आणि कायमचा गोठल्या गेल्या होता. बाथरुम मध्ये एक दोन पेरलेले असायचेच. प्रत्येक पर्स हे तर चष्मा मंडळींचे हक्काचे राहण्याचे ठिकाण. पण पर्स मधल्या सावळ्या गोंधळात तो चष्मा नेमका कुठल्या खणात लपून बसला आहे हे काही कळायचे नाही. शेवटी काय? माझा चष्मा कुठे दिसत नाही, तुम्ही पाहिला का? हे वाक्य रोज ऐकायला मिळायचेच.

यावरून मी एक जोक बनवला होता. "माझा चष्मा कुठेतरी हरवला आहे. आणि तो सापडणारच नाही. कारण तो शोधायला आणखी एका चष्म्याची गरज आहे, आणि तो देखील सापडत नाही."

पोस्टात किंवा बॅंकेत काउंटरवर साखळीला लावून पेन ठेवलेले असते ना? पण ग्राहक सेवेचे याहून थोर उदाहरण मला कोरियात बघायला मिळाले होते. हवे तेव्हा जवळ नसण्याची चष्मे मंडळींची खोड लक्षात घेऊन, तिथल्या काउंटरवर साखळीला बांधून ठेवलेले रीडींग ग्लासेस ठेवले असत. कदाचित कोरियात ते चष्मे शहाण्यासारखे तिथेच बसून लोकसेवा करीत असतील. भारतात असे करून पाहायला हवे. नेहमी हरवतो म्हणून अगदी स्वतः:च्याच गळ्यात साखळीने लटकत ठेवला, तरीही चष्मा थोड्याच दिवसात शृंखला तोडून तो पळून जातो हे देखील कित्येकांनी अनुभवले असेल.

अशा वेळोवेळी हरवणाऱ्या चष्म्याचा एकदा मजेदार प्रसंग आठवतो.

महाराष्ट्र मंडळासाठी आम्ही "घेतलं शिंगांवर" नाटक बसवले होते. त्याची तालीम आमच्या घरी होती. आम्हा दोघांच्याही त्यात भूमिका होत्या. इतरही मित्रमंडळी होती. मनोगतचे महेश वेलणकर त्यावेळी सिंगापूरला असायचे. त्यांच्या भूमिकेला हातात मिटलेली छत्री घेऊन वावरायचे होते. तालमीसाठी काही प्रॉप्स वगैरे कशाला हवेत! त्यामुळे डायरेक्टरने म्हटले, हातात छत्री आहे असे मानून चालू द्या.

इकडे चित्राला घाईघाईने पुस्तकात तिचे डायलॉग वाचून पाहायचे होते. नुकताच नाटकासाठी म्हणून तिने एक अगदी बारीकसा, पेनच्या डब्बीत राहणार रीडींग ग्लास आणला होता. चष्मा सुरक्षित ठेवलेली ती सुबक सडपातळ सोनेरी डबी आठवणीने सेंटर टेबलवर ठेवली होती. इकडे बाकीच्यांचे प्रवेश सुरू होते, आणि चित्रा नेहमी सारखी माझा चष्मा माझा चष्मा करीत परेशान. इथेच तर डबी होती. मुद्दाम नाटकासाठी आणली होती. कोणी लहान मुलांनी घेतली का? खाली पडली का? ह्या गोंधळाने डायरेक्टर वैतागले. जाऊ द्या हो ते चष्मा शोधणे. चष्मा घातला आहे असे मानून प्रवेश सुरू करा. हे वेलणकर बघा छत्री नाही तरी मूठ आहे त्यांच्या हातात.
आता चित्रा वैतागली. अहो प्रवेशा साठी नाही, डायलॉग वाचायला हवाय चष्मा मला." –पण हे म्हणताना तिचे लक्ष वेलणकरांनी हातात धरलेल्या "छत्री"च्या मुठी कडे गेले.

चष्मा असलेली सोनेरी डबी मुठीत धरून वेलणकर मजेत इकडे तिकडे फिरत होते. छत्री ऐवजी टेबलवर मिळाली ती वस्तू छत्रीच्या मुठीसारखी हातात धरून त्यांनी वेळ मारून नेली होती. हे बघताच सगळी मंडळी हसून गडबडा लोळायचीच काय ती बाकी राहिली होती.

आमच्या घरात झालेत बहु, होतील बहु, अशी चष्म्यांची ख्याती आहे. व्हॅक्युमवाला चष्मा, धोबीवाला चष्मा, गोठलेला चष्मा अशा अनेक रूपांमध्ये, छत्रीवाला चष्मा अशा प्रकारे सामील झाला होता.